के. बी. जोशी पथावरील वाहतूक सुलभ होणार
पुणे, ५ नोव्हेंबर : साखर संकुल ते जुना पुणे-मुंबई रस्त्यादरम्यान उड्डाणपूल अथवा ग्रेड सेपरेटर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकल्पासाठी ७६ कोटी ८० लाख रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. यामुळे के. बी. जोशी पथावरून जुना पुणे-मुंबई रस्त्याकडे जाणारी वाहतूक सुलभ होण्यास मदत होणार आहे. या प्रस्तावाला मान्यता दिल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.
महापालिकेच्या प्रकल्प विभागामार्फत हे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी ७३ कोटी ५१ लाख रुपयांचे पूर्वगणनपत्रक तयार करण्यात आले होते. त्याला तांत्रिक छाननी समितीने नोव्हेंबर २०२५ मध्ये मान्यता दिली होती. त्यानंतर ६१ कोटी ८९ लाख रुपयांच्या कामासाठी निविदा मागविण्यात आल्या. निविदांची छाननी करून संबंधित कंपनीची निवड करण्यात आली आहे.
या प्रकल्पासाठी निविदेतील रकमेसह ११ कोटी ६४ लाख रुपये जीएसटी, ४१ लाख ८२ हजार रुपये रॉयल्टी आणि सहा लाख ६० हजार रुपये साहित्य चाचणी शुल्क असा एकूण ७६ कोटी ८० लाख ३३ हजार ९३२ रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या खर्चाला तसेच संबंधित कंपनीसोबत करार करण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.
साखर संकुल परिसरातून जुना पुणे-मुंबई रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. उड्डाणपूल अथवा ग्रेड सेपरेटरमुळे या मार्गावरील वाहतूक अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर आता प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे भिमाले यांनी सांगितले,

