नवी दिल्ली: महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना याची किंमत प्रदीर्घकाळ चुकवावी लागेल, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना लक्ष्य केलं. महिलांच्या अधिकाऱ्यांना विरोध करणाऱ्यांना माफी मिळणार नाही, असंही मोदी यांनी लोकसभेत बोलताना सुनावलं. महिला आरक्षणावर लोकसभेत आज चर्चा होत आहे. याच विषयावर बोलताना पंतप्रधानांनी विरोधकांचा समाचार घेतला.
‘कोणत्याही देशाच्या आयुष्यात असे काही निर्णायक क्षण येतात. त्यावेळी समाजाची मानसिकता आणि नेतृत्त्वाकडे असलेली त्या संधीचं सोनं करण्याची क्षमता देशाचं भविष्य बदलते. एका सशक्त देशाची निर्मिती करते. भारतीय लोकशाहीच्या इतिहासात हा क्षण तसाच आहे. भारत लोकशाहीची जन्मभूमि आहे. विकासाच्या यात्रेला एक नवा आयाम देण्याची पवित्र संधी आपल्याला मिळाली आहे. देशाच्या निम्म्या लोकसंख्येला राष्ट्र निर्माणाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी करण्याची संधी आपल्याला मिळाली, हे आपलं भाग्य आहे,’ असं मोदी म्हणाले.
या महत्त्वाच्या आणि मोक्याच्या क्षणी खासदारांनी साथ द्यावी, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. आपण सगळे भारतीय एकत्रितपणे देशाला एक नवी दिशा देत आहोत, असं मोदींनी म्हटलं. ‘आपण आपल्या शासन प्रणालीत अधिक संवेदनशीलता आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. या मंथनातून जे अमृत निघेल ते केवळ देशाच्या राजकीय स्वरुपाला वेगळा आकार देणार नाही, तर देशाची दिशा ठरवेल, देशाची परिस्थिती बदलेल,’ असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.एका राष्ट्राच्या रुपात विचार करणं ही आपली जबाबदारी आहे. काश्मीर असो वा कन्याकुमारी असो, आपण ना तुकड्यांमध्ये विचार करु शकतो, ना निर्णय घेऊ शकतो. केवळ राजकीय लाभासाठी वादळ निर्माण केलं जात आहे. हा प्रकार चुकीचा आहे, असं मोदी म्हणाले.कोणत्याही राज्याचं महत्त्व कमी होणार नाही, याची ग्वाही मोदींनी लोकसभेत दिली. ‘लोकसभेतील कोणत्याही राज्याचं महत्त्व घटणार नाही. काही जण केवळ राजकीय स्वार्थासाठी वादळ निर्माण करत आहोत,’ अशा शब्दांत मोदींनी दक्षिणेकडील राज्यांना दिलासा दिला. ‘जर गॅरेंटी शब्द हवा असेल तर मी त्या शब्दाचा वापर करतो. जर तुम्हाला आश्वासन शब्द हवा असेल तर मग ती त्याचा वापर करतो. तमिळमध्ये कोणता अधिक चांगला शब्द असेल तर तो बोलायलाही मी तयार आहे. कारण नियत साफ असेल तर शब्दछल करण्याची गरज भासत नाही,’ असं म्हणत मोदींनी दक्षिणेकडील राज्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

