नवी दिल्ली : नीट पेपरफुटी आणि दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्ज प्रकरणी काँग्रेस प्रचंड आक्रमक झाली असून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या खासदारांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन केलं. तीन तासांहून जास्त काळ राहुल गांधी आणि त्यांच्या खासदारांनी पंतप्रधानांच्या निवासस्थाबाहेर आंदोलन केलं. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह आंदोलन करणाऱ्या काँग्रेसच्या खासदारांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्र सरकार संसदेत चर्चा करण्यासाठी तयार असल्याची माहिती आहे. मात्र केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीवर राहुल गांधी ठाम असल्याची माहिती समोर येत आहे. केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्याशी झालेल्या चर्चेनंतरही राहुल गांधींनी त्यांचे पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरचं आंदोलन सुरूच ठेवलं. त्यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापल्याचं दिसून आलं.

पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरून काँग्रेसचे खासदार हटत नसल्याचं दिसताच दिल्ली पोलिसांनी कारवाई सुरू केली. सुरुवातीला त्यांनी काँग्रेसच्या खासदारांना आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर राहुल गांधी यांच्यासह प्रमुख नेत्यांनाही ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. राहुल गांधी यांना ताब्यात घेतल्यानंतर महिला पोलिसांनी प्रियंका गांधी यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी प्रियंका गांधी यांनी जोरदार प्रतिक्रिया केल्याचं दिसून आलं. त्या आधी पोलिसांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनाही ताब्यात घेतलं.
नीट पेपरफुटीवर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागण्यासाठी नवी दिल्लीतील सुरू झालेल्या आंदोलनाने आता व्यापक स्वरुप धारण केल्याचं दिसतंय. एकीकडे अभिजीत दिपके यांनी जंतर मंतरवर आंदोलन तीव्र केल्यानंतर त्याला आता राजकीय बळही मिळताना दिसत आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज का केला, असा प्रश्न विचारत राहुल गांधींनी काँग्रेसच्या खासदारांसह थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचे निवासस्थान गाठल्याचं दिसून आलं. त्यावेळी शिक्षण मंत्र्यांसोबत आता पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनीही राजीनामा द्यावा अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.
नीट पेपरफुटीची जबाबदारी घेऊन शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत कॉकरोच जनता पार्टीच्या विद्यार्थ्यांनी संसदेवर मोर्चा काढण्याचं नियोजन केलं होतं. मात्र दिल्ली पोलिसांनी आणि सुरक्षा रक्षकांनी विद्यार्थ्यांना संसदेपर्यंत पोहोचू दिलं नाही. या परिसरात पोहोचलेल्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला. या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ अभिजीत दिपके यांनी जंतर मंतरव आंदोलन सुरू केलं आहे.
राहुल गांधी खासदारांसह धडकले
आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना जरी पोलिसांनी संसदेपर्यंत पोहोचू दिलं नसलं तरी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मात्र सुरक्षा रक्षकांना चकवा देत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं घर गाठलं. यावेळी त्यांच्यासोबत प्रियंका गांधी, काँग्रेसचे खासदार आणि नेते उपस्थित होते. राहुल गांधी आणि त्यांच्या खासदारांनी पंतप्रधानांच्या घराला घेरावा घातला. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज का केला असा सवाल राहुल गांधी यांनी केला. तसेच मोदी सरकारमध्ये ज्या चुकीच्या गोष्टी घडत आहेत, त्याची जबाबदारी कुणी घेणार आहे की नाही? असा सवालही राहुल गांधी यांनी विचारला.
पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा
नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. तसेच विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाचा आदेश देणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राजीनामा द्यावा, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली. एकीकडे राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी घेरावा घातला असताना त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन हे पोहोचले. जितेंद्र सिह यांनी राहुल गांधी यांच्यासोबत सुमारे अर्धा तास चर्चा केली आणि पंतप्रधानांच्या घराबाहेर सुरू असलेले आंदोलन थांबवावे अशी मागणी केली. त्यावेळी राहुल गांधी यांनीही त्यांच्या बाजू मांडली.

सुमारे अर्धा तासांच्या चर्चेनंतरही राहुल गांधी हे आंदोलनावर ठाम होते. त्यानंतर जितेंद्र सिंह आणि केंद्रीय गृहसचिव हे आंदोलनाच्या ठिकाणाहून निघून गेले. जितेंद्र सिंह सरकारचा निरोप घेऊन पुन्हा पोहोचले
केंद्र सरकार नीट पेपरफुटीबाबत संसदेत चर्चा करण्यासाठी तयार असल्याचा निरोप घेऊन जितेंद्र सिंह पुन्हा आले. पण आपल्याला केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हवा आहे. त्यांचा राजीनामा झाल्याशिवाय इथून हटणार नाही, अशी भूमिका राहुल गांधी यांनी मांडली. यानंतर काही वेळाने पोलिसांचा मोठा फौजफाटा पंतप्रधानांच्या कार्यालयाबाहेर आला. पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरची सुरक्षा वाढवण्यात आली. यानंतर पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड करण्यात आली.
राहुल गांधींना पोलिसांना घेतलं ताब्यात
जवळपास साडेतीन तास आंदोलन चालल्यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा पंतप्रधान निवासस्थानाबाहेर आला. पोलिसांनी आंदोलक आणि नेत्यांची धरपकड केली. पोलिसांनी आधी रणदीपसिंह सुरजेवाला यांना ताब्यात घेतलं. यासोबत इतर खासदारांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी राहुल गांधी यांनादेखील ताब्यात घेतलं. यावेळी राहुल गांधी यांनी पोलिसांचा जोरदार प्रतिकार केला. राहुल गांधी पोलिसांचा प्रतिकार करण्यासाठी अक्षरश: रस्त्यावर झोपले. पण त्यांचा प्रतिकार पोलीस बळापुढे कमी पडला आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

