सुरक्षा दलाच्या गाडीतून येणार जाणार नाही, घरात सुरक्षा कडे नको
नवी दिल्ली- शरद पवारांची आज दिल्लीत सुरक्षा यंत्रणांमधील अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवारांनी झेड प्लस सुरक्षेमधील काही अटी मला मान्य नाहीत, असे पवारांनी यावेळी सांगितले. त्यामुळेच आता शरद पवार केंद्र सरकार देत असलेली सुरक्षा नाकारणार असल्याचे बोलले जात आहे.शरद पवार यांना केंद्र सरकारकडून झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. यामुळे शरद पवार यांच्या सुरक्षेसाठी 55 सशस्त्र सीआरपीएफ जवानांची तुकडी तैनात असणार आहे. मात्र आता शरद पवारांकडून ही झेड प्लस सुरक्षा नाकारण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी झेड प्लस सुरक्षेबाबत एक महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी सीआरपीएफचे डीजी स्वतः उपस्थित होते. त्यांच्याकडून शरद पवारांना सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी झेड प्लस सुरक्षेमधील काही अटी शरद पवारांनी नाकारल्या आहेत. सुरक्षा दलाची गाडी वापरण्याचा आग्रह पवारांना अमान्य आहे. तसेच, घरात सुरक्षा कडे नसावे, अशी सूचना शरद पवारांनी केल्याचीही माहिती मिळत आहे.
शरद पवारांच्या अटी- शर्थीबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाला अहवाल सादर होणार आहे. शरद पवारांना सुरक्षा देण्याचा निर्णय झाल्याची माहिती थेट शरद पवारांना देण्यात आली, दुसऱ्या कुणालाही याबाबत काहीच सांगण्यात आलेलं नाही. सुरक्षेत वाढ करण्यात आल्याबाबत 15 ऑगस्ट रोजी शरद पवारांना गृह मंत्रालयाकडून पत्र पाठवण्यात आले होतं.
शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा मिळाल्यानंतर त्यांनी याबद्दल शंकता उपस्थित केली होती. शरद पवार म्हणाले की, देशात तीन लोकांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय झाला आहे. मी विचारलं तीनमध्ये इतर दोन कोण आहेत? तर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नाव सांगितले. मला कशासाठी सुरक्षा पुरविली हे माहीत नाही. कदाचित निवडणुका आहेत. त्यामुळे सगळीकडे फिरावे लागते. त्यामुळे योग्य आणि अचूक माहिती मिळविण्याची व्यवस्था केलेली असावी. नक्की काय हे सांगू शकत नाही. पण गृहविभागाचे संबंधित अधिकाऱ्यांशी मी संवाद साधणार आहे. त्यानंतर काय निर्णय घ्यायचा हे ठरविणार आहे.