पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; नदीपात्रात न उतरण्याचे आवाहन
चार धरणांत १९.२६ टीएमसी पाणीसाठा; टेमघरमध्ये सर्वाधिक १४० मिमी पावसाची नोंद
पुणे, दि. २२ : खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. बुधवारी सकाळी सात वाजता खडकवासला धरण ७३ टक्के क्षमतेने भरले असून, पावसाचा जोर आणि धरणात येणारा येवा लक्षात घेता येत्या काही तासांत धरण ८० टक्के किंवा त्याहून अधिक क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाच्या परिस्थितीनुसार धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू केला जाऊ शकतो, असा सावधानतेचा इशारा खडकवासला पाटबंधारे विभागाने दिला आहे.

नदीपात्रात कोणीही उतरू नये तसेच नदीपात्रातील जनावरे, वाहने किंवा अन्य साहित्य तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सखल भागातील नागरिकांना पूर्वसूचना देऊन संबंधित यंत्रणांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असेही कार्यकारी अभियंत्यांनी कळविले आहे.

सकाळी सहा वाजता खडकवासला ७१.५६ टक्के
बुधवारी सकाळी सहा वाजताच्या नोंदीनुसार खडकवासला धरणात १.४१ टीएमसी म्हणजेच ७१.५६ टक्के पाणीसाठा होता. धरण क्षेत्रात मागील २४ तासांत २७ मिमी, तर हंगामात एकूण ४६७ मिमी पाऊस झाला. धरणात २६९ दशलक्ष घनफूट पाण्याची वाढ नोंदविण्यात आली.
खडकवासला धरणातून नवीन मुठा उजवा कालव्यातून १,०५४ क्युसेक, तर पुणे महापालिकेसाठी ५३८ क्युसेक पाणी सोडण्यात येत होते. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून आतापर्यंत एकूण १.५१ टीएमसी पाणी सोडण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
सकाळी सहा वाजता धरण ७१.५६ टक्के होते. त्यानंतर पाण्याची आवक कायम राहिल्याने सकाळी सात वाजता पाणीसाठा ७३ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचे पाटबंधारे विभागाच्या सतर्कता संदेशात नमूद करण्यात आले आहे.

पानशेत ७०.९९ टक्के
पानशेत धरण परिसरात मागील २४ तासांत ८० मिमी, तर हंगामात एकूण १,२१९ मिमी पावसाची नोंद झाली. धरणात ७.५६ टीएमसी म्हणजे ७०.९९ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. धरणात ३९८ दशलक्ष घनफूट पाण्याची वाढ झाली.
पानशेत धरणाच्या विद्युतगृहातून किंवा सांडव्यावरून सकाळी सहा वाजता पाण्याचा विसर्ग सुरू नव्हता.

वरसगावमध्ये ८.४७ टीएमसी पाणीसाठा
वरसगाव धरण क्षेत्रात ७९ मिमी पाऊस झाला असून, हंगामातील एकूण पाऊस १,१८१ मिमी झाला आहे. धरणात ८.४७ टीएमसी म्हणजेच ६६.११ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणातील पाण्याची वाढ ५४६ दशलक्ष घनफूट नोंदविण्यात आली.
वरसगाव धरणाच्या सांडव्यावरून तसेच उच्च व निम्न स्तरावरील द्वारांतून कोणताही विसर्ग सुरू नव्हता.
टेमघरमध्ये १४० मिमी पाऊस
चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रांपैकी टेमघर धरण परिसरात सर्वाधिक १४० मिमी पाऊस झाला. हंगामात आतापर्यंत १,५३६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. टेमघर धरणात १.८१ टीएमसी म्हणजेच ४८.९१ टक्के पाणीसाठा झाला असून, धरणात १६७ दशलक्ष घनफूट पाण्याची वाढ झाली.

चार धरणांत १९.२६ टीएमसी पाणी
खडकवासला धरणसाखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांतील एकत्रित पाणीसाठा १९.२६ टीएमसी म्हणजे ६६.०८ टक्के झाला आहे. चार धरणांतील एकूण पाण्याची आवक १,३८० दशलक्ष घनफूट नोंदविण्यात आली.
गेल्या वर्षी याच दिवशी चारही धरणांत २३.११ टीएमसी म्हणजे ७९.२८ टक्के पाणीसाठा होता. यंदाचा पाणीसाठा गेल्या वर्षाच्या तुलनेत ३.८५ टीएमसीने कमी आहे.
नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे
खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचे प्रमाण आणि वाढणारी आवक लक्षात घेता प्रशासनाने नदीकाठच्या तसेच सखल भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. धरणातून विसर्ग सुरू झाल्यास मुठा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पाटबंधारे विभाग आणि प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे.

