भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या वतीने विनामूल्य कार्यशाळेचे आयोजन
पुणे : कलाकाराच्या जीवनात रियाजाचे महत्व अनन्यसाधारण आहे. कोणतीही कला परिपक्व होण्यासाठी रियाज अतिशय आवश्यक आहे. रियाजमधूनच उत्तम कलाकार जन्म घेतो. रियाझ कलाकाराची कला परिपूर्ण करतो, असे मत प्रख्यात कथक नृत्य कलाकार प्रेरणा श्रीमाली यांनी व्यक्त केले.
भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या वतीने प्रख्यात कथक नृत्य कलाकार प्रेरणा श्रीमाली यांच्या विनामूल्य दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन भारती विद्यापीठाच्या एरंडवणे शैक्षणिक संकुलात करण्यात आले होते. यावेळी स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे संचालक प्रा. शारंगधर साठे यांच्यासह डॉ.देविका बोरठाकूर, लीना केतकर, प्रसिद्ध गायिका डॉ.अंजली मालकर, कथक नृत्यांगना डॉ.नीलिमा हिरवे, भरतनाट्यम गुरू डॉ. स्वाती दैठणकर आणि आभा सोमण यावेळी उपस्थित होते.
जयपूर घराण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी सांगून प्रेरणा श्रीमाली यांनी विलंबित तालाचे महत्त्व सांगितले. कथक प्रकारातील थाटाचे सौंदर्य त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. त्यांचे गुरुजी कुंदनलाल गंगानीजी यांनी शिकविलेला थाट आणि आमद देखील विद्यार्थ्यांना त्यांनी शिकवले. अभिनयाच्या बारकाव्यावर आणि अभिनयाला वास्तवाशी जोडून कसे सादर करायचे या संदर्भात त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रा.शारंगधर साठे म्हणाले, विविध क्षेत्रातील दिग्गज कलाकारांशी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष संवाद साधता यावा आणि त्यांच्या कलेची देवाणघेवाण करता यावी यासाठी आम्ही कार्यशाळा आयोजित करतो. यामुळे विद्यार्थ्यांना कलेच्या क्षेत्रामध्ये प्रवास करताना प्रेरणा मिळते आणि आपल्याला कोणत्या प्रकारचे उद्दिष्ट गाठायचे आहे याचीही कल्पना येते. संस्थेच्या माध्यमातून आम्ही केवळ क्लासरूम शिक्षणावर भर देत नाही तर प्रत्यक्ष कलेचा प्रवास विद्यार्थ्यांना आत्मसात करता आले पाहिजे, यासाठी कार्यशाळांचे आयोजन करतो. त्यामधून महाविद्यालयातून अनेक मोठे कलाकार घडले आहेत.