भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाचे आयुक्तांना निवेदन; नियुक्ती, वेतन आणि कारवाईच्या प्रक्रियेतील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी
पुणे : पुणे महानगरपालिकेत नियुक्त करण्यात आलेल्या सुरक्षारक्षकांची संख्या, त्यांच्या नेमणुकीची प्रक्रिया, वेतन तसेच कामावरून कमी करण्याच्या कार्यपद्धतीची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने केली आहे. भाजपचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गुरुवारी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले.
पुणे महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत सुरक्षारक्षकांच्या नियुक्ती आणि कार्यपद्धतीवरून मोठा वाद निर्माण झाला होता. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी या विषयावरून प्रशासनाला धारेवर धरले होते. या पार्श्वभूमीवर भाजपच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेत विविध मुद्द्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.
सुरक्षा पुरविणाऱ्या एजन्सींच्या नोंदी, प्रत्यक्ष कामावर असलेल्या सुरक्षारक्षकांची संख्या आणि महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या अधिकृत नोंदी यांची पडताळणी करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी निवेदनात करण्यात आली आहे. सुरक्षारक्षकांना वेतन वेळेवर मिळते का, एजन्सीकडून त्यांना ठरल्याप्रमाणे पूर्ण वेतन दिले जाते का, याचीही चौकशी करावी. यामध्ये दोषी आढळणाऱ्या एजन्सी किंवा संबंधित व्यक्तींवर कारवाई करावी, असे शिष्टमंडळाने म्हटले आहे.
एखाद्या सुरक्षारक्षकाकडून कामामध्ये कसूर झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर कोणतीही अंतर्गत चौकशी न करता त्याला ठेकेदाराकडे परत पाठवले जाते किंवा त्याचे काम थांबवले जाते, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. कारवाईपूर्वी संबंधित सुरक्षारक्षकाचे म्हणणे ऐकून घेतले जात नसल्याने एकतर्फी निर्णय होत असल्याचेही नमूद करण्यात आले.
काही सुरक्षारक्षकांना कमी करून त्यांच्या जागी नवीन सुरक्षारक्षक नियुक्त करताना आर्थिक व्यवहार होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याचा दावा धीरज घाटे यांनी केला आहे. त्यामुळे अशा प्रकारे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास गंभीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
लोकप्रतिनिधींकडून त्यांच्या प्रभागातील गरजू व्यक्तींच्या नियुक्तीसाठी शिफारस केली जात असली तरी काही अधिकारी पैसे घेऊन सुरक्षारक्षकांची नियुक्ती करत असल्याच्या तक्रारी असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे पात्र आणि बेरोजगार उमेदवार नियुक्तीपासून वंचित राहत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
महापालिकेतील सुरक्षारक्षकांच्या नियुक्तीपासून त्यांच्या कामकाजापर्यंत, सेवा नियमांपासून ते कामावरून कमी करण्यापर्यंतच्या प्रक्रियेत अनेक अनियमितता होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून अनियमितता आढळल्यास संबंधित अधिकारी, एजन्सी आणि दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने आयुक्तांकडे केली.
या शिष्टमंडळात नगरसेवक रवींद्र साळेगावकर, पुनीत जोशी, राघवेंद्र ऊर्फ बापू मानकर, पृथ्वीराज सुतार, विश्वास ननावरे, अजय खेडेकर, अतुल तरवडे, अमर आवळे, सुनील पांडे, पूजा जागडे, पायल तुपे, अर्चना जगताप, नवनाथ जाधव आदींचा समावेश होता.

