पुणे, दि.२३: राज्यशासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्यादृष्टीने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’-२०२६ च्या अंमलबजावणीअंतर्गत पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून जिल्ह्यातील १ लाख ८ हजार ४१ थकीत कर्जदारांचा तपशील पोर्टलवर अपलोड करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्यादृष्टीने त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, आत्मविश्वास वाढवणे आणि शेती क्षेत्राला नवसंजीवनी देण्याचा उद्देशाने ही योजना जाहीर करण्यात आली आहे. सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे ग्रामीण कार्यालयाच्यावतीने या योजनेची प्रभावी, पारदर्शक अंमलबजावणी आणि वेळेत लाभ देण्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेला कर्जदारांचा तपशील पोटर्लवर माहिती अपलोड करण्याचे आवाहन केले असता बँकेच्यावतीने संपूर्ण कर्जदार खातेदाराची माहिती पोटर्लवर अपलोड केली आहे.
अपलोड करण्यात आलेली तालुकानिहाय कर्जदार खातेदार संख्या:
बँकेकडून कर्ज तपशील अपलोड केलेल्या खातेदारांची संख्या आंबेगाव तालुक्यात ३ हजार ३९०, बारामती १३ हजार ७२८, भोर ७ हजार २४२, दौंड १९ हजार ५६२, हवेली ४ हजार १६८, इंदापूर १८ हजार ८१८, जुन्नर ७ हजार ७७८, खेड ७ हजार ८५३, मावळ ५ हजार १७२, मुळशी २ हजार ३८७, पुरंदर ७ हजार ९०३, शिरुर ८ हजार ४५२ आणि वेल्हा १ हजार ८८८ थकीत कर्ज खातेदार याप्रमाणे आहे.
जिल्ह्यातील ११३ शेतकरी पात्र असूनही मयत असल्याने व अशा शेतकऱ्यांची वारस नोंद न झाल्याने अशा खात्याची माहिती अपलोड करता आलेली नाही. तसेच २९ सभासद लाभ घेण्यास पात्र असूनही त्यांचे आधार क्रमांक उपलब्ध नसल्याने यांची माहिती पोर्टलवर अपलोड करता आलेली नाही. त्यामुळे मयत सभासदांच्या वारसांनी वारस नोंद तात्काळ करुन घ्यावी व आधार क्रमांक नसलेल्या सभासदांनी आधार क्रमांक उपलब्ध करून घ्यावा, जेणे करून त्यांची महिती पोर्टलवर अपलोड करता येईल, असेही आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

