पुणे:पुणे शहरातील हडपसर विधानसभा मतदारसंघात एका पोलिस अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला झाल्याची अतिशय संतापजनक घटना काल घडली.महाराष्ट्रातील नागरिकांचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेले पोलिस अधिकारीच सुरक्षित नसतील तर याचा अर्थ महाराष्ट्र राज्याची कायदा व सुव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला.या पोलिस खात्याचे नेतृत्व करणारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील गुन्हेगारीची, पोलिस विभागाच्या असुरक्षिततेची जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी करत शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या या आंदोलनात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध करण्यात आला. “महाराष्ट्रावर उपकार करा फडणवीस खुर्ची खाली करा, महाराष्ट्र झाला गुन्हेगारीने त्रस्त गृहमंत्री राजकारणात व्यस्त, गृहमंत्री राजीनामा द्या अशा घोषणांनी संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता.
या आंदोलनास शहरअध्यक्ष प्रशांत जगताप, रवींद्र माळवदकर, स्वाती पोकळे, किशोर कांबळे, शेखर धावडे, नितीन रोकडे, मीनाताई पवार, विमल झुंबरे, वंदनाताई मोडक,प्रविण आल्हाट, शैलेंद्र बेल्हेकर, राजेश आरणे आणि मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.