नोव्हेंबर ते जूनसाठी १३ टीएमसी द्या! पुण्याला पिण्याचे पाणी प्रथम मिळालेच पाहिजे

Date:

स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमालेंचे मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन; पाच टीएमसी पाणी कपातीमुळे उन्हाळ्यात पुण्याला पाणीटंचाईचा धोका

पुणे, दि. ५ : खडकवासला धरणसाखळीतून पावसाळ्यात कालवा आणि नदीद्वारे सोडण्यात आलेले पाणी पुणे महापालिकेच्या वार्षिक पाणी कोट्यात धरू नये. तसेच १ नोव्हेंबर २०२६ ते ३० जून २०२७ या आठ महिन्यांच्या कालावधीसाठी पुणे शहराला स्वतंत्रपणे १३ टीएमसी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. कालवा समितीच्या बैठकीत पुण्याच्या पाणी कोट्यात सुमारे पाच टीएमसीची कपात करण्यात आल्याने आगामी उन्हाळ्यात शहरासमोर पाणीटंचाईचे संकट निर्माण होऊ शकते, अशी भीती त्यांनी निवेदनातून व्यक्त केली आहे.

पुणे जिल्ह्याच्या कालवा समितीची बैठक २९ ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत पुणे शहरासाठी १३.२ टीएमसी पाणी कोटा मंजूर करण्यात आला. मात्र, हा कोटा नेमका कोणत्या कालावधीसाठी आहे, याबाबत संभ्रम आहे. महापालिका अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हा कोटा १ जुलै २०२६ ते ३० जून २०२७ या कालावधीसाठी असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. जलसंपदा विभागानेही या वृत्ताचे खंडन केलेले नाही. त्यामुळे पावसाळ्यातील पाणी वापराचाही या वार्षिक कोट्यात समावेश करण्यात आल्याचे स्पष्ट होत असल्याचे भिमाले यांनी म्हटले आहे.

पुणे शहरात नव्याने गावांचा समावेश झाल्याने शहराचे भौगोलिक क्षेत्र वाढले असून लोकसंख्या ७० लाखांच्या पुढे गेली आहे. या लोकसंख्येला दररोज सुमारे १७० एमएलडी पाण्याची गरज आहे. पाणीगळती रोखण्यासाठी महापालिकेची समान पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र, समाविष्ट गावांमधील जुन्या पाणीपुरवठा योजना, वाढते नागरीकरण आणि शहराची भौगोलिक रचना यामुळे पाणीपुरवठ्याचे नियोजन करताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे.

यंदा अल निनोमुळे पावसाचे प्रमाण विस्कळीत राहिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासन आणि जलसंपदा विभागाच्या आदेशानुसार महापालिकेने महिनाभरापासून आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यास सुरुवात केली आहे. पाणी बचतीबाबत जनजागृतीही केली जात आहे. दुसरीकडे, पुढील दोन महिन्यांत जायका नदी सुधार प्रकल्पांतर्गत नऊ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) कार्यान्वित होणार आहेत. त्यामुळे मुंढवा जॅकवेल प्रकल्पातून शेतीसाठी सुमारे ६.५ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.

खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे यंदा शंभर टक्के भरली होती. पावसाळ्यात या धरणांमधून कालवा आणि नदीद्वारे तब्बल १९ टीएमसी पाणी सोडण्यात आले. विशेष म्हणजे पावसाळ्यात सुरू करण्यात आलेल्या कालव्यातून आजही शेतीसाठी पाणी सोडले जात आहे. त्यामुळे धरणसाखळीतील पाणीसाठा २४ टीएमसीपर्यंत खाली आला आहे. या परिस्थितीत पुणे शहराच्या पाणी कोट्याचे योग्य नियोजन होणे आवश्यक असल्याचे भिमाले यांनी म्हटले आहे.

कालवा समितीच्या निर्णयानुसार १ जुलै २०२६ ते ३० जून २०२७ या कालावधीसाठी १३ टीएमसी पाणी मंजूर करण्यात आले आहे. त्यापैकी ऑक्टोबरअखेरपर्यंत ६.३५ टीएमसी पाणी वापरण्यात आले आहे. त्यामुळे जूनअखेरपर्यंत केवळ ७.१५ टीएमसी पाणी शिल्लक राहणार आहे. सध्या १० टक्के पाणीकपात लागू असतानाही शहराची महिन्याची गरज १.५ टीएमसी आहे. त्यानुसार नोव्हेंबर ते जून या आठ महिन्यांसाठी किमान १२ टीएमसी पाणी आवश्यक आहे. मात्र, मंजूर कोट्यामुळे उपलब्ध होणारे पाणी या गरजेच्या तुलनेत अपुरे ठरणार आहे.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे दिवाळीनंतर पुण्यात स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहराच्या पाण्याची मागणी आणखी वाढू शकते. परिणामी, ऐन उन्हाळ्यात पुणेकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. हे संकट टाळण्यासाठी पावसाळ्यात सोडण्यात आलेले पाणी वार्षिक कोट्यातून वगळून नोव्हेंबर ते जून २०२७ या कालावधीसाठी स्वतंत्रपणे १३ टीएमसी पाणी मंजूर करण्याचे आदेश जलसंपदा विभागाला द्यावेत, अशी मागणी भिमाले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० हजार प्रवाशांनी केला प्रवास

दिवाळीच्या सुट्ट्यांमध्येही प्रवाशांचा चांगला प्रतिसाद; गर्दीच्या वेळेत दर पाच...

पुणे महापालिकेच्या बांधकामस्थळांवर सुरक्षा नियमांची सक्ती; त्रुटी आढळल्यास काम बंद करण्याचे आदेश!

दिवाळीच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांचे परिपत्रक;...