“तुम्ही मरा इकडे सगळे…”; पर्यावरण आणि पाण्याच्या प्रश्नावर संताप……….राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलेल्या वृक्षवाटपाच्या उपक्रमाबाबत बोलताना शर्मिला ठाकरे यांनी पर्यावरणाच्या गंभीर प्रश्नावरही सरकारला धारेवर धरले. “ही नवीन झाडं वाढायला १०० वर्षे लागतात. आम्ही झाडे लावू, पण तुम्ही जी झाडे तोडत आहात, ती १००-२०० वर्षे जुनी आहेत. आपल्याला लागणारा ऑक्सिजन याच झाडांकडून मिळतो. आज पावसाला उशीर झालाय, जमिनीतील पाण्याची पातळी पार तळाला पोहोचली आहे, पण कोणाला काहीही पडलेली नाही. ‘आम्हाला आमचे पैसे कमवायचे आहेत, आमची मुले परदेशात जाऊन सेटल झाली आहेत, तुम्ही मरा इकडे सगळे’ अशीच या लोकांची वृत्ती झाली आहे,” अशी टीका त्यांनी केली.
मुंबई-भाजपच्या पक्षफोडीच्या राजकारणावर जोरदार हल्कला करताना रताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या, “त्यांना आता तेवढंच करायचं राहिलं आहे—दुसरे पक्ष फोडायचे! दुसऱ्यांची मुलं चोरण्यापेक्षा तुम्ही तुमची मुलं मोठी करा ना. भारतीय जनता पक्ष, आरएसएस आणि विश्व हिंदू परिषदेत काम करणारी खूप चांगली मुलं होती, कुठे गेली ती आता? त्यांनी आता फक्त दुसऱ्यांच्या सतरंज्याच उचलायच्या का?” असा सवाल शर्मिला ठाकरे यांनी उपस्थित केला.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर, आज राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी महिलांना घरगुती पिठाच्या चक्की (गिरणी) वाटप केल्या. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना शर्मिला ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप), त्यांची ‘पक्षफोडीची’ राजनीती आणि सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या कथित ‘ऑपरेशन टायगर’ च्या प्रश्नावर बोलताना त्यांनी भाजपच्या कार्यपद्धतीचे वाभाडे काढले.
“तिथे बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा पक्ष फोडला, इथे उद्धव ठाकरेंचा फोडला, शरद पवार साहेबांचा फोडला. त्यापेक्षा आम्ही जसं आमचा पक्ष फुटल्यानंतर आमची नवीन मुलं उभी करतो, तसं तुम्ही तुमचं कर्तृत्व दाखवा ना. तुमच्या पक्षात जी चांगली मुलं काम करतायत, त्यांना मोठं करा,” असा खोचक सल्ला शर्मिला ठाकरे यांनी भाजपला दिला.
केवळ राजकीय टीका न करता, शर्मिला ठाकरे यांनी कोकणातील ‘चिपी विमानतळाच्या’ सद्यस्थितीकडे आणि महागाईकडेही लक्ष वेधले. “पेट्रोल शंभर रुपयांच्या पुढे गेलं आहे. ज्या समस्यांसाठी भाजप १२ वर्षांपूर्वी रस्त्यावर उतरून आंदोलने करत होता, त्याबद्दल आज कुणी चकार शब्दही बोलायला तयार नाही,” असे त्यांनी म्हटले.
चिपी विमानतळाबाबत बोलताना शर्मिला ठाकरे यांनी म्हटले की, “माझ्याकडे काल कोकणातील एक मराठी ज्वेलर्स आले होते, त्यांनी सांगितले की सिंधुदुर्गचे चिपी एअरपोर्ट बंद झाले आहे. चीपीची सगळी विमाने फुल जात होती, तरीही ते बंद का केले? गोव्याचे टुरिझम कमी झाले म्हणून? मग हे एअरपोर्ट बांधता कशाला? नवी मुंबई, पुणे, पुरंदर… एका एअरपोर्टसाठी ५० हजार कोटी खर्च येतो. हे पैसे आपल्या टॅक्सचे आहेत. मोदी साहेब आल्यापासून किती नवीन एअरपोर्ट झाले आणि त्यातील किती बंद पडले, याची माहिती पत्रकारांनी काढून आवाज उठवला पाहिजे.”

