सातारा (प्रतिनिधी): सत्ता गेल्याच्या नैराश्यातून महाराष्ट्रात दुही व अशांतता निर्माण करण्याचा महाविकास आघाडी जाणीवपूर्वक प्रयत्न करत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.
उपाध्ये म्हणाले की, महाविकास आघाडीकडून काल महाराष्ट्रात जोडे मारो आंदोलनाचा प्रयत्न झाला. परंतु, राज्यातील जनताच आगामी विधानसभा निवडणुकीत या तिन्ही पक्षांना उत्तर देणार आहे. मालवणची घटना दुर्दैवी आहेच. या घटनेचे समर्थन कुणीच करणार नाही. परंतु, त्या निमित्ताने ‘मविआ’तील तिन्ही पक्षांकडून सुरू असलेले राजकारणही गलिच्छ आणि संतापजनक आहे. काही दिवसांपासूनचे विरोधकांचे वर्तन महाराष्ट्रात दुही व असंतोषाचे वातावरण निर्माण करणारे आहे. शांत व समृद्ध महाराष्ट्र विस्कटावा, अशा प्रकारची त्यांची विधाने आहेत.
छत्रपती शिवरायांनी सुरतेची लूट केल्याचा चुकीचा इतिहास शिकवला गेला, या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचे समर्थन करताना उपाध्ये म्हणाले की, फडणवीस यांचे विधान बरोबर आहे. कारण, आमच्या दृष्टीने शिवरायांची सुरतेवरील स्वारी ही लूट नव्हती, तर ती स्वराज्यविजयाची मोहीम होती. ज्याप्रमाणे १८५७चे स्वातंत्र्यसमर हे बंड नसून स्वातंत्र्यप्राप्तीच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल होते, त्याचप्रमाणे शिवरायांची सुरतेवरील स्वारीही लुटीसाठी नव्हे तर स्वराज्यासाठी होती. कारण, लुटीच्या वेळी सरसकट सगळे लुटले जाते. पण, महाराजांनी त्यावेळी अनेकांना उदारपणे अभय दिले होते आणि त्यांचे संरक्षण केले होते. १८५७च्या स्वातंत्र्यलढ्याला स्वातंत्र्यसमर न मानता बंड समजणे, हा इंग्रजांचा वसाहतवादी दृष्टिकोन होता. इंग्रजांचाच कित्ता गिरवत काँग्रेसने स्वातंत्र्यसमराची संभावना बंड अशी केली.
मालवण येथील शिवरायांचा पुतळा पडल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माफी पुरेशी नाही, या विरोधकांच्या आक्षेपाचाही त्यांनी यावेळी समाचार घेतला. उपाध्ये म्हणाले की, जर माफी पुरेशी नसेल तर तत्कालीन पंतप्रधान पंडीत नेहरूंनी शिवरायांविषयी अनुद्गार काढून माफी मागितली होती. मग ‘मविआ’ कुठले जोडे मारो आंदोलन करणार? इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शीखांची सार्वत्रिक कत्तल झाल्याप्रकरणी सोनिया गांधींनी शीख समुदायाची माफी मागितली होती. जर ही माफी पुरेशी नसेल तर त्यांच्याविरोधात कोणते आंदोलन करणार? प्रत्यक्षात या आघाडीतील तिन्ही पक्षांचे शिवप्रेम बेगडी आहे. कारण, ते असते तर शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर वर्षानुवर्षे झालेल्या अतिक्रमणांकडे यांनी दुर्लक्ष केले नसते.