मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नवी मुंबईत ‘भारत टॅक्सी’ सेवेचा प्रारंभ

Date:



दिल्ली आणि गुजरातनंतर महाराष्ट्रात ‘भारत टॅक्सी’चा प्रारंभ ‘सहकारातून रोजगार’ आणि ‘रोजगारातून समृद्धी’ हे मॉडेल आणखी पुढे नेईल

नवी दिल्‍ली, 23 जुलै 2026 

सहकार्य, नवोन्मेष आणि सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून देशाच्या वाहतूक क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत महाराष्ट्रचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय सहकार राज्यमंत्री  मुरलीधर मोहोळ यांनी आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आयोजित एका कार्यक्रमात महाराष्ट्रात ‘भारत टॅक्सी’ सेवेचा शुभारंभ केला. पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या ‘सहकार से समृद्धी’ या संकल्पनेनुसार आणि केंद्रीय गृह आणि  सहकार मंत्री  अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. याप्रसंगी अनेक मान्यवर, सहकार क्षेत्रातील प्रतिनिधी, अधिकारी आणि ‘भारत टॅक्सी’शी निगडित ‘सारथी’  उपस्थित होते. ‘भारत टॅक्सी’ एका  न्याय्य सहकारी मोबिलिटी मॉडेलला चालना देत आहे ; ज्यामध्ये टॅक्सी सारथींना केवळ चालक न मानता, त्यांना सेवेचे मालक, सहकारी संस्थेचे सदस्य आणि प्रगतीमधील भागीदार म्हणून ओळखले जाते.

याप्रसंगी बोलताना केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की,  महाराष्ट्रात ‘भारत टॅक्सी’च्या परिचालनाची सुरुवात झाल्यामुळे राज्याच्या सहकार क्षेत्रामध्ये एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्र ही सहकाराची पावन भूमी आहे आणि या राज्याला शंभर वर्षांहून अधिक कालावधीची सहकाराची समृद्ध परंपरा आहे.

राज्याच्या सहकार क्षेत्राला बळकट करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उचलण्यात आलेल्या पावलांचा संदर्भ देत केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ म्हणाले की, राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ – एनसीडीसी च्या माध्यमातून राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना जवळजवळ 10,000 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. इथेनॉल आणि कॉम्प्रेस्ड बायोगॅस यांच्याशी संबंधित उपक्रमांना देखील राज्यात प्रोत्साहन देण्यात येत आहे. सहकारी गृहनिर्माण क्षेत्रासाठी स्वतंत्र कायदेशीर चौकट निर्माण करण्याच्या आणि स्वयं-पुनर्विकासाला चालना देण्याच्या दिशेने देखील महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत. सहकाराच्या माध्यमातून टिश्श्यु कल्चरला प्रोत्साहन देण्याच्या उपक्रमासाठी जमीन देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे असे त्यांनी सांगितले.

केंद्रीय सहकार राज्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्रातील सहकारी संस्था आणि संघटनांच्या विस्तृत जाळ्याच्या माध्यमातून येत्या काळात, भारत टॅक्सी सेवा राज्याच्या विविध भागांमध्ये विस्तारण्यात येईल. राज्यातील युवावर्ग आणि महिलांनी मोठ्या प्रमाणात भारत टॅक्सी सेवेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. मोहोळ म्हणाले की, भारत टॅक्सी सेवेच्या सारथींना या प्रगतीमध्ये भागीदार करून घेऊन त्यांना सहकारी संस्थांचे लाभ मिळवून देतानाच ही सेवा नवे रोजगार आणि स्वयं-रोजगार निर्माण करेल. “सहकाराचे सारथी” आणि “समृध्द महाराष्ट्राचे भागीदार”बनण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले.

याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे पहिले सहकार मंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली सहकार क्षेत्रामध्ये घडून आलेल्या नव्या क्रांतीचे परिणाम आता राज्याच्या वाहतूक क्षेत्रावर देखील दिसून येत आहेत. फडणवीस म्हणाले की, दिल्ली आणि गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रात सुरू झालेली भारत टॅक्सी सेवेची सुरुवात, सहकाराच्या माध्यमातून रोजगार आणि रोजगाराच्या माध्यमातून समृद्धी निर्माण करण्याचा नवा पायंडा घालून देईल. गाव स्तरावरील प्राथमिक सहकारी संस्थांपासून विविध सहकारी संघटनांपर्यंत, प्रत्येक ठिकाणी नवे व्यावसायिक नमुने विकसित करण्यासोबतच या संस्थांना बळकट, आधुनिक बनवून त्यांच्यामध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

भारत टॅक्सी हा या परिवर्तनात्मक दृष्टिकोनाअंतर्गतचा एक महत्त्वाचा घटक आहे.

