पुणे-पुण्यात पावसाने अद्यापही एन्ट्री केलेली नाही पण या पार्श्वभूमीवर पुण्याच्या नदीपात्रात घोड्यांचे तबेले अन घोडागाड्यांचे अतिक्रमण आता कायमच दिसून येऊ लागले असून क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी तक्रार करताच अतिक्रमण विभागाचे सोमनाथ बनकर
यांनी तातडीने यावर कारवाई केली आहे. मात्र हि कारवाई तेवढ्यापुरती ठरणार यात पुणेकरांना कोणतीही शंका उरलेली नाही .
याबाबत क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी म्हटले आहे कि,’बाबा भिडे पुल ते राजपूत वीट भट्टी ह्या नदीपात्रातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत विक्रेत्यांनी दुकानं थाटली आहेत. अधूनमधून नागरिकांनी तक्रारी केल्या की कारवाई चा फार्स केला जातो आणि पुन्हा ” आहे ते आहेच ” !!आता तर बाबा भिडे पुलाजवळ जेथे खाद्य पदार्थांची चौपाटी आहे तेथे किमान 20 घोडागाड्या उभ्या असतात आणि पुलाखाली तर तबेलाच झाला आहे. येथे घोडे बांधलेले असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. अर्थातच यांस मनपा प्रशासनाने कोणतीही परवानगी दिलेली नसावी असा आमचा समज आहे.पुणेकरांना आता याची सवय झाली असून ” हे असेच चालायचे ” असं म्हणून नागरिक निमूटपणे सहन करतात. या उद्योगामागील अर्थपूर्ण संबंधाची माहिती सर्वांनाच आहे,मात्र ” अतिक्रमण ” या विषयावरील पुणेकरांच्या भावना तीव्र असून नागरिकांचे मौन ही वादळापूर्वीची शांतता आहे याची नोंद घ्यावी.असेही त्यांनी म्हटले आहे.


