‘कनेक्टिंग ट्रस्ट’च्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित चर्चासत्रात मानसिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी मांडले विचार
पुणे, ता. २४: ‘सहानुभूती, संवेदनशीलता आणि संवाद, ही त्रिसूत्री योग्य पद्धतीने वापरल्यास आत्महत्येच्या घटना रोखता येतील. आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेण्यापूर्वीच त्याच्या प्रतिबंधासाठी व्यापक जनजागृतीची गरज आहे,’ असे विचार मानसिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी मांडले.
मानसिक आरोग्य आणि आत्महत्या प्रतिबंधासाठी कार्यरत कनेक्टिंग ट्रस्ट संस्थेच्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त बंडगार्डन येथील राॅयल कॅनाॅट बोटक्लबमध्ये आयोजित कार्यक्रमात संस्थेच्या संस्थापक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अर्णवाझ दमानिया यांच्यासह अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रसंगी ‘मानसिक आरोग्य, आत्महत्या प्रतिबंध आणि सेवाभावी कार्यातील दरी भरून काढणे’ या विषयावर झालेल्या विशेष चर्चासत्रात बिफ्रेंडर्स इंडियाचे अध्यक्ष सचिन चिदंबरम, सेंट मीराज काॅलेजच्या मानसशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. जया राजगोपालन, एक्स्टेंटिया इन्फोर्मेशन टेक्नाॅलाॅजीचे सीईओ चेतन शेट्टी, संस्थेच्या सहव्यवस्थापकीय संचालक सायकोथेरपीस्ट सॅंडी डायस अड्रेंड, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रणिता मडकायकर यांनी विचार मांडले. चर्चासत्राचे संयोजन अमीना अजानी यांनी केले.
अर्णवाझ दमानिया यांनी संस्थेच्या स्थापनेपासूनची वाटचाल उलगडली. ‘२००५ मध्ये कनेक्टिंग ट्रस्टची स्थापना झाली आणि २००७ मध्ये हेल्पलाईन सुरू करण्यात आली. वर्षाला ७ हजार दूरध्वनी, दरमहा ५० हून अधिक मेल्स कनेक्टिंग ट्रस्टकडे येतात. प्रत्येकाचे निराकरण केले जाते. शाळा, महाविद्यालये, ज्येष्ठ नागरिक, बचत गट, स्वयंसेवी संस्था येथे ‘कनेक्टिंग’तर्फे आत्महत्या प्रतिबंध, मानसिक आरोग्यासंदर्भात जागरूकता कार्यशाळा, उपक्रम घेतले जातात. २०२४ मध्ये पुण्यातील ५ महाविद्यालयांमध्ये कॅम्पस राजदूत नेमण्याचा संकल्प ट्रस्टने केला असल्याची माहिती दमानिया यांनी दिली.
मनोज पाटील म्हणाले, “पुरेशा जनजागृतीअभावी पोलिस विभागाकडे आत्महत्येच्या प्रकरणांची, तसेच आत्महत्येच्या प्रयत्नांची नोंद होण्याचे प्रमाण कमी आढळते. त्यामुळे गुन्हे नोंदणीही कमी दिसते. आत्महत्यांच्या संदर्भात नवऱ्याकडून, सासरकडून छळ होत असल्याने आत्महत्या करणाऱ्यांपेक्षा पालकांचे दुर्लक्ष, अवास्तव अपेक्षांचे ओझे आणि दबाव तसेच ताणतणाव यामुळे होणाऱ्या आत्महत्यांचे प्रमाण वाढते आहे.”
सचिन चिदंबरम म्हणाले, “आत्महत्या हा केवळ मानसिक अनारोग्याचा मुद्दा नाही, तर सामाजिक समस्या आहे. कुटुंबातील कलह, नात्यांमधील तणाव, मानसिक अनारोग्य, आर्थिक समस्या, करिअरमधील समस्या, व्यसनाधीनता, लैंगिक समस्या, विविध प्रकारचे शोषण अशा अनेक कारणांची तीव्रता वाढून व्यक्ती आत्महत्येच्या विचारापर्यंत जाऊ शकते. अशावेळी समुदेशक, स्वयंसेवकांची भूमिका महत्त्वाची आहे.”
डॉ. जया राजगोपालन यांनी तरुण विद्यार्थ्यांमधील आत्महत्येसंबंधीची निरीक्षणे नोंदवली. ‘किशोरवयीन मुलांच्या मनातही आत्महत्येचे विचार यावेत, हे दुर्दैवी आहे. पालकांची जबाबदारी यामध्ये महत्त्वाची आहे. स्वतःच्या अवास्तव अपेक्षा मुलांवर लादण्यापेक्षा स्वतंत्र व्यक्ती म्हणून मूल वाढवणे गरजेचे आहे आणि प्रत्येक टप्प्यावर मुलांशी संवाद गरजेचा आहे. हस्तक्षेपाऐवजी प्रतिबंध महत्त्वाचा आहे’, असे त्या म्हणाल्या.
सॅंडी अड्रेंड यांनी एकाकीपणा, नैराश्य यांनी ग्रस्त व्यक्ती ओळखण्याच्या काही खुणांची माहिती दिली. अनुभवी वैद्यकीय तज्ञ या लक्षणांवरून विशिष्ट व्यक्तीच्या मनातील आत्महत्येचा कल आधीच ओळखू शकतो आणि त्याला परावृत्त करू शकतो. १५ ते २९ हा वयोगट या दृष्टीने अधिक संवेदनशील असतो. समाजाचा दृष्टीकोन आणि आधार यासाठी गरजेचा आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रणिता यांनी कुटुंब, मित्र, स्नेही परिवार तसेच समाजापासूनचे तुटलेपण, हेही आत्महत्येमागील प्रमुख कारण असल्याचा उल्लेख केला. स्वतःला संपवून टाकण्यापर्यंत पोचलेल्या व्यक्तीला पोकळ उपदेशापेक्षा खंबीर आधार आणि सावरण्यासाठी पाठिंबा देण्याची गरज असते. अशा व्यक्तीच्या कुटुंबियांसाठीही आधाराची आवश्यकता असते, असे त्या म्हणाल्या.
चेतन शेट्टी म्हणाले, ‘कंपन्यांनी आपल्या कर्मचार्यांना स्वयंसेवक म्हणून काम करण्याची संधी दिली पाहिजे. त्यातून समाजात संवेदनशीलता आणि सहानुभूती वाढीस लागेल, ज्याची गरज आहे’. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात स्वयंसेवकांनी आपल्या अनुभवांची देवाणघेवाण केली. गायत्री दामले यांनी सूत्रसंचालन केले. संस्थापक विश्वस्त मॅथ्यू मातम यांनी आभार मानले.