अ‍ॅप आधारित टॅक्सी सेवांमुळे प्रवाशांची वाहतूक अधिक सोयीस्कर झाली आहे, मात्र सर्ज प्रायसिंग म्हणजेच मागणीत वाढ झाल्याने होणारी भाडेवाढ, छुपे शुल्क आणि एग्रिगेटर अर्थात अशा अ‍ॅपची सेवा पुरविणाऱ्यांचे कमिशन अशी अनेक आव्हानेही आहेत. यामुळे अनेकदा प्रवासी आणि चालक दोघांनाही अडचणींचा सामना करावा लागला आहे, ही बाब देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केली. भारत टॅक्सी हा उपक्रम म्हणजे या समस्यांवरची एक सहकारी तत्त्वावरील उपाययोजना असल्याचे ते म्हणाले. या उपक्रमाअंतर्गत, टॅक्सी सारथी हे केवळ चालक राहणार नाहीत, तर ते सहकारी संस्थेचे मालक आणि भागधारक देखील असतील. यासोबतच संस्थेने मिळवलेल्या नफ्यातही त्यांचा वाटा असेल अशी माहिती त्यांनी दिली. या सेवेअंतर्गत कोणतीही सर्ज प्रायसिंग किंवा छुपे शुल्क असणार नाहीत, ही सेवा निश्चित सेवा शुल्काच्या तत्वावर चालवली जाईल असेही त्यांनी सांगितले. भारत टॅक्सीमुळे  नागरिकांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि उत्तम दर्जाच्या वाहतूक सेवेचा पर्याय उपलब्ध होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या उपक्रमांतर्गत महिला प्रवाशांची सुरक्षितता, प्रवाशांशी सौजन्याची वागणूक, भाड्यासंबंधित पारदर्शकता आणि उत्तरदायी सेवा वितरण प्रणालीला प्राधान्य दिले जाईल असे त्यांनी सांगितले. या उपक्रमाकरता दिवंगत दि. बा. पाटील सहकारी वाहतूक संस्थेसोबत झालेला करार महत्त्वाचा असल्याचेही ते म्हणाले. याअंतर्गत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आसपास राहणाऱ्या सुमारे 3,000 ते 4,000 स्थानिक भूमीपुत्रांना पतपुरवठ्याच्या सुविधेसह टॅक्सी उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना भारत टॅक्सी मंचाशी जोडण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही फडणवीस यांनी दिले. यामुळे स्थानिक तरुणांसाठी रोजगार आणि उद्योजकतेच्या नव्या संधी निर्माण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमादरम्यान भारत टॅक्सीशी जोडलेल्या सारथींना समभागाची प्रमाणपत्रे आणि त्याच्या सेवा संचाचे वितरणही करण्यात आले. सध्याची मध्यस्थ असलेली व्यवस्था बदलून त्याऐवजी सारथी केंद्रित वाहतूक आराखडा असलेली व्यवस्था प्रस्थापित करणे, सारथीच्या उत्पन्नात स्थैर्य साध्य करणे, प्रवाशांना भाड्यातील पारदर्शकतेसह सुरक्षित सेवा पुरवणे आणि संस्थेचा नफ्यात सारथींनाही वाटा मिळवून देणे हे भारत टॅक्सी या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. आगामी काळात, राज्यातील सहकारी संस्था, वाहतूक संघटना आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहकार्याने अधिक टॅक्सी चालक, युवा, महिला आणि स्थानिक समुदायांना या मंचाशी जोडून टप्प्याटप्प्याने संपूर्ण महाराष्ट्रात भारत टॅक्सी सेवेचा विस्तार केला जाणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिकेतील सुरक्षारक्षकांच्या नेमणुकीची सखोल चौकशी करा

भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाचे आयुक्तांना निवेदन;...

खडकवासला धरण ९५ टक्के भरले; आज रात्री ८ वाजता मुठा नदीत ३,८२५ क्युसेकने विसर्ग सुरू

धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ; नागरिकांना नदीपात्रापासून दूर राहण्याचे पाटबंधारे...