पुणे प्रार्थना समाजाच्यावतीने डाॅ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर स्मृतिशताब्दी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : डॉ.रामकृष्ण गोपाळ भांडारकर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, राजा राम मोहन राॅय असे आपले अनेक समाजसुधारक समाजातील विविध समस्यांसाठी लढले. त्या काळात असणाऱ्या अनेक सामाजिक समस्या आज प्रकर्षाने जाणवत नसल्या तरी त्या सुटलेल्या नाहीत. देशातील समाजसुधारकांनी त्यांच्या कृतीतून, चळवळीतून त्या सोडविण्याचे प्रयत्न केले. सामाजिक समस्या सोडविण्यासाठी त्यांच्या विचारांचे अवलंबन करून आपण समाजोन्नती केली पाहिजे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागाचे डाॅ. सुनील राऊत यांनी व्यक्त केले.
पुणे प्रार्थना समाजाच्या वतीने डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर स्मृतिशताब्दी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी राजा राममोहन रॉय यांच्या २५२ व्या जयंतीनिमित्त हैद्राबाद ब्राह्मो समाजाने शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या पुण्यातील अर्णव जोशी याला पारितोषिक प्रदान करण्यात आले. रुपये तीन हजाराचा धनादेश व प्रशस्तिपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप होते. कार्यक्रमात पुणे प्रार्थना समाजाच्या अध्यक्षा डाॅ. सुषमा जोग, सचिव डाॅ. दिलीप जोग उपस्थित होते. यावेळी डॉ. सुनील राऊत यांनी प्रार्थना समाजाची तत्त्वे यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
डाॅ. सुनील राऊत म्हणाले, प्रार्थना समाजातील तत्त्वे समाजात रुजली पाहिजेत. या तत्त्वांचा अवलंब करून त्याप्रमाणे कृती केली तर नक्कीच आपली आत्मोन्नती होईल आणि आत्मोन्नती झाली तर समाजाची उन्नती होईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी आध्यात्मिक संगीताचा विशेष कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात डॉ. भांडारकर यांच्या काही रचना आणि त्यांनी निरूपण केलेल्या काही संतरचना सादर करण्यात आल्या. या कार्यक्रमात त्यांचा निरूपणाचा काही भाग देखील समाविष्ट होता. डॉ. दिलीप जोग यांनी निवेदन केले. धनश्री घाटे, प्रणव कुलकर्णी, आर्कि. नमिता मुजुमदार, डॉ. दिलीप जोग, डॉ. सुषमा जोग यांनी गायन केले. तर अंजली राव (व्हायोलिन), यशवंत थिट्टे (संवादिनी), अक्षय शेवडे (तबला) व शशिकांत भोसले(पखवाज) यांनी साथसंगत केली.
डॉ. शिल्पा मुजुमदार यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. दिलीप जोग यांनी प्रास्ताविक केले.