पुणे ता. १६ : राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले, मात्र भारतीय जनता पार्टीच्या किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन स्थळी गोमूत्र शिंपडून आपली वैचारिक दारिद्रता दाखवून दिली आहे. या कार्यकर्त्यांनी स्वत:च्या मेंदूवर गोमूत्र शिंपडावे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ता सुनील माने यांनी केली आहे.
याबाबत बोलताना ते म्हणाले, या सरकारने केलेली ही कर्जमाफी अत्यंत फसवी असल्याने आम्हाला रोहित पवारांच्या नेतृत्वात आंदोलन करावे लागले. सरकारच्याच आकडेवारीवरून ही कर्जमाफी फसवी असल्याचे स्पष्ट होते. कर्जमाफी दिल्यानंतर मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९९ टक्के लोकांना या कर्जमाफीचा कोणताही तोटा होणार नाही असे वक्तव्य केले होते. लोकांच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री ७० टक्के लोकांना याचा काहीही तोटा होणार नाही असे म्हणाले. मात्र प्रत्यक्षात सरकारच्या आकडेवारीनुसार ७० % शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ होणार नाही हे स्पष्ठ होते.
शेतकऱ्यांच्या या समस्यांसाठी रोहित पवार यांनी पंढरपूर येथे आंदोलन केले होते. त्यांच्या आंदोलनाला अनेक शेतकरी नेते, विविध शेतकरी संघटना तसेच शेतकरी बंधु भगिनींनी प्रत्यक्षात भेटून तसेच विविध माध्यमातून पाठिंबा दिला. वास्तविक भारतीय जनता पार्टीच्या किसान संघाच्या वतीने आंदोलन केले पाहिजे होते. मात्र उलटपक्षी त्यांनी गोमूत्र शिंपडून आंदोलन स्थळ पवित्र करण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षात गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण, पवित्र होत नाही. यातून भाजपच्या वैचारिक दिवाळखोरीचे प्रदर्शन दर्शन होते. अशी शुद्ध अशुद्ध जागा कशानेही होत नसते. हे वैदिक परंपरेचे थोतांड आहे. ही कृती अतिशय निर्भत्सना आणि टीका करणे योग्य आहे. आम्ही याचा कडक शब्दात निषेध करतो. मुख्यमंत्र्यांनी अटी मागे घेण्याचे आश्वासन दिले हेच शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांनी केलेल्या आंदोलनाचे यश आहे. त्यामुळेच बहुधा लोकांना पोटशूळ होत आहे असे ते म्हणाले.

