नृत्य सादरीकरणातून रोहिणी भाटे यांना गुरुवंदना!
पुणेः
प्रख्यात नृत्यगुरू रोहिणी भाटे यांच्या जन्मशताब्दी निमित्त पी वाय सी जिमखाना येथे ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन रविवारी सायंकाळी करण्यात आले होते.
रोहिणी भाटे यांच्या ज्येष्ठ शिष्या सौ .अरुणा केळकर यांनी पीवायसी जिमखानाच्या सहकार्याने या नृत्य कार्यक्रमाचे संयोजन केले. एयर मार्शल( निवृत्त )भूषण गोखले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ज्येष्ठ नृत्य गुरु शमा भाटे,सौ.मेधा गोखले, डॉ. गो. बं. देगलूरकर, ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. श्रीकांत केळकर उपस्थित होते .’रेझोनांस ‘ या सादरीकरणाला चांगला प्रतिसाद मिळाला.पी वाय सी जिमखाना चे अध्यक्ष कुमार ताम्हाणे यांनी स्वागत केले.सारंग लागू यांनी शमा भाटे यांचे स्वागत केले.
सौ.अरुणा केळकर आणि सहकाऱ्यांनी गणेश वंदना, रूप कथक ,होरी, विरहिणी, अभिसारिका असे अनेक विलोभनीय नृत्य प्रकार सादर केले. उपस्थितांनी भरभरून दाद दिली .सौ.अरुणा केळकर यांनी नृत्यातून सादर केलेली
‘ घनू वाहे घुणघुणा ‘ ही विरहिणीदेखील दाद मिळवून गेली .
सौ. अरुणा केळकर यांच्यासह धनश्री नातू, केतकी वाडेकर , प्रिया आदमाने , केतकी ठकार, श्रावणी कुलकर्णी, मयुरी हरदास, सोनवी मेहेंदळे, शाश्वती पंढरपूरकर यांनी ‘ रेझोनन्स’ या सादरीकरणात भाग घेतला, आणि उपस्थितांची मने जिंकली.
,’कारवा सूनहरी यादोंका ‘ या वार्तालापाद्वारे आशा पारेख यांचा जीवन प्रवास उलगडला . आरती पटवर्धन यांनी त्यांच्याशी संवाद साधला .
‘ रोहिणी भाटे या महान नृत्यांगना आणि नृत्यगुरु होत्या. जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या स्मृतींना वंदन करते . त्यांच्या ज्येष्ठ शिष्या सौ अरुणा केळकर यांनी ज्येष्ठ नागरिक असून आणि दोन शस्त्रक्रियेनंतर देखील नृत्य साधना सुरु ठेवली. हे कौतुकास्पद आहे . मी देखील कथक नृत्य करीत असे . हे नृत्य मध्येच थांबवले आणि काही कारणाने मी आता नृत्य करू शकत नाही , याचे वैषम्य वाटते .
नृत्य परंपरा पुण्यात वृद्धींगत होताना दिसत आहे . रोहिणी भाटेंची, कथक ची परंपरा पुढे न्यावी . नृत्य ही आपली परंपरा असून ती मरु देता कामा नये .कथक , भरत नाट्यम हे नृत्य प्रकार आहेत, तसे बॉलीवूड डान्स हा नृत्य प्रकार आहे,असे म्हणता येत नाही ‘, असेही त्या म्हणाल्या
‘आताच्या काळात ज्या सुविधा उपलब्ध आहेत, त्या मानाने आमच्या काळात परिस्थिती अवघड होती . चित्रपटात मी आहे, म्हणजे नृत्य चांगले असणार, याची खात्री रसिकांना होती , यातच सार्थक वाटते .स्त्री ची विविध रुपे अभिनयातून सादर करता आली, याबदल मी कृतज्ञ आहे’, असेही आशा पारेख यांनी सांगितले .सुनील गानू , आरती पटवर्धन यांनी सूत्रसंचालन केले.