दिवाळीच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांचे परिपत्रक; प्रत्येक कामाची सुरक्षा तपासणी अनिवार्य, अपघात झाल्यास कंत्राटदारांची जबाबदारी निश्चित करणार
पुणे, दि. ५ नोव्हेंबर २०२६ (माय मराठी वृत्तसेवा) :
दिवाळीच्या सुट्टीच्या काळात पुणे महापालिकेच्या विविध विभागांमार्फत सुरू असलेल्या बांधकामांवर कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी महापालिका प्रशासनाने विशेष खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत. बांधकामस्थळांवरील कामगारांची सुरक्षा, नागरिकांची सुरक्षित ये-जा, बांधकाम साहित्याची योग्य साठवणूक आणि धोकादायक ठिकाणांची तपासणी करण्याबरोबरच प्रत्येक कामासाठी स्वतंत्र ‘सेफ्टी कम्प्लायन्स चेकलिस्ट’ सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
पुणे महापालिकेचे शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी यासंदर्भात ५ नोव्हेंबर रोजी कार्यालयीन परिपत्रक जारी केले आहे.
सुरक्षा साधने नसतील तर काम सुरू करू नका
महापालिकेच्या विविध विभागांतर्गत रस्ते विकास, जलवाहिन्या, इमारती, पूल आणि इतर पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत.
दिवाळीच्या सुट्टीच्या काळात काही कंत्राटदारांकडे आवश्यक मनुष्यबळ, कुशल कामगार, यंत्रसामग्री आणि सुरक्षा साधनांची उपलब्धता अपुरी राहण्याची शक्यता असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे आवश्यक कर्मचारी, यंत्रसामग्री आणि सुरक्षा साधने उपलब्ध असल्याची खात्री केल्याशिवाय कोणत्याही बांधकामस्थळी काम सुरू करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.
खड्डे, चर आणि धोकादायक भाग सुरक्षित करण्याचे आदेश
काम सुरू असलेल्या ठिकाणी खोदलेले खड्डे, चर, उघड्या जागा, उचलून ठेवलेले साहित्य आणि इतर धोकादायक भाग योग्य पद्धतीने संरक्षित करणे आवश्यक करण्यात आले आहे.
रात्रीच्या वेळी आवश्यक सूचना फलक, रिफ्लेक्टर, ब्लिंकर आणि पुरेशी प्रकाशव्यवस्था असणे बंधनकारक आहे.
सार्वजनिक रस्त्यांवरील बांधकामस्थळी वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आवश्यक उपाययोजनाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
कामगारांना हेल्मेट, सेफ्टी शूज आणि सुरक्षा साधने
बांधकामांवर काम करणाऱ्या कामगारांना हेल्मेट, सेफ्टी शूज, सेफ्टी बेल्ट, रिफ्लेक्टिव्ह जॅकेट आणि आवश्यक वैयक्तिक सुरक्षा उपकरणे उपलब्ध करून देणे कंत्राटदारांना बंधनकारक करण्यात आले आहे.
उंचीवरील कामे, शटरिंग, स्कॅफोल्डिंग, क्रेन आणि इतर धोकादायक यंत्रसामग्रीच्या साहाय्याने सुरू असलेली कामे आवश्यक सुरक्षा उपायांशिवाय करू नयेत.
कामगारांना आवश्यक सुरक्षा प्रशिक्षण देणे आणि विद्युत जोडण्या तसेच उपकरणांची तपासणी करणेही आवश्यक आहे.
दिवाळीच्या सुट्टीत अधिकारी करणार प्रत्यक्ष पाहणी
या परिपत्रकातील महत्त्वाची बाब म्हणजे, केवळ कंत्राटदारांवर सुरक्षा उपायांची जबाबदारी सोपवून महापालिका प्रशासन मोकळे होणार नाही.
