पुणे:
मेंटल हेल्थ फोरम पुणे चे अध्यक्ष, सनराईज समाजकार्य महाविद्यालयाचे संचालक प्रा चेतन दिवाण यांची महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मानसिक आरोग्य प्राधिकरणावर शासन निर्णय आणि नियुक्ती करण्यात आलेली आहे.
मानसिक आरोग्य कायदा 2017 च्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली, विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली तसेच सहसचिव, उपसचिव, राज्य आरोग्य आयुक्त, राज्य आरोग्य संचालक, राज्य मानसिक आरोग्य सहसंचालक, समाज कल्याण विभाग उपसचिव यांच्यासह इतर 14 अशासकीय तज्ञ समिती सदस्यांचा या प्राधिकरणामध्ये समावेश आहे. तीन वर्षांसाठी राज्यातील मानसिक आरोग्य क्षेत्राच्या कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी, राज्यातील मानसिक आरोग्य संबंधित संस्थांच्या स्थापनांचे नियमन, मानव संसाधन नियुक्ती, विविध कार्यशैली, मानांकने निश्चित करून त्यासाठी नियम, अटीं तयार करणे, मनोरुग्णांच्या हितासाठी तसेच संस्थांच्या सुसूत्रबद्धपणे कार्यासाठी धोरण निश्चित करणे व एकंदरीतच मानसिक आरोग्य क्षेत्राच्या राज्यातील सर्व कार्यप्रणालींचे नियमन करून त्या दृष्टिकोनातून मानसिक आरोग्याच्या विकासासाठी प्रयत्न करण्यासाठी या प्राधिकरणाची 2018 च्या केंद्र शासनाच्या नियमावलीनुसार स्थापना राज्यात करण्यात आलेली आहे. दर तीन वर्षांनी या प्राधिकरणावर मानसिक आरोग्य क्षेत्राशी संबंधित सदस्यांची नियुक्ती करण्यात येत असते.
प्रा चेतन दिवाण यांनी रांची, झारखंड येथून मानसिक आरोग्य क्षेत्रातील सर्वोच्च समजले जाणारे एम फील इन सायकीयाट्रिक सोशल वर्क हे शिक्षण पूर्ण केलेले असल्याने तसेच या क्षेत्रातील तब्बल वीस वर्षाहून अधिक अनुभव असल्याने राज्य शासनाने त्यांची या प्राधिकरण समितीवर तज्ञ सदस्य म्हणून नियुक्ती केलेली आहे
प्रा चेतन दिवाण यांची मुख्यता समाजकार्य विषय शिक्षण तज्ञ, मानसिक आरोग्य व दिव्यांगत्व क्षेत्र तज्ञ म्हणून गेली 22 वर्षे ओळख असून, प्रा दिवाण यांनी अनेक वर्षे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दिव्यांग अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, सदस्य तथा विद्या परिषद सदस्य म्हणून उल्लेखनीय कामगिरी केलेली आहेत.. ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या काही समित्यांचे तज्ञ समिती सदस्य म्हणून काम पाहत आहेत.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या महाराष्ट्र राज्य शासनाच्या उच्च शिक्षण विभागाच्या, समाजकार्य शिक्षण विषय समितीचे अध्यक्ष, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या समाजकार्य शिक्षण विषयाचे सेट परीक्षेचे अध्यक्ष, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या समाजकार्य अभ्यास मंडळाचे सदस्य, मुळजी जेठा महाविद्यालय जळगावच्या समाजकार्य अभ्यास मंडळाचे सदस्य, एमआयटी वर्ल्ड पीस विद्यापीठाच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट विषयाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य तसेच इतर अनेक विद्यापीठे व शिक्षण संस्थांच्या अभ्यास मंडळावर सदस्य, तज्ञ समिती सदस्य, मार्गदर्शक, परीक्षक आदी पदांवर कार्यरत आहेत.
तसेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या विविध विभागातील समित्यांवर देखील तज्ञ समिती सदस्य म्हणून ते कार्य पाहत आहेत
सध्या प्रा चेतन दिवाण हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या श्रीगोंदा येथील सनराईज समाजकार्य महाविद्यालयाचे संचालक म्हणून काम पाहत आहेत
प्रा चेतन दिवाण यांच्या या नियुक्ती बद्दल त्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.

