गानवर्धन, स्वरझंकार ज्ञानपीठ आयोजित मुक्त संगीत चर्चासत्र
पुणे : जलतरंग हे वाद्य अतिप्राचिन असून धातू व मातीद्वारे साकारल्याचे नोंदी मिळतात. दहाव्या शतकानंतर पोर्सेलिनचा शोध लागल्यानंतर याचा वापर जलतरंग वादनात मोठ्या प्रमाणात होऊ लागला. हे जीवंत वाद्य असून ते रंगमंचावरच आकार घेते. भारतात आज जलतरंग वादकांची संख्या अत्यल्प आहे. हे वाद्य पुढच्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे या हेतूने आजोबांचा वारसा सातत्याने पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे, अशा भावना ज्येष्ठ जलतरंगवादक, गीतकार, संगीतकार पंडित मिलिंद तुळाणकर यांनी व्यक्त केल्या.
गानवर्धन आणि व्हायोलिन अकॅडमीचे स्वरझंकार ज्ञानपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने शास्त्रीय संगीताचा प्रचार व प्रसार तसेच संगीत विषयाच्या अभ्यासकांना सांगीतिक प्रबोधन करणारे सप्रात्यक्षिक व्याख्यान अर्थात मुक्त संगीत चर्चासत्राचे एस. एम. जोशी सभागृहात आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पंडित मिलिंद तुळाणकर यांनी ‘जलतरंगाचे अंतरंग’ या विषयावर दुसरे पुष्प गुंफले. व्यासपीठावर डॉ. भास्कर हर्षे, पंडित अतुलकुमार उपाध्ये, दयानंद घोटकर, सविता हर्षे मंचावर होते.
या वेळी पंडित तुळाणकर यांना गानवर्धनचे संस्थापक कै. कृ. गो. धर्माधिकारी पुरस्कृत संगीत पारंगत, तर शास्त्रीय गायनासाठी सुशीला बाळकृष्ण न्यास पुरस्कृत युवा कलाकार आदिश्री पोटे यांना प्रदान करण्यात आला. संवादिनीवादक मयुरेश गाडगीळ यांचाही सन्मान करण्यात आला. शाल, ग्रंथभेट, स्मृतीचिन्ह आणि २५ हजार रुपये असे संगीत पारंगत पुरस्काराचे स्वरूप होते.
हिंदी चित्रपटात जलतरंग या वाद्याचा वापर मोठ्या प्रमाणात झालेला दिसतो असे सांगून पंडित तुळाणकर यांनी दृकश्राव्य माध्यमातून अनेक हिंदी चित्रपट गीतांचे दर्शन घडविले. जलतरंग वादन हे संगीतोपचारासाठी वापरले जात असून त्याचा आरोग्यावरही चांगला परिणाम जाणवत असल्याचे सांगितले. ‘कुश लव रामायण गाती’, ‘सारे जहाँ से अच्छा’, ‘दिल है छोटासा’ या गीतांसह राग पूरियाधनाश्रीचे प्रभावी सादरीकरण केले. गणेश तानवडे यांनी तबला साथ केली तर ऋतुजा फुलकर यांनी पंडित तुळाणकर यांनी संवाद साधला.
डॉ. भास्कर हर्षे म्हणाले, मुक्त संगीत चर्चेच्या माध्यमातून संगीत विषयक अभ्यास, संशोधन पुढील पिढीपर्यंत पोहोचविले जात असून हे कार्य नवोदित कलाकारांना निरंतर स्फुरण देणारे आहे. पूरक उपचार पद्धती म्हणून संगीत क्षेत्रात संशोधन होण्याची गरज आहे.
डॉ. दयानंद घोटकर यांनी प्रास्ताविक केले तर डॉ. वासंती ब्रह्मे यांनी सूत्रसंचालन केले.

