- शरद पवार यांचे प्रतिपादन; धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पवार यांची कृतज्ञता ग्रंथतुला
पुणे: “जुन्या पिढीतील अनेक लोकांनी शिक्षणाची गंगा ग्रामीण भागात विस्तारण्यासाठी परिश्रम घेतले. माझी आई शारदा पवार या माझ्या जन्मावेळी लोकल बोर्डाच्या सदस्य होत्या. तत्कालीन लोकल बोर्डाचे अध्यक्ष शंकरराव मोरे यांनी शिक्षण उपक्रमांबाबत बैठक बोलावली होती आणि ती सर्वांना अनिवार्य होती. तेव्हा मी केवळ सहा दिवसांचा होतो. आई शारदा मला या बैठकीला घेऊन गेली होती. त्यामुळे वयाच्या सहाव्या दिवशी मी शिक्षणसंस्था पाहिली. तेव्हा तिने मला काय शिकवले माहित नाही. परंतु, पुढे मी अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये भरीव योगदान देऊ शकलो,” असे प्रतिपादन देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री पद्मविभूषण खासदार शरद पवार यांनी केले. नव्या पिढीला ज्ञानदान करून घडविण्याचे काम धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानच्या माध्यमातून काका चव्हाण पुढे घेऊन जात आहेत, याचा आनंद वाटतो, असेही त्यांनी नमूद केले.
धायरी येथील धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ शुक्रवारी पार पडला. यानिमित्ताने महाराष्ट्रासह देशाच्या जडणघडणीत बहुमूल्य योगदान दिल्याबद्दल ज्येष्ठ नेते, खासदार पद्मविभूषण शरद पवार यांची कृतज्ञता ग्रंथतुला करण्यात आली. तसेच मान्यवरांच्या हस्ते संस्थेच्या कार्याचा आढावा घेणार्या स्मरणिकेचे प्रकाशन झाले. संस्थेच्या २५ वर्षांच्या वाटचालीची ध्वनिचित्रफीत यावेळी प्रदर्शित करण्यात आली.
संस्थेच्या प्रांगणात आयोजित समारंभात संयोजक व प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोपान उर्फ काकासाहेब चव्हाण, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, उद्योजक विठ्ठलशेठ मणियार, माजी खासदार अशोक मोहोळ, विधानपरिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार कुमार गोसावी, चंद्रकांत मोकाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, संस्थेचे नंदूशेठ चव्हाण, श्रीरंग चव्हाण, अनिकेत चव्हाण, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष स्वाती पोकळे, सचिन दोडके, भीमराव चव्हाण, प्रभावती भूमकर, नवनाथ पारगे, रविंद्र माळवदकर, डॉ. सुनील जगताप, नरेश मित्तल, त्र्यंबक मोकाशी, धनंजय बेनकर आदी उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, “काही वर्षांपूर्वी धायरी परिसर ग्रामीण भाग होता. त्याचा समावेश महानगरपालिकेत झाला. विकास होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, येथील शेती संपली, बळीराजाची संख्या कमी झाली. चित्र बदलते, तसे लोकही बदलतात. मात्र, धायरी परिसरात काका चव्हाण यांनी शिक्षण संस्था उभारून या भागातील गोरगरीब मुलांना दर्जेदार शिक्षण दिले आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर असून, इथल्या शंभर वर्षांपेक्षा अधिक जुन्या शिक्षण संस्था ही शहराची ओळख आहे. पुण्यात शिकण्यासाठी बाहेरून विद्यार्थी येत. त्याकाळी ते शहरापुरते मर्यादित होते. आता शिक्षण क्षेत्राचा विस्तार झाला आहे. एक पिढी होती, जी शेती करायची. नंतरच्या पिढीने शिक्षण केले. काहींनी आपल्या जमिनी शिक्षणसंस्थासाठी दान केल्या. ज्ञानदानाची केंद्र उभी केली. ग्रामीण भागातही चांगल्या शिक्षण संस्था भरीव योगदान देत आहेत. नव्या पिढयांना घडवत आहेत. ग्रामीण भागात शिक्षणाचा विस्तार करण्यात शंकरराव मोरे, बाबूराव घोलप, मामासाहेब मोहोळ, विठ्ठलराव सातव, अण्णासाहेब आवटे यांच्यासह माझ्या आई शारदाबाई पवार यांचाही यात वाटा होता.” रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष म्हणून, तसेच पुण्यामुंबईतील अनेक संस्थांवर मी कार्यरत आहे. लाखो विद्यार्थी या शिक्षणसंस्थांमधून घडत आहेत, याचा अभिमान वाटत असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रास्ताविकात काकासाहेब चव्हाण म्हणाले, “महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्राच्या जडणघडणीत पवार साहेबांनी बहुमूल्य योगदान दिलेले आहे. जवळपास सहा दशके लोकनेता म्हणून पवार साहेब कार्यरत आहेत. धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानने गेल्या २५ वर्षांत सर्वांगीण विकासाचे शिक्षण, मुलांमधील क्रीडागुणांना प्रोत्साहन देण्यावर भर दिला आहे. शरद पवार म्हणजे चालतेबोलते विद्यापीठ आहे, त्यांचा सत्कार ग्रंथांशिवाय होऊच शकत नाही. ग्रंथतूलेतील सर्व पुस्तके ग्रामीण भागातील विद्यार्थी व ग्रंथालयांना देण्यात येणार आहेत.”
अशोक मोहोळ म्हणाले, “धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानचा प्रवास गेली पंचवीस वर्षे जवळून पाहिला आहे. अतिशय कष्टाने, समर्पित भावनेने चव्हाण कुटुंबियांनी ही संस्था वाढवली आहे. पवार साहेबांनी महाराष्ट्र घडविण्यात मोलाचे योगदान दिले आहे. संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षांच्या सांगता पवार साहेबांच्याप्रती कृतार्थ भावाने केली, याचा आनंद वाटतो.”
उल्हास पवार म्हणाले, “शरद पवार यांनी सर्वच क्षेत्रांच्या विकासासाठी अनमोल असे योगदान दिले आहे. नेता म्हणून केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशाला त्यांच्या कर्तृत्वाचा अभिमान आहे. काकासाहेब चव्हाण यांनी पवार साहेबांची ग्रंथतुला करून एका आदर्श कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.” रणजितसिंह मोहिते पाटील यांनीही आपल्या मनोगतात शरद पवार, तसेच संस्थेच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर यांनी आभार मानले.
ग्रंथ जगण्याची दृष्टी देतात: पवार
ग्रंथ आपल्याला दृष्टी देणारे साधन आहे. त्यातून आपले जीवन घडते. वाचन संस्कृतीचा विस्तार व्हायला हवा. वाचनातून ज्ञान मिळते. जुने-नवे बदल समजून घेण्याची संधी ग्रंथांच्या माध्यमातून मिळत असते. त्यामुळे धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानने आपल्या रौप्य महोत्सवी वर्षाची सांगता माझी ग्रंथतुला करून केली, याचा विशेष आनंद आहे. हा उपक्रम अतिशय उत्तम व स्तुत्य असून, या ग्रंथतुलेतील पुस्तकांचे वाचन करावे. ग्रंथांच्या वाचनातून आपले व्यक्तिमत्व घडविण्याचा प्रयत्न नव्या पिढीने करावा, असे आवाहन शरद पवार यांनी केले.