पुणे-पुण्यातील सहकारनगर भागात टोळक्याने मध्यरात्री दहशत माजवत चार मोटारींची तोडफोड केली. मल्हार मार्तंड सोसायटीत घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी 18 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नीलेश उमेश मोहिते (वय 38, रा. मल्हार मार्तंड सोसायटी, सहकारनगर क्रमांक एक, पद्मावती) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (13 जुलै) मध्यरात्री एकच्या सुमारास वेगवेगळ्या दुचाकींवरून आलेल्या टोळक्याने सोसायटीच्या आवारात प्रवेश केला.
या टोळक्याने सोसायटीतील रहिवाशांना शिवीगाळ करत आरडाओरडा केला. त्यांनी शस्त्रे उगारून दहशत निर्माण केली आणि आवारात लावलेल्या चार मोटारींच्या काचा फोडल्या. त्यानंतर हे टोळके दुचाकींवरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त गजानन पवार आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे. सहायक पोलिस निरीक्षक श्रीकांत संघर्षी या प्रकरणाचा तपास करत आहेत.
दरम्यान, वारजे भागातील रामनगर परिसरात टोळक्याकडून दाम्पत्याला मारहाण केल्याची आणखी एक घटना घडली आहे. या प्रकरणी प्रथमेश जाधव, यश जाधव यांच्यासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुमार नागनाथ जाधव (वय 41, रा. वर्धमान टाऊनशिप, ससाणेनगर, हडपसर) यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, जाधव यांची बहीण आणि मेहुणे वाढदिवस साजरा करून रामनगरमधील वेताळबाबा चौकातून जात असताना टोळक्याने त्यांची दुचाकी अडवली. टोळक्याने जाधव यांच्या बहीण आणि मेहुण्याला शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. पोलिस उपनिरीक्षक हंस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

