पुणे- पुण्याच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठे मानापमान नाट्य घडू नये , वर्षानुवर्षे दीर्घ काल रेंगाळत राहणारी मिरवणूकीचा अवधी कमी कमी होत जायला हवा, गणपती चे भाव भक्ती ने होणार्या विसर्जनालाच प्राधान्य द्यावे या दृष्टीने काहींचे नेहमीचे प्रयत्न सुरु असतात. पण मानाचे गणपती किती वेळ घेतात, लोकप्रिय असलेली मंडळे कधी लक्ष्मी रस्त्यावर येतात , अशा मंडळांच्या पुढे किती ताफा असतो तो किती अवधी घेतो अशा विविध अनुषंगाने अगोदरच अभ्यास करून निर्णय घेऊनही ते अंमलात येतीलच याची शाश्वती नसते पण गेल्या वर्षापासून दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने दुपारी ४ वाजता लक्ष्मी रस्त्यावरील मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे स्वागत देखील झाले. दगडूशेठ, मंडई,तुळशीबाग ,बाबू गेनू ,भाऊ रंगारी असे गणपती जे लोकांचे आकर्षण असतात त्यांनी लोकांना वेळेत दर्शन दिले तर मिरवणुकीचा अवधी योग्य काळापुरता मर्यादित ठेवता येऊ शकेल आणि मिरवणुकीत अतिउत्साही कार्यकर्त्यांच्या गोंधळ कारभारालाहि लगाम बसेल. अशाच काहीश्या पार्श्वभूमीवर यंदा पुन्हा दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने विसर्जन मिरवणुकीत ४ वाजताच सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
यंदाच्या गणेशोत्सव आयोजनाबाबत माहिती देण्यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाची पत्रकार परिषद झाली .
बाप्पाची आगमन तसेच विसर्जन मिरवणूक कशी असेल, किती वाजता निघेल त्याचप्रमाणे प्राणप्रतिष्ठासोहळ्य बाबत या पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली .बाप्पाची मिरवणूक सकाळी साडेआठ वाजता मुख्य मंदिरापासून निघणार आहे. आगमनासाठी सिंह रथ तयार करण्यात येत आहे.गणेशोत्सवामध्ये सुरक्षितता त्याचप्रमाणे गणेश भक्तांसाठी आवश्यक सोयी सुविधा महत्त्वाच्या असतात. त्यादृष्टिकोनातून मंडळाकडून उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.
गेल्या वर्षी मंडळाने वर्षानुवर्षे वर्षे चालत आलेल्या परंपरेला फाटा देत दुपारी चार वाजता विसर्जन मिरवणूक काढली होती. त्याआधी रात्री उशिरा मिरवणूकीला सुरुवात होत होती. त्यामुळे गणेश भक्तांना बाप्पाच्या दर्शनासाठी तासनतास ताटकळत राहावं लागत होतं. त्याचप्रमाणे पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला लागणारा वेळ हा देखील मोठा प्रश्न बनलेला आहे. या पार्श्वभूमीवर दुपारीच म्हणजे मानाच्या गणपती पाठोपाठ विसर्जन मिरवणूक काढून गणेश चतुर्दशीच्या दिवशीच बाप्पाचे विसर्जन करण्याचा नवीन पायंडा मंडळाने गेल्या वर्षीपासून पाडला आहे. यावर्षी देखील तोच शिरस्ता कायम ठेवण्यात येणार आहे. गणेश चतुर्दशीच्या दिवशी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक दुपारी चार वाजता निघणार आहे.
यावर्षी मंडळातर्फे हिमालयातील जटोली शिवमंदिरची प्रतिकृती साकारण्यात येत आहे. त्या मंदिरात कर्नाटकातील श्री दत्त संप्रदायाचे ज्ञानराज महाराज माणिक प्रभू यांच्या हस्ते गणेश चतुर्थीला सकाळी 11:11 मिनिटांनी प्राणप्रतिष्ठा होणार आहे.दरवर्षीप्रमाणे दुसऱ्या दिवशी म्हणजे ऋषिपंचमीनिमित्त बाप्पा समोर 31 हजार महिलांचे सामूहिक अथर्वशीर्षक पठण होणार आहे.गणेशोत्सव काळात गणेश भक्तांसाठी 50 कोटींचा विमा मंडळातर्फे उतरवण्यात येणार आहे.मांडव परिसरात 150 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.मांडवापर्यंत पोहोचू न शकणाऱ्या गणेश भक्तांसाठी विविध ठिकाणी चार मोठ्या एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत.समाज माध्यमांवर देखील 24 तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे.