सत्य निकेतनमध्ये पाच मजली इमारत कोसळून दोघांचा मृत्यू; विद्यार्थ्यांच्या निवास व्यवस्थेवर राहुल गांधींचे सरकारला सवाल
नवी दिल्ली : दिल्लीतील सत्य निकेतन परिसरात पाच मजली इमारत कोसळल्याच्या घटनेवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये पुरेशा वसतिगृह सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना अत्यंत अमानवीय परिस्थितीत ‘पेइंग गेस्ट’ म्हणून राहण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
सत्य निकेतन परिसरातील ही इमारत रविवारी दुपारी कोसळली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून, दोघेजण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून, ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
एनडीआरएफ, दिल्ली अग्निशामक दल आणि पोलिसांकडून घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. बचावासाठी अग्निशामक दलाच्या किमान आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती आहे. कोसळलेल्या इमारतीत विद्यार्थी पीजीमध्ये भाड्याने राहत होते.
‘प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी सर्व प्रयत्न करा’
राहुल गांधी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली. सत्य निकेतनमधील दुर्घटना अत्यंत दुःखद आणि चिंताजनक असल्याचे सांगत त्यांनी बचाव यंत्रणांना ढिगाऱ्याखाली अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
जखमी विद्यार्थ्यांना तातडीने उपचार मिळाले पाहिजेत आणि बचावकार्यात कोणतीही कसर राहू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
काँग्रेस आणि एनएसयूआयचे कार्यकर्ते घटनास्थळी उपस्थित राहून मदत करत असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. पीडित विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी काँग्रेस उभी असल्याचेही त्यांनी म्हटले.
‘एकाच छताखाली ४० विद्यार्थी राहत होते’
विद्यार्थ्यांच्या निवास व्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करत राहुल गांधी म्हणाले की, विद्यार्थ्यांचे जीवन आधीच अनेक संघर्षांनी भरलेले आहे. त्यात सुरक्षित निवासाची सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांची परिस्थिती आणखी धोकादायक होत आहे.
महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये पुरेशा वसतिगृहांची व्यवस्था नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पीजीमध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहावे लागत असल्याचा आरोप त्यांनी केला. एकाच छताखाली तब्बल ४० जण राहत असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
“प्रत्येक विद्यार्थ्याचे आयुष्य मौल्यवान आहे आणि कोणत्याही परिस्थितीत त्याचे रक्षण झाले पाहिजे,” अशी भूमिका राहुल गांधी यांनी मांडली.
या दुर्घटनेनंतर दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या पीजी निवास व्यवस्थेची सुरक्षितता, इमारतींची संरचनात्मक तपासणी आणि विद्यापीठ परिसरातील वसतिगृहांची कमतरता हे प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत.

