मनुस्मृती वैदिक स्त्रीयांना अत्यंत हिणकस वागणूक देते हे वास्तव असताना विद्यार्थ्यांचे वैदिकीकरण करण्याचा प्रत्यत्न केला
पुणे- आपल्या केंद्रीय शिक्षण मंत्री पदाच्या कार्यकालात धर्मेंद्र प्रधान यांनी पाठ्यपुस्तकांमध्ये ज्या अनैतिहासिक गोष्टी घुसडून विद्यार्थ्यांना अज्ञ बनवायचे कार्य केले ते सारे घुसवलेले काढून टाकले पाहिजे तरच शिक्षण क्षेत्र खऱ्या अर्थाने मुक्त होईल.अन्यथा मंत्री बदलून काही उपयोग नाही.असे येथे प्रसिद्ध इतिहास संशोधक ,लेखक संजय सोनवणी यांनी म्हटले आहे , सोनवणी पुढे म्हणाले , धर्मेंद्र प्रधान यांनी अभ्यासक्रमात वैदिक संस्कृती, वैदिक विचार आणि वैदिक गणिताचा लक्षणीय समावेश केला. हे विद्यार्थ्यांचे वैदिकीकरण करण्याचा प्रत्यत्न आहे.
इयत्ता ९ वीच्या सामाजिक शास्त्राच्या नवीन पुस्तकातील (‘State and Society up to 1000 CE’) या प्रकरणात वैदिक काळाचा उल्लेख आहे. वैदिक काळात महिलांना समाजात आदराचे आणि उच्च स्थान होते हे दर्शवण्यासाठी पुस्तकात चक्क मनुस्मृतीमधील एका श्लोकाचा संदर्भ देण्यात आला आहे, ज्यावरून राष्ट्रीय स्तरावर मोठी चर्चाही झाली. मुळात वैदिक काळ भारतात कधीही अस्तित्वात नव्हता हे पुरातत्वीय पुराव्यांनी सिद्ध केले आहे. मनुस्मृती वैदिक स्त्रीयांना अत्यंत हिणकस वागणूक देते हे वास्तव असताना हे केले गेलेले बदल वगळले पाहिजेत.
इतिहास आणि सामाजिक शास्त्राच्या पुस्तकांमध्ये ‘भारताची सांस्कृतिक पाळेमुळे’ स्पष्ट करताना वेद, यज्ञ, ‘कर्म’ आणि ‘वेदांत’ या संकल्पनांचा समावेश केला गेलेला आहे. ही भारताची कधीही (वैदिक धर्मीयांची सोडता) सांस्कृतिक पाळेमुळे नव्हती. त्याचा कोणताही भौतिक पुरावा नाही तरीही अशी अनैतिहासिक माहिती मुलांना देणे हे चुकीचे आहे.असे असूनही आणि हे सरकार जाहीरपणे वैदिक धर्माचा पुरस्कार करत असतानाही काही वैदिक मला वैदिक नावाचा कोणताही धर्म अस्तित्वात नाही असे म्हणत असतात. म्हणोत, पण वास्तव हेच आहे! ज्याला पुरावे नाहीत तेच भ्रामक मिथक सत्य मानायचे ही खास वैदिक परंपरा आहे.अभ्यासक्रमातून हे सारे बदल हद्दपार केले गेले पाहिजेत असेही संजय सोनवणी यांनी म्हटले आहे.

