निवडणुकीच्या जागावाटपाच्या चर्चांपूर्वीच महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदावरून वाद
मुंबई- मंत्रिमंडळाच्या बैठकीत विकास निधीवरून उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याची माहिती मिळत आहे.तर दुसरीकडे खासदार नरेश म्हस्के यांनी फडणवीसांच्या वक्तव्यांना फाटे मारून आगामी विधानसभा ही एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली लढली जाईल असे घोषित केले आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत ग्रामविकास विभागाला जास्तीचा निधी वाढवून दिला जावा, अशी मागणी मंत्री महाजन यांनी केली. त्यावर निधी आता कुठून आणू, आता काय जमिनी विकायच्या का?, असा प्रतिप्रश्न करत अजित दादांनी महाजनांना फैलावर घेतले. त्यावरुन दोन्ही नेत्यांमध्ये खडाजंगी झाल्याची माहिती मिळत आहे.
अजित दादांना घेरण्याचा प्रयत्न अजित दादांनी असा प्रतिप्रश्न केल्यानंतर गिरीश महाजनांनी अजित पवारांना पुन्हा घेरण्याचा प्रयत्न केला. सिन्नर तालुक्यात एका स्मारकासाठी कोट्यवधीच्या निधीची तजवीज कशी काय करण्यात आली, असा सवाल गिरीश महाजनांनी उपस्थित केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर मात्र अजित पवारांचा पारा चढला.
लोकसभेच्या निकालानंतर आता राज्यात विधानसभेची तयारी सुरू झालेली आहे. महायुतीने सत्ता राखण्यासाठी कंबर कसल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक राजकीय पक्षाकडून जोरदार तयारी सुरू आहे. पण निवडणुकीच्या जागावाटपाच्या चर्चांपूर्वीच महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदावरून वाद पाहायला मिळत आहे. तर त्यांच्यातील सुप्त वाद आता चव्हाट्यावर येऊ लागला आहे.
मुख्यमंत्रिपदावरुन देवेंद्र फडणवीस यांनी संतुलन ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र शिंदेंचे खासदार नरेश म्हस्के यांनी फडणवीसांच्या वक्तव्यांना केराची टोपली दाखवल्याचं दिसून येतंय. पुढील निवडणुका या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवल्या जातील, त्यामुळे मुख्यमंत्रिपदावर आमचाच दावा असणार असे शिवसेनेचे ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले. तर त्याला भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी देखील प्रत्युत्तर दिलेले आहे.