ठाकरे बंधूंही रस्त्यावर लढणार :26 जुलैला विद्यार्थ्यांसोबत मुंबईत भव्य मोर्चा, पालकांनाही मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन

Date:

मुंबई-नीट पेपरफुटी प्रकरण आणि देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलिसी कारवाईचा निषेध करत दोन्ही नेत्यांनी 26 जुलै रोजी मुंबईत संयुक्त मोर्चा काढण्याची घोषणा केली.

राज ठाकरे म्हणाले की, देशभरात सुरू असलेले विद्यार्थी आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण होते. मात्र, त्याला दडपण्यासाठी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींवर दबाव टाकला जात असून त्यांच्यावर लाठीमार करण्यात येत आहे. या कारवाईचे पडसाद आता संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रातही उमटत असल्याचे त्यांनी सांगितले.

‘अपयशाची जबाबदारी मंत्र्यांनी घ्यावी’

राज ठाकरे यांनी भाजपला त्यांच्याच पूर्वीच्या भूमिकेची आठवण करून दिली. विरोधी पक्षात असताना भाजपने अनेक मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती, असे सांगत त्यांनी 26/11 हल्ल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या राजीनाम्याचा तसेच मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त अरूप पटनायक यांच्याविरोधातील आंदोलनाचा उल्लेख केला.
“एखाद्या खात्यात अपयश आले तर त्याची जबाबदारी संबंधित मंत्र्यांनी स्वीकारली पाहिजे. विद्यार्थ्यांची सुरुवातीची मागणी केवळ केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची होती. मात्र, विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईनंतर हा प्रश्न आता पंतप्रधानांपर्यंत पोहोचला आहे,” असे राज ठाकरे म्हणाले.

‘संवाद झाला असता तर परिस्थिती टळली असती’

सरकारने आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना चर्चेसाठी बोलावले असते, त्यांच्या समस्या समजून घेतल्या असत्या तर एवढा मोठा संघर्ष उभाच राहिला नसता, असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले. शेतकरी आंदोलन, मणिपूर आणि आदिवासींच्या प्रश्नांवरही सरकारने संवादाऐवजी दडपशाहीची भूमिका घेतल्याचा आरोप त्यांनी केला.

नीट परीक्षेबाबत आपण सुरुवातीपासूनच केंद्रीकृत परीक्षेला विरोध केला होता, अशी आठवण करून देत त्यांनी, “मी पंतप्रधानांना त्यावेळी सांगितले होते की, आज शेतकरी आत्महत्या करत आहेत, उद्या विद्यार्थी आत्महत्या करतील. दुर्दैवाने आज तेच घडताना दिसत आहे,” असेही सांगितले.

26 जुलैला शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मोर्चा

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि केंद्र सरकारपर्यंत जनतेचा रोष पोहोचवण्यासाठी 26 जुलै रोजी शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर असा संयुक्त मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली. “हा केवळ मोर्चा नाही, तर विद्यार्थी, पालक आणि नागरिकांच्या भावना व्यक्त करणारे शक्तिप्रदर्शन असेल. सिद्धिविनायक येथे जाऊन सरकारला सद्बुद्धी मिळावी, अशी प्रार्थना करू,” असे ते म्हणाले.

‘हा केवळ नीटचा प्रश्न नाही, जनतेच्या असंतोषाचा उद्रेक’

उद्धव ठाकरे यांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शवत हा संघर्ष फक्त नीट परीक्षेपुरता मर्यादित नसल्याचे सांगितले. दिल्ली दौऱ्यादरम्यान विविध राज्यांतून आलेल्या नागरिकांशी संवाद साधल्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, नोटाबंदीपासून विविध सरकारी निर्णयांमुळे नाराज असलेले अनेक नागरिक या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

“हा केवळ विद्यार्थ्यांचा प्रश्न नाही. गेल्या काही वर्षांत साचलेला लोकांचा संताप आता बाहेर पडत आहे. त्यामुळे हे आंदोलन व्यापक स्वरूप धारण करत आहे,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

‘विद्यार्थ्यांवर अत्याचाराचे गंभीर आरोप’

दिल्लीतील आंदोलनात सहभागी झालेल्या काही विद्यार्थिनींनी आपल्याला पोलिसांकडून झालेल्या गैरवर्तनाची माहिती दिल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला. “काही विद्यार्थिनींचे कपडे फाडले गेले, त्यांना बेदम मारहाण करण्यात आली, काहींवर अत्यंत क्रूरपणे लाठीचार्ज झाला. अशा घटना लोकशाहीला शोभणाऱ्या नाहीत,” असे ते म्हणाले.

‘सरकारने संवाद साधायला हवा होता’

पंतप्रधानांनी सोशल मीडियावर संदेश देण्याऐवजी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन संवाद साधायला हवा होता, असे सांगत उद्धव ठाकरे म्हणाले, “ही आपल्या देशातील मुलं आहेत. त्यांच्याशी चर्चा करण्यात कोणताही कमीपणा नाही. पहिल्याच दिवशी सरकारने संवादाचे दरवाजे उघडले असते तर परिस्थिती इतकी चिघळली नसती.”

दोन्ही ठाकरे बंधूंनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला नैतिक पाठिंबा जाहीर करत लोकशाहीत मतभेद दडपण्याऐवजी संवाद आणि उत्तरदायित्व यालाच प्राधान्य दिले पाहिजे, अशी भूमिका पत्रकार परिषदेत मांडली.

‘मोर्चा शांततेतच होईल’

मोर्च्यादरम्यान कोणत्याही प्रकारची हिंसा होऊ नये, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. काही जण आंदोलनाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. काही सिव्हिल ड्रेसमधील व्यक्ती पोलिसांसोबत असल्याचा दावा करत त्यांनी त्यांच्या ओळखीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दोन्ही नेत्यांनी 26 जुलैचा मोर्चा हा केवळ निषेधासाठी नसून विद्यार्थी, पालक आणि नागरिकांची ताकद दाखवणारे शांततामय शक्तिप्रदर्शन असेल, असा दावा केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांवर प्रभावी नियंत्रण ठेवले तर शहराचा बकालपणा कमी होईल -स्थायी समितीअध्यक्ष श्रीनाथ भिमाले

अतिक्रमण कारवाईचा मासिक अहवाल स्थायी समितीला सादर करा- पुणे- महानगरपालिकेच्या...

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून १ लाखाहून थकीत कर्जदारांचा तपशील पोर्टलवर अपलोड-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि.२३: राज्यशासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्यादृष्टीने जाहीर केलेल्या 'पुण्यश्लोक...

सरकारचे हस्तक असल्यासारखे वागू नका, महाराष्ट्रात पोलीस राज खपवून घेणार नाही: हर्षवर्धन सपकाळ

आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणाऱ्या...

पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया अहिर:27 वर्षीय मॉडेल,मुंबईतील विद्यार्थी आंदोलनात ठामपणे उभी राहिली

मुंबई-मुंबईतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना घेऊन जाणाऱ्या...