हास्यकवींच्या विडंबनगीतांना, कोपरखळी मारणाऱ्या तिरकस कवितांना रसिकांची दाद
पुणे – घराघरातले दैनंदिन समरप्रसंग, नवरा-बायकोची भांडणे, कोवळ्या वयातली प्रेमभंग प्रकरणे इथपासून ते थेट राजकीय कोपरखळ्या मारणारे लाडकी बहीण, महाविकास आघाड्या, इटलीचे संदर्भ…असे विषयांचे वैविध्य जपणारी हास्यमैफल पुणे नवरात्रौ महोत्सवात शनिवारी सायंकाळी रंगली. हास्यकवींच्या विनोदी ढंगाच्या सादरीकरणाला रसिकांनीही मनमोकळी दाद दिली.
पुणे नवरात्रौ महोत्सवाची सहावी माळ नेहरू स्टेडियम येथील गणेश कला क्रीडा मंदिरात हास्यमैफिलीच्या रूपाने गुंफली गेली. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील तसेच एकपात्री कलाकार मकरंद टिल्लू आणि पुणे नवरात्रौ महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष आबा बागुल उपस्थित होते. हर्षवर्धन पाटील आणि मकरंद टिल्लू यांच्या हस्ते हास्यकवींचा सत्कार करण्यात आला.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, मी या महोत्सवाचाच एक घटक आहे. गेल्या ३२ वर्षांत मी २५ वेळा तरी या महोत्सवाला उपस्थिती लावली आहे कारण मी महोत्सवाचाच एक घटक आहे, असे मानतो. महोत्सवाचे आयोजक आबा बागुल यांच्याविषयी ते म्हणाले, समाजात आरंभशूर अनेक असतात. पण आबांनी वेगळेपण आणि सातत्य जपले आहे, हे महत्त्वाचे आहे. आपल्याला लोकशाही मिळाली आहे, अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे. पैसा आहे, प्रतिष्ठा, पदे आहेत, पण तरीही आपले हास्य हरवले आहे, असे चित्र दिसते आहे. या पार्श्वभूमीवर ही हास्यमैफल उत्तरोत्तर रंगत जावो आणि हसू फुलवत राहो…
हास्यकवी अनिल दीक्षित, डाॅ. दिलीप कुलकर्णी, स्वाती सुरंगळीकर, संदीप अवचट, भालचंद्र कोळपकर आणि बंडा जोशी यांनी आपल्या विनोदी ढंगाच्या कवितांनी या हास्यमैफिलीचे रंग खुलवले.
दीक्षित यांच्या ‘गुलाबी साडी’ने रसिकांना मनमुराद हसवले आणि नोटाबंदीच्या संदर्भांनी वेगळीच दशकपूर्ती अनुभवली. डाॅ. कुलकर्णी यांच्या कवितांनी मूळ प्रसिद्ध गीतांचे संदर्भ जागवले. पहाटे पहाटे मला जाग आली, या सुरेश भट यांच्या कवितेचे विडंबन त्यांनी पहाटे पहाटे मला झोप आली, हिची घोरण्याची क्रिया मंद झाली, अशा शब्दांत ऐकवून हास्यलकेरी उठवल्या.
तसेच ग. दि. माडगूळकरांची पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी, या गीताचे विडंबन त्यांनी
पोत्याइतुका खिसा पाहिजे, अशा शब्दांत सादर केले. देणाऱ्यांना रोग हजारो, इवली माझी गोळी, असे वास्तवही त्यांनी ऐकवले.
स्वाती सुरंगळीकर यांनी ‘घरचा आहेर’ या कवितेतून वरमाईचा लोभीपणा आणि तिला घरच्यांची घडवलेली अद्दल, असा विषय मांडला. नवर्याची चलाखी सांगणारी ‘तूच माझी राणी’ ही त्यांची कविताही उल्लेखनीय होती.
संदीप अवचट यांनी राजकीय संदर्भांवर व्यंगात्मक भाष्य करणारे सादरीकरण केले. भाकर आणि पिझ्झा तसेच लाडकी बहीण, असे विषय त्यांनी विनोदाच्या अवगुंठणातून मांडले. महाविकासात कुठून आणायची निष्ठा, असा प्रश्न विचारणारी त्यांची कविता होती. त्यांनी ऐकवलेली ‘मीच म्हणून टिकले बाई तुमच्या या संसारी’, ही कविताही घराघरातले चित्र मांडणारी होती.
भालचंद्र कोळपकर यांनी सिनेनटीशी लग्न करण्याचा व्यर्थ प्रयत्न करणाऱ्या हीरोच्या माध्यमातून हलकाफुलका विनोद मांडला. तसेच प्रपंचात भांडण ही किती आवश्यक गोष्ट आहे, हेही कथन केले.
हास्यकवी बंडा जोशी यांनी (मोबाईल)चं याड लागलं, ही कविता आपले सारे जगणे व्यापून टाकलेल्या यंत्राचे वास्तव मांडत उलगडत नेली. ग. दि. माडगूळकरांचे ‘एक धागा सुखाचा’, या गाण्यावरील एक कपडा पतीचा, शंभर अर्धांगिनीचे, गतजन्मीचे देणे असते दुकानदारांचे…अशा शब्दांत नवरे लोकांची व्यथा मांडली. त्यांनी रिमझिम पाऊस पडे सारखा, या गीतावरील
रिप रिप पाऊस पडे बारका
तरि खड्ड्यांची रांग पुढे
खड्डेच खड्डे चहूकडे गं बाई गेला रस्ता कुणीकडे, हे विदारक वास्तव सांगणारी कविता सादर करून टाळ्या मिळवल्या.

