जंतरमंतरवरील आंदोलनाला ठाकरे यांची भेट; ‘केवळ सत्ताबदल नव्हे, संपूर्ण व्यवस्था बदलावी लागेल’
नवी दिल्ली : दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर सुरू असलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मंगळवारी रात्री आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांशी संवाद साधत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. “देशाच्या भविष्यावर लाठ्या चालवणाऱ्या सरकारला सत्तेतून उलथवून टाकण्याची वेळ आली आहे,” असे आवाहन त्यांनी केले.उद्धव ठाकरे रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास आंदोलनस्थळी पोहोचले. ते मंचावर येताच आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या अभिजीत दिपके यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर आंदोलकांनी घोषणाबाजी करत ठाकरे यांचे स्वागत केले.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “मी देशाच्या युवाशक्तीला नमन करण्यासाठी येथे आलो आहे. अभिजीतने पेटवलेली ही ठिणगी सहज विझणारी नाही. स्वातंत्र्यानंतर प्रथमच देशाच्या भविष्यावरच लाठ्या चालविल्या जात असल्याचे आपण पाहत आहोत. तुम्ही केवळ युवक नाही, तर या देशाचे भविष्य आहात.”
‘हा देश संघर्ष करणाऱ्या क्रांतिकारकांनी उभा केला’
स्वातंत्र्यलढ्याचा उल्लेख करत ठाकरे म्हणाले की, हा देश कोणत्याही एका पक्षाने किंवा व्यक्तीने निर्माण केलेला नाही. देशाच्या स्वातंत्र्यासाठी असंख्य क्रांतिकारकांनी संघर्ष केला आणि त्याग केला. त्यावेळीही संघर्ष करणाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने बदनाम करण्यात आले होते.
“आज आपल्या हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्या तरुणांकडेही संशयाने पाहिले जात आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुन्हेगार समजणारे लोक नेमके कोण आहेत?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

आंदोलकांवरील कारवाईचा निषेध
आंदोलकांवर करण्यात आलेल्या कथित लाठीमाराचा निषेध करताना ठाकरे म्हणाले, “सरकारने आंदोलकांशी अमानुषपणे वागू नये. शांततेच्या मार्गाने आपले प्रश्न मांडणाऱ्या युवकांवर बळाचा वापर करणे चुकीचे आहे. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल असल्याने नेमके काय घडले, हे देशासमोर येत आहे.”
अभिजीत दिपके यांनी आंदोलनादरम्यान मारहाण करणाऱ्या एका व्यक्तीचे छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केल्याचाही ठाकरे यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला.

‘आज ते खुर्चीत; उद्या तुम्ही असाल’
आंदोलकांना प्रोत्साहन देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “आज सत्ताधारी खुर्चीवर बसले आहेत; मात्र उद्या तुमच्यापैकी अनेक जण त्या खुर्च्यांवर बसतील. देशाचे भविष्य तुमच्या रूपाने माझ्यासमोर उभे आहे. त्यामुळे अन्यायासमोर झुकू नका.”
स्पर्धा परीक्षा, पेपरफुटी आणि बेरोजगारीच्या प्रश्नांकडे लक्ष वेधत त्यांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या व्यवस्थेविरोधात दीर्घकाळ संघर्ष करण्याचे आवाहन केले.

‘केवळ एक व्यक्ती नाही, पूर्ण व्यवस्था बदला’
उद्धव ठाकरे म्हणाले, “निवडणुकांना अजून दोन-तीन वर्षे असली तरी आपल्याकडे संघर्षासाठी पुरेसा वेळ आहे. आता आपला तप सुरू झाला आहे. केवळ एखाद्या व्यक्तीला सत्तेतून बाहेर काढून प्रश्न सुटणार नाहीत. संपूर्ण व्यवस्थाच बदलावी लागेल. सरकार आणि त्यांची कार्यपद्धती बदलेपर्यंत सामान्य नागरिकांच्या आयुष्यात अपेक्षित बदल होणार नाही.”

‘वन नेशन, वन इमोशन’
महाराष्ट्रातील जनता आंदोलकांच्या पाठीशी असल्याचे सांगत ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्राचा तरुण या आंदोलनाचे नेतृत्व करीत आहे, याचा मला अभिमान आहे. मी तुम्हाला हिंमत देण्यासाठी आलो आहे आणि तुमच्याकडूनही हिंमत घेऊन जाणार आहे.”
“धर्माच्या नावाने देशात भिंती उभ्या करण्याचा प्रयत्न झाला; मात्र युवकांच्या एकजुटीमुळे त्या भिंती आता कोसळत आहेत. आज देशाची भावना एक आहे—‘वन नेशन, वन इमोशन’. या संघर्षात आम्ही शेवटपर्यंत तुमच्या पाठीशी उभे राहू,” असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

