पुणे, दि. २३ : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध येथे सत्र २०२४-२५ करीता मराठी लघुलेखन (स्टेनोग्राफी) या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्याकडून या प्रवेशासाठी मान्यता मिळाली असून २४ प्रशिक्षणार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सूरू झाली असून https://msbsvet.edu.in या लिंकवरुन प्रशिक्षणार्थ्यांना ३१ जुलैपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत तसेच प्रवेशाकरीता आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रत उमेदवारांनी संस्थेमध्ये १ ऑगस्ट पर्यंत जमा करणे आवश्यक आहे.
उमेदवारांची गुणवत्ता यादी ३ ऑगस्ट रोजी तयार करण्यात येणार असून प्रत्यक्ष प्रवेशाची कार्यवाही ६ ऑगस्ट रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध, पुणे येथील मुख्य इमारतीच्या कौशल्य हॉल येथे होणार आहे. प्रवेशित उमेदवारांचे नियमित प्रशिक्षण ७ ऑगस्ट पासून सुरु होणार आहे, अशी माहिती आयटीआयचे उपप्राचार्य ए.ए. साबळे यांनी दिली आहे.