मुंबई-महाराष्ट्र विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनाचे सविस्तर वेळापत्रक ठरवण्यासाठी आज मुंबईत पार पडलेली ‘कामकाज सल्लागार समितीची’ महत्त्वाची बैठक आता संपली आहे. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, राज्याचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ या कालावधीत मुंबईत होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत अधिवेशनाचा कालावधी निश्चित करण्यात आला असून, आगामी पावसाळी अधिवेशनाचे कामकाज एकूण तीन आठवडे चालणार आहे. या तीन आठवड्यांच्या कालावधीत अनेक महत्त्वाची विधेयके, जनहिताचे प्रश्न आणि शासकीय कामकाज पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.सध्या राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जमाफी, आगामी निवडणुका आणि राजकीय घडामोडी पाहता हे तीन आठवड्यांचे पावसाळी अधिवेशन अत्यंत वादळी ठरण्याची शक्यता आहे. विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून सरकारला कोंडीत पकडण्याची तयारी केली असून, सत्ताधारी पक्ष देखील विरोधकांना चोख उत्तर देण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे २२ जूनपासून मुंबईत हायव्होल्टेज राजकीय रणसंग्राम पाहायला मिळणार आहे.

