संभाजीनगर दिनांक ३० ऑगस्ट २०२४
अनेक नामवंत खेळाडूंचा सहभाग असलेल्या प्रौढांच्या तिसऱ्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत येथे शनिवारी सरस्वती भुवन बॅडमिंटन हॉल मध्ये प्रारंभ होत आहे. या स्पर्धेतील ३९ वर्षावरील व ५९ वर्षावरील पुरुषांच्या गटात अनुक्रमे ओंकार जोग व सुनील बाब्रस या दोन्ही पुण्याच्या अग्रमानांकन देण्यात आले आहे.
दोन दिवस चालणारी ही स्पर्धा संभाजीनगर प्रौढ टेबल टेनिस अकादमीने आयोजित केली असून त्यास महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना व महाराष्ट्र राज्य प्रौढ टेबल टेनिस समिती यांची मान्यता मिळाली आहे. या स्पर्धेतील ३९ वर्षावरील गटात पुण्याच्या ओंकार जोग व अमित ढेकणे यांना अनुक्रमे पहिली दोन मानांकने देण्यात आली आहेत. ४९ वर्षावरील गटात मनीष रावत (सोलापूर) व आत्माराम गांगर्डे (ठाणे) यांना अनुक्रमे पहिले व दुसरे मानांकन मिळाले आहे. ५९ वर्षावरील गटात पुण्याचे सुनील बाब्रस यांना अग्रमानांकन तर नागपूरचे डॉ.अशोक कळंबे यांना द्वितीय मानांकन देण्यात आले आहे. ६४ वर्षावरील गटात जयंत कुलकर्णी (मुंबई महानगर जिल्हा) व अविनाश जोशी (पुणे) हे अनुक्रमे पहिले दोन मानांकित खेळाडू आहेत. ६९ वर्षावरील गटात जितेंद्र मावणी आणि (टी एस टी टी ए) व शिवानंद कुंडजे (नाशिक) यांना अनुक्रमे पहिले व दुसरे मानांकन मिळाले आहे. ७४ वर्षावरील गटात सतीश कुलकर्णी (पुणे)व चंद्रकांत खंडारे (औरंगाबाद) हे अनुक्रमे पहिले दोन मानांकित खेळाडू आहेत. ७९ वर्षावरील गटात सतीश शिरसाठ (नाशिक) व विनोद दिघे (ठाणे) हे अनुक्रमे पहिले दोन मानांकित खेळाडू आहेत.
ही स्पर्धा सांघिक विभागातही होणार असून त्यामध्ये राज्यातील नागपूर पुणे मुंबई नाशिक संभाजीनगर सोलापूर इत्यादी ठिकाणचे ५५ संघ सहभागी झाले आहेत. स्मार्ट ग्रुपमध्ये ३९ व ४९ वर्षावरील खेळाडूंना स्थान देण्यात आले असून या गटामध्ये टॉस अकादमी ‘अ’ संघ, डेक्कन जिमखाना ‘अ’ संघ, ड्रीम टीम ‘अ’ संघ, सोलापूर ‘अ’ संघ, डेक्कन जिमखाना ‘ब’ संघ यांना अनुक्रमे पहिली पाच मानांकने देण्यात आली आहेत. ५९ वर्षावरील क्लेव्हर गटात सनीज टीम, नागपूर ऑरेंज, फोर्झा, पीवायसी ‘अ’ संघ, रेडियंट स्पोर्ट्स अकादमी (पुणे) यांना अनुक्रमे पहिली पाच मानांकने मिळाली आहेत.
या स्पर्धेतील सामन्यांना शनिवारी सकाळी साडेआठ वाजता प्रारंभ होणार आहे. दोन्ही दिवशी वैयक्तिक तसेच सांघिक विभागाच्या लढती होणार आहेत.