संबंधित कनिष्ठ अभियंता, उपअभियंता आणि कार्यकारी अभियंत्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील बांधकामस्थळांना प्रत्यक्ष भेट देऊन सुरक्षा उपायांची तपासणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
सुट्टीच्या काळातही संबंधित जबाबदार अधिकारी आणि सुरक्षा प्रतिनिधी उपलब्ध असल्याची खात्री करण्यास सांगण्यात आले आहे.
एखाद्या ठिकाणी आवश्यक मनुष्यबळ, साहित्य किंवा सुरक्षा व्यवस्था नसल्यास संबंधित बांधकाम तात्काळ थांबवून ठिकाण सुरक्षित करावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
सोळा मुद्द्यांची सुरक्षा तपासणी यादी
महापालिकेने या परिपत्रकासोबत सोळा मुद्द्यांची स्वतंत्र सुरक्षा तपासणी यादी जोडली आहे.
त्यामध्ये कामगारांची सुरक्षा साधने, बांधकामस्थळांवरील बॅरिकेडिंग, नागरिकांसाठी सुरक्षित मार्ग, रात्रीची प्रकाशव्यवस्था, विद्युत जोडण्यांची सुरक्षितता, यंत्रसामग्रीची स्थिती, अग्निशमन साधने आणि आपत्कालीन संपर्कव्यवस्था यांचा समावेश आहे.
प्रत्येक कामाच्या ठिकाणची सुरक्षा तपासणी करून संबंधित कनिष्ठ अभियंता आणि उपअभियंत्यांनी त्यावर स्वाक्षऱ्या कराव्यात, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
तपासणीत त्रुटी आढळल्यास त्या दूर करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी लागणार आहे.
सुरक्षा तपासणीचा अहवाल सादर करणे बंधनकारक
महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी बांधकामस्थळांवरील सुरक्षा तपासणी पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करणे आवश्यक आहे.
सुरक्षा तपासणी यादी आणि आवश्यक प्रमाणपत्रे संबंधित विभागप्रमुख कार्यालयामार्फत शहर अभियंता कार्यालयाकडे दिवाळीची सुट्टी सुरू होण्यापूर्वी सादर करण्याचे निर्देश आहेत.
त्यामुळे कागदोपत्री सुरक्षिततेची हमी देण्याऐवजी प्रत्यक्ष ठिकाणी उपाययोजना झाल्या आहेत का, याची खात्री करणे संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ठरणार आहे.
अपघात झाल्यास कंत्राटदारांची जबाबदारी
परिपत्रकात कंत्राटदारांच्या जबाबदारीबाबतही स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
आवश्यक सुरक्षा उपाययोजना उपलब्ध नसताना काम सुरू ठेवणे किंवा सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्यामुळे अपघात झाल्यास संबंधित कंत्राटदारांची जबाबदारी निश्चित करण्यात येईल.
तसेच करारातील तरतुदी आणि प्रचलित नियमांनुसार संबंधित कंत्राटदारांविरुद्ध आवश्यक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
आदेशांची अंमलबजावणी प्रत्यक्षात किती?
शहर अभियंत्यांनी जारी केलेल्या या परिपत्रकामुळे महापालिकेच्या बांधकामस्थळांवरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
विशेषतः रस्ते खोदकाम, जलवाहिन्यांची कामे, मोठ्या इमारतींचे बांधकाम आणि सार्वजनिक वाहतुकीलगत सुरू असलेल्या कामांमध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
आता महापालिकेच्या किती बांधकामस्थळांची प्रत्यक्ष तपासणी झाली, किती ठिकाणी सुरक्षा त्रुटी आढळल्या आणि किती कामे थांबवण्यात आली, याची माहिती प्रशासनाकडून पुढे येणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सुरक्षा नियमांची अंमलबजावणी ही केवळ परिपत्रकापुरती मर्यादित न राहता प्रत्यक्ष बांधकामस्थळांवर दिसली पाहिजे. अन्यथा अपघात झाल्यानंतर जबाबदारी निश्चित करण्यापेक्षा अपघात रोखण्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जाईल.

