पुणे: स्त्री पुरुष समानता येण्यासाठी समाजाच्या सर्वच स्तरात जागृती केली पाहिजे. शाळा, घर, सार्वजनिक ठिकाणे या सर्व ठिकाणी स्त्रियांना सुरक्षित वाटेल यासाठी मुलींना हिंमती बनवण्याबरोबरच मुलग्यांना/पुरुषांना स्त्री माणूस आहे, तिचा आदर करायला शिकवला पाहिजे. असे एमपीएससीचा विद्यार्थी बोलत होता. याला निमित्त होतं गेल्या आठवड्याभरात देशात आणि राज्यात बलात्कार आणि बलात्कार करून खून या घटनांनी देशच हादरून गेला. या पार्श्वभूमीवर अभिव्यक्ती, ज्ञानभारती प्रतिष्ठान आणि अलर्ट आयोजित भय इथले संपत नाही या फिल्म स्क्रिनिंग कार्यक्रमाचे. रविवार २५ ऑगस्ट रोजी ऐश्वर्या हॉल, नलस्टॉप इथं फिल्म स्क्रिनिंगचं आयोजन केलं होतं. बलात्कार करणं ही विकृत मानसिकता आहे, स्त्रिया उत्थान कपडे घालतात, त्या मुलांना/पुरुषांना आकर्षित करण्यासारखं वागतात आणि त्यामुळे मुलगे/पुरुष त्यांच्याकडे आकर्षित होतात. असं म्हणून खरंतर जिच्यावर अत्याचार झाला-बलात्कार झाला तिलाच दोषी ठरवलं जातं. बलात्कार करणारा पुन्हा उजळ माथ्यानं फिरतो, अशी काहीजणांची मतं. तर काहीजण म्हणतात बलात्काऱ्याला भरचौकात फाशी द्यायला हवी, म्हणजे समाजातल्या पुरुषांवर जरब बसेल. या समाज मानसिकतेवर चर्चा होण्यासाठी यावर आधारित व्हाय इंडिया ह्याज या रेप प्रॉब्लेम, 6 इयर्स आफ्टर निर्भया, मेन टेल अस व्हाय मेन रेप?, रेप इज कन्सन्शुएल इन साईड हरियानाज रेप कल्चर आणि आय अँम निर्भया अशा ४ फिल्म्स दाखवून त्यावर चर्चा केली. यावेळी अभिव्यक्तीच्या समन्वयक अलका जोशी म्हणाल्या की आज २१ व्या शतकातही स्त्री उपभोगाची वस्तू आहे. म्हणूनच तिच्या वावरण्यापासून ते तिनं काय घालावं, कोणाशी बोलावं, कोणाशी मैत्री-लग्न करावं या सर्वांवर बंधन घातलेली दिसतात. स्त्री माणूस आहे, तिला माणूस म्हणून जगण्याचा पूर्ण अधिकार आहे, तिच्या मर्जीशिवाय तिच्या अंगाला हातच काय बोटही लावता कामा नये. पुरुषाला संधी,अवकाश, मालमत्तेत वाटणी, सर्व गोष्टींचा आनंद घेण्याचं स्वातंत्र्य आहे त्या सर्व गोष्टी माणूस म्हणून स्त्रीला मिळतील तेव्हा बलात्कार थांबतील. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात चळवळीच्या गाण्यांनी झाली. कार्यक्रमाला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.