पालघर-राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी राज्यातील महायुती सरकारवर टीकेची झोड उठली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी वाढवण येथे यासंबंधी जाहीर माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत. त्यामुळे मी त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांची माफी मागतो, असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पंतप्रधान झाल्यावर मी पहिल्यांदा शिवरायांचे आशीर्वाद घेतले. जे जे लोकं शिवरायांना मानतात, त्यांची पूजा करतात अशा प्रत्येक व्यक्तीची मी माफी मागतो. ज्यांना पश्चताप होत नाही आशामधले आम्ही नाही, ज्यांना सावरकरांना शिव्या घातल्या त्यांनी माफी मागितली का?, सावरकरांबद्दल वाईट बोलणाऱ्यांनी माफी मागितली का? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, वाढवण बंदराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे बंदर देशातील प्रमुख बंदरापैकी एक बंदर असणार आहे. या प्रकल्पामुळे 12 लाख रोजगार निर्माण होणार आहेत. काही जण महाराष्ट्राला मागे खेचू पाहत आहे. मात्र, महासयुतीचे सरकार महाराष्ट्राला सर्वांत पुढे घेऊन जाऊ इच्छितात. आधीच्या सरकारने बंदराचे काम पूर्ण करु दिले नाही, असे म्हणत मविआ सरकारवर हल्लाबोल केला आहे. 2014 मध्ये 80 लाख टन मासे उत्पादन होते तर आत 170 लाख टन उत्पादन होते. यासह निर्यातीमध्येही आपण दुपट्टीने वाढ केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आजचा दिवस हा पालघरच्या इतिहासातील सोनेरी दिवस म्हटले तर वावगे ठरणार नाही. या बंदराचा देशाला फायदा होणार आहे. पण सर्वाधिक फायदा हा पालघर वासियांना होणार आहे. 2029 पर्यंत पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल. केंद्र सरकारने 76 हजार कोटीची तरतूद या प्रकल्पासाठी केली आहे. हे देशातील सर्वात मोठे बंदर असणार आहे. यामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीचे शिखर होणार आहे. वाढवण बंदरात मच्छिमार आणि स्थानिकांचे हित पाहणार आहोत. पर्यावरणाचे ऱ्हास होणार नाही याचाही विचार आपण करत आहोत. शिवरायाच्या विचारातून आपण हे राज्य चालवण्याचा प्रयत्न आपण करत आहे. पालघरमध्ये विमानतळ हवे हा देवेंद्र फडणवीसांच्या मागणीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी विचार करतील. हे बंदर आंतररार्ष्टीय दर्जाचे असल्याने आता आपल्याला कुणावर अवलंबून राहण्याची गरज नाही.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, वाढवण बंदरास काही जणांचा विरोध आहे. विकास करायचा असेल तर कुठेतरी मागे पुढे सरकारवे लागते. तुमचे आयुष्य खराब होणार नाही याची जबाबदारी राज्य सरकार घेईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिघी बंदराच्या विकासाला मंजुरी दिली आहे. वाढवण बंदर हे देशातील 10 बंदरामधील एक बंदर होईल असे अजित पवारांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजचा दिवस सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा आहे. आपण JNPT बंदरापेक्षा 3 पट मोठे बंदर तयार करत आहोत. महाराष्ट्र आता वाढवण पोर्टमुळे आपण 1 नंबर वर राहणार आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तर वाढवण बंदरामुळे पुढील 50 वर्षे महाराष्ट्र नंबर 1 वर राहील असे त्यांनी म्हटले आहे. आम्ही पालघरमधील मच्छिमारांसाठी सोई उपलब्ध करुण देणार आहोत. या बंदरामुळे पुढील 200 वर्षे मोदींचे नाव इतिहासात राहिल.
मोदींकडून महाराष्ट्राला मोठी- सोनोवाल
पालघरमधील नागरिकांच्या मदतीने वाढवण प्रकल्प मार्गी लागत आहे. हे बंदर म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून महाराष्ट्राला मोठी भेट आहे असे केंद्रीय जलवाहतूक मंत्री सोनोवाल यांनी म्हटले आहे. तर वाढवण बंदरामुळे 12 लाख लोकांना रोजगार मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पालघर येथील वाढवण बंदराच्या निषेधार्थ स्थानिक मच्छीमारांनी काळे झेंडे फडकावले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पालघरमध्ये दाखल होणार आहेत. मच्छीमार आक्रमक झाले असून त्यांनी आपल्या बोटीत काळे फुगे लावलेले आहेत. डहाणू खाडीत बोटींवर काळे फुगे लावून मच्छीमारांनी निषेध केलेला आहे. या बंदराच्या कामाच्या विरोधात संघर्ष समिती आणि मच्छीमारांकडून आंदोलनं करण्यात आलेली होती. मात्र, केंद्रानं हा प्रकल्प करण्यावर ठाम भूमिका घेतली.मच्छीमारांकडून अनोख्या पद्धतीनं काळे फुगे बोटींवर लावून विरोध करण्यात आला आहे.
बंदरविरोधी कृती समितीचे सचिव वैभव वाढे म्हणाले की, आम्ही शुक्रवारी वरूड नाका (पालघर) येथून भूमिपूजन स्थळापर्यंत सरकारची प्रेतयात्रा काढणार. या महाकाय बंदरामुळे भूमिपुत्र, कष्टकरी, शेतकरी, मच्छीमार पूर्ण उद्ध्वस्त होणार आहेत, असा दावा नॅशनल फिशवर्कर्स फोरमचे उपाध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांनी केला. एनजीटीत 20 सप्टेंबर रोजी आणि सर्वोच्च न्यायालयात 3 सप्टेंबर रोजी बंदराविषयी सुनावणी होणार असताना मोदी पायाभरणी कशी करणार? देशात लोकशाही आहे की हुकूमशाही? असा सवालही त्यांनी केला.