नीटप्रमाणे महाराष्ट्रात MHT-CET परिक्षेतही प्रचंड गोंधळ, उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी समिती नेमा..
शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर टिळक भवन येथे पेढे वाटण्यात आले व ढोल ताशे वाजवून आनंद साजरा करण्यात आला.
मुंबई, दि. २५ जुलै २०२६.
देशातील कोट्यवधी तरुणांच्या आशा-आकांशा व स्वप्नाशी खेळणाऱ्या मोदी सरकारला तरुणाईने झुकवले आहे. नीटमधील पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना अखेर राजीनामा द्यावा लागला आहे. हा राजीनामा हा लोकशाहीचा विजय आहे, तरुणांचा विजय आहे. विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा विजय आहे. प्रधान सेवकापासून सुरु झालेला आणि नॉन बायालॉजिकल पर्यंत आलेला हा प्रवास युवाशक्तीने आज जमिनीवर आणलेला आहे, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व तेलंगणाचे प्रभारी सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना सचिन सावंत पुढे म्हणाले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नीट पेपरफुटी व शिक्षण पद्धतीतील भ्रष्ट कारभाराविरोधात रणशिंग फुंकले होते. मागील अधिवेशनात त्यांनी या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी केली होती पण अहंकारी मोदी सरकारने त्यावर चर्चा केली नाही, त्यानंतर छात्रों की गुंज हे अभियान सुरु केले, राहुल गांधी, काँग्रेस पक्ष, युवक काँग्रेस, NSUI या संघटनांनी देशभर आवाज उठवला. तरुणाई रस्त्यावर उतरली, रस्त्यापासून संसदेपर्यंत शिक्षणातील भ्रष्ट कारभाराची पोलखोल करण्यात आल. मागील दीड दोन महिन्यापासून देशातील तरुण मोदी सरकारच्या शिक्षण क्षेत्रातील अनागोंदी कारभाराविरोधात पेटून उठला होता. दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याच्या वल्गणा केल्या पण त्याची पूर्तता केली नाही, सरकारी नोकऱ्या कमी होत आहेत, स्पर्धा परिक्षातून काही यश मिळेल यासाठी विद्यार्थी चार चार वर्षे प्रयत्न करतात पण त्यातही घोटाळे होत असतील तर विद्यार्थ्यांनी कुठे जायचे, हा मोठा प्रश्न आहे. मोदी सरकारच्या काळात ५० टक्के तरुण बेरोजगार झाले आहेत. सरकारने आधीच ऐकले असते तर आज ही वेळ आली नसती.
मागील १० वर्षात १५२ वेळा पेपरफुटीच्या घटना झाल्या पण सरकारने काहीच केले नाही. तरुणाई रस्त्यावर उतरली असता त्यांच्यावर अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली, पॅलेट गनने हल्ला करण्यात आला. आज शिक्षण मंत्र्यांच्या राजीनामा झालेला आहे पण विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला करण्याऱ्या, त्यांना अमानुष वागणूक देणाऱ्या गृहमंत्री अमित शाह यांचाही राजीनामा झाला पाहिजे, असेही सचिन सावंत म्हणाले.
MHT-CET परिक्षेतही प्रचंड गोंधळ..
नीट प्रमाणे महाराष्ट्रातील MHT-CET परिक्षेतही प्रचंड गोंधळ होत आहे, २०२२ पासून मागील चार वर्षात या परिक्षेत अनागोंदी प्रकार सुरु आहेत. १० वी १२ वी ४०-५० टक्के मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांना एमएचटी-सीईटी परिक्षेत मात्र ९० पेक्षा जास्त पर्सेंटाईल पडले आहेत. २०२६ च्या निकालात तर एका जुळ्या भावड्यांना जुळा निकाल लागला आहे. दोघांना मार्क सारखे आहेत. बारावीला ६० टक्के मार्क्स पडलेल्या विद्यार्थ्यांना सीईटी मध्ये ९९ पर्सेंटाईल पडले आहेत. ही बाब CET cell च्या निदर्शनास आणून दिली असता हा योगायोग आहे, असे उडावाउडवीचे उत्तरे दिले आहे. या सर्व घोटाळ्याची निवृत्त न्यायाधिशांकडून चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.
सावंत पुढे म्हणाले की, MHT-CET ही JEE Main नंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा आहे. दरवर्षी सुमारे ६ लाख विद्यार्थी ही परीक्षा देतात. महाराष्ट्रातील COEP, VJTI, ICT, PICT, SPIT, Walchand यांसारख्या संस्था देशातील सर्वोत्तम अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये गणल्या जातात. त्यामुळे या परीक्षेची विश्वासार्हता आणि पारदर्शकता अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र, CET Cell च्या कार्यपद्धतीवर आणि प्रवेश प्रक्रियेतील काही निर्णयांवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहोत. MHT-CET 2026 च्या निकालाबाबत हजारो विद्यार्थी आणि पालकांच्या मनात शंका आहेत. म्हणून उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी समिती नेमावी. Normalization प्रक्रिया, गुणांकन पद्धती आणि Ranking Algorithm चे स्वतंत्र ऑडिट करावे, संपूर्ण प्रक्रिया सार्वजनिक करावी.
गेल्या चार वर्षांतील गंभीर प्रवृत्ती..
गेल्या चार वर्षांपासून MHT-CET च्या निकालात एक चिंताजनक कल दिसत आहे. दरवर्षी पहिल्या १००० क्रमांकांमध्ये बारावीमध्ये ६०% पेक्षा कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे.यावर्षी तर १० वी आणि १२ वीमध्ये ६०% पेक्षा कमी गुण मिळालेले जवळपास १२५ पेक्षा अधिक विद्यार्थी पहिल्या १००० मध्ये असल्याचे समोर आले आहे. राज्यातील Rank 37 आणि Rank 38 मिळवणारे विद्यार्थी सख्खे भाऊ-बहिण आहेत.
Betterment Fee की Betterment Tax?
यावर्षी सरकारने विद्यार्थ्यांवर आर्थिक अन्याय करणारा निर्णय घेतला आहे. पूर्वी: कोणत्याही CAP Round मध्ये जागा मिळाल्यानंतर फक्त ₹1000 Seat Acceptance Fee भरावी लागत होती. त्या शुल्कानंतर विद्यार्थी पुढील सर्व Betterment Rounds मध्ये सहभागी होऊ शकत होता. मात्र यावर्षी Round 1 : ₹1000, Round 2 : ₹2000,Round 3 : ₹3000 द्यावे लागणार आहेत. म्हणजे विद्यार्थ्याला Betterment साठी एकूण ₹6000 भरावे लागतील. हा Betterment Fee नसून विद्यार्थ्यांवर लादलेला Betterment Tax आहे. विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर कर लावणारे निर्णय तात्काळ मागे घ्यावेत. MHT-CET वरचा विश्वास टिकवण्यासाठी सरकारने निष्पक्ष चौकशी जाहीर करावी, संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक करावी आणि Betterment Tax तात्काळ रद्द करावा. हा केवळ लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न नाही, तर महाराष्ट्राच्या तांत्रिक शिक्षणाच्या विश्वासार्हतेचाही प्रश्न आहे, असेही सचिन सावंत म्हणाले..

