पुणे | प्रतिनिधी
समाजात शांतता, सुरक्षितता आणि नागरिक व पोलीस यांच्यातील परस्पर विश्वास अधिक दृढ व्हावा या उद्देशाने युवा स्पंदन सामाजिक संस्थेच्या वतीने फ्रेंडशिप डे निमित्त चतुःश्रुंगी पोलीस स्टेशन तसेच कोथरूड पोलीस स्टेशन येथे आगळावेगळा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना फ्रेंडशिप बँड बांधून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. समाजाच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस दलाशी संवाद वाढावा, नागरिक आणि पोलीस यांच्यात विश्वासाचे नाते अधिक मजबूत व्हावे आणि समाजात सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.
आजच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सातत्याने कार्यरत असते. अशा परिस्थितीत नागरिकांनी केवळ तक्रारदार म्हणून नव्हे, तर समाजहितासाठी सहकार्य करणारे जबाबदार नागरिक म्हणून पोलीस दलाशी संवाद वाढविणे ही काळाची गरज आहे. या विचारातून युवा स्पंदनतर्फे हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
या उपक्रमाचे आयोजन युवा स्पंदनचे ऋषिकेश कोंगे आणि हर्षवर्धन ढवळे यांनी केले. या प्रसंगी ओम आग्रे, खुशाल पाटील, दिव्या देशमुख, प्रतिक्षा पाटील, नितीन पिंगळे, केयूर कदम, रवींद्र कदम, साक्षी जगताप, रेवती एडस्कर, सानिका राठोड, क्षितिज सालमोटे, वेदांत लोखंडे आणि सार्थक पवार हे उपस्थित होते.
युवा स्पंदन ही संस्था गेली अनेक वर्षे पुणे शहर व जिल्ह्यात रक्तदान शिबिरे, शैक्षणिक मदत, सामाजिक जनजागृती, आपत्तीतील मदतकार्य तसेच विविध विधायक उपक्रम राबवत आहे. समाजातील सकारात्मक बदलासाठी युवकांनी पुढाकार घेऊन प्रशासनासोबत विश्वासाचे पूल उभारणे आवश्यक असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
यावेळी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनीही या उपक्रमाचे स्वागत करत, अशा सकारात्मक सामाजिक उपक्रमांमुळे नागरिक व पोलीस यांच्यातील संवाद अधिक प्रभावी होण्यास मदत होत असल्याचे मत व्यक्त केले.
“एक मैत्रीचा धागा केवळ मनगटावर बांधला जात नाही, तर तो नागरिक आणि पोलीस यांच्यातील विश्वास, सहकार्य आणि सामाजिक बांधिलकी अधिक दृढ करणारा सेतू ठरतो,” असा संदेश युवा स्पंदनच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला

