Home Blog Page 690

डॉ. प्रभा अत्रे यांना गायन, नृत्याविष्काराद्वारे अभिवादन


‘स्वरयोगिनी : भारतीय संगीतातील नवोन्मेष‌’ दोन दिवसीय महोत्सवाची सांगता

पुणे : स्वरयोगिनी, पद्मभूषण डॉ. प्रभा अत्रे यांनी रचनलेल्या विविध बंदिशींचे सादरीकरण तसेच त्यांच्या बंदिशींवर आधारित कुचिपुडी नृत्याविष्काराद्वारे डॉ. प्रभा अत्रे यांना सांगीतिक अभिवादन करण्यात आले.

डॉ. प्रभा अत्रे शिष्य परिवारातर्फे स्वरयोगिनी, पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या साहित्य, कला आणि संगीत या क्षेत्रांमधील कार्यावर आधारित ‌‘स्वरयोगिनी : भारतीय संगीतातील नवोन्मेष‌’ या दोन दिवसीय महोत्सवाचे बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी (दि. 22) स्वर-नृत्य-प्रभाअंतर्गत डॉ. प्रभा अत्रे यांच्या बंदिशींवर आधारित संगीत-नृत्याचा अनोखा कार्यक्रम झाला. यात डॉ. मनिषा रवी प्रकाश, पियू मुखर्जी यांचे गायन तर नृत्यगुरू वैजयंती काशी आणि सहकाऱ्यांनी कुचिपुडी नृत्य सादर केले.
गायक कलाकारांना पांडुरंग मुखडे (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी) यांनी साथसंगत केली.
महोत्सवाचे आयोजन डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनच्या सचिव डॉ. भारती एम. डी. आणि कार्यक्रम निर्देशक प्रसाद भडसावळे यांनी केले होते.

डॉ. प्रभा अत्रे यांच्या शिष्या व डॉ. उषा अत्रे-वाघ यांच्या कन्या डॉ. मनिषा रवी प्रकाश यांनी सादर केलेल्या ‌‘अभिमानाने मीरा वदते हरी चरणाशी माझे नाते‌’ प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ही प्रार्थना डॉ. प्रभा अत्रे व त्यांच्या भगिती डॉ. उषा अत्रे-वाघ यांनी एकत्रितपणे नागपूर आकाशवाणीवर सादर केलेले एकमेव गीत असल्याची आठवण या वेळी सांगण्यात आली.
या नंतर पश्चिम बंगालमधील सुप्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायिका पियू मुखर्जी यांनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या रचना सादर केल्या. बिलासखानी तोडीमधील ‌‘मैं तोरी शरण आयी जगतजननी‌’, ‌‘जग माता तू भवानी चामुंडे महाकाली‌’ या बंदिशी बडाख्याल, मध्यलय आणि द्रुत एकतालात सादर केल्या. ‌‘सुनो मोरी अरज, कैसे धरू धीरज‌’ ही देसरागातील मध्यलय रुपकमधील बंदिश प्रभावीपणे सादर केली. तसेच ‌‘तानी दे रे ना तदाने तान दीम्‌‍‌’ हा तराणा सादर करून त्यांनी रसिकांना मोहित केले. मैफलीची सांगता ‌‘आए नही मोरे शाम‌’ या मिश्र भैरवीतील ठुमरीने केली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात बेंगळुरू येथील नृत्यगुरू वैजयंती काशी आणि त्यांच्या शिष्यांचे बहारदार कुचिपुडी नृत्य सादरीकरण झाले. सादरीकरणाची सुरुवात गणेश वंदनेने झाली. डॉ. प्रभा अत्रे यांना समर्पित नृत्याविष्कारात ‌‘माता भवानी काली‌’ ही त्रिशक्तीची रूपे दर्शविणारी प्रस्तुती केली. या नंतर मर्यादापुरुषोत्तम श्री राम आणि नटखट श्री कृष्णाचे वर्णन करणाऱ्या ‌‘कोई राम कहे, कोई शाम कहे‌’ या रचनेवर वैजयंती काशी यांनी एकल नृत्य सादर केले. ‌‘सगुण स्वरूप नंदलाल‌’ या रचनेवरील नृत्याविष्कारात भक्तीचे अनोखे दर्शन घडविले. डॉ. प्रभा अत्रे यांच्या विविध रचनांवर सादर झालेला विलोभनीय नृत्याविष्कार रसिकांच्या मनाचा ठाव घेणारा ठरला.
डॉ. प्रभा अत्रे यांच्या 90व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवनप्रवासाचे वर्णन करणारा पोवाडा शाहीर हेमंत मावळे यांनी रचला होता. या पोवाड्याचे दृकश्राव्य माध्यमातील चित्रिकरण या प्रसंगी दाखविण्यात आले.
कलाकारांचा सत्कार निलिमा छापेकर, वीणा शुक्ला, रघुवीर कुलकर्णी, अशोक वळसंगकर यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश दामले यांनी केले.

सरन्यायाधीश चंद्रचूड-मुख्यमंत्री शिंदे एकाच मंचावर:23 सप्टेंबरला मुंबई हायकोर्टाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम

0


मुंबई-23 सप्टेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन प्रस्तावीत इमारतीचे भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमाला सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच मंचातर येणार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणीआधी सरन्यायाधी धनंजय चंद्रचूड, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच व्यासपीठावर येणार असल्याने राजकीय वातातरण तापण्याची शक्यता आहे.

24 सप्टेंबर रोजी आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. त्याच्या एक दिवस आधी मुंबईत हा कार्यक्रम होत असून सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. यावेळी शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित असणार आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळची ऐतिहासिक इमारत जागावापरासाठी कमी पडत होती. त्यामुळे हायकोर्टाला नवीन इमारत देण्यात यावी, अशी मागणी केली जात होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन जागेसाठी 2019 पासून हायकोर्टाच्या बार असोसिएशनचा लढा सुरू होता. अखेर या लढ्याल यश आले असून 23 सप्टेंबर रोजी नवीन प्रस्तावित इमारतीचे उद्घाटन होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी राज्य सरकारने गोरेगावचा पर्याय दिला होता. मात्र शेवटी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे ही इमारत उभारण्याचे निश्चित झाले आहे.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या हस्ते या इमारतीचे भूमिपूजन होणार आहे. याप्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी. आर. गवई, न्या. ए. एक. ओका, न्या. दीपांकर दत्ता, न्या. उज्ज्वल भूयान, न्या. प्रसन्न वरले, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती राहणार आहे.

विरोधक पुण्याची बदनामी करतात म्हणणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांना आप ने म्हटले, फक्त ५ प्रश्न तुमच्यासाठी .. द्या उत्तरे

पुणे- शहराच्या मध्यवर्ती भागात जमीन खचल्याने महापालिकेचा ट्रक थेट भूगर्भात गेल्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठविली आणि यावर बोलायला नको तरी माध्यमांच्या आग्रहावर सध्या केंद्रीय मंत्री असलेल्या माजी महापौरांनी … विरोधक पुण्याची बदनामी करतात अशी प्रतिक्रिया दिली . आता या प्रतिक्रियेला ट्रोल आम आदमी पार्टी करु लागली आहे आम आदमी पार्टीने भाजप ला घेरण्याची तयारी केली असल्याने यावर मुरलीधर मोहोळ व पालकमंत्री काय भूमिका घेणार हा उत्सुकतेचा विषय आहेच . आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी म्हटले आहे मोहोळ यांच्यासाठी आमचे फक्त ५ प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे त्यांनी द्यावे असे आवाहन आम्ही करतो आहे.

मुकुंद किर्दत म्हणाले,’काल सिटी पोस्ट जवळ एक ट्रक खड्ड्यामध्ये गेल्यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी भाजप सरकारवर टीका केली. यावर भाजपचे मुरलीधर मोहोळ यांनी विरोधक पुणे शहराला बदनाम करीत आहेत अशी टीका केली.

आता आम आदमी पार्टी मुरलीधर मोहोळ यांनी पाच प्रश्नांची उत्तरे द्यावीत असे जाहीर आवाहन देत आहे .ते प्रश्न पुढील प्रमाणे …

१) पुण्यातल्या खड्ड्यावरून स्वतः राष्ट्रपतींनीच नाराजी व्यक्त केलेली आहे, मग राष्ट्रपती सुद्धा पुण्याची बदनामी करीत आहेत असे म्हणणार का?

२) पुणे शहर खड्ड्यांचे शहर, पुणे शहर वाहतूक कोंडी चे शहर ,पुणे शहर हे वाढत्या प्रदूषणाचे शहर, पुणे शहर हे कोयता गँगचे, गुंडगिरीचे शहर हे कर्तृत्व कुणाचे आहे?

३) खड्डे आणि वाहतूक कोंडी हा विषय तर स्मार्ट सिटी ची चर्चा सुरू झाली त्याच्याही आधीपासूनच आहे. मागील महिन्यात आपण स्वतः १० दिवसात सर्व खड्डे बुजवले जातील अशी घोषणा केली होती, ते खड्डे बुजले का?

४) रस्त्यावर खड्डे पडल्यास काही वर्षे त्याची जबाबदारी ही त्यात कंत्राटदारावर असेल असं कंत्राट देताना लिहून घेतलेले असते. मग कंत्राटदारांना कामाच्या दोष उत्तरदायित्व कलमा मधून सूट कोण देते?

५) शहरात नगरसेवक वा राजकारण्यांचा हस्तक्षेप पुण्यामध्ये नसताना प्रशासनही वेगळे काहीच करत नाही हा अनुभव गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये आलाच आहे. आता प्रशासनावर कुणाचे नियंत्रण आहे? ट्रिपल इंजिन सरकार पुण्यात काय करते?

श्री गणेशाला पाच हजार पुस्तकांचा महानैवैद्य

पुणे : जय गणेश व्यासपीठातील अकरा गणेश मंडळांच्या वतीने श्री गणेशाला पुस्तककोट अर्थात पुस्तकांचा महानैवैद्य दाखविण्यात आला.
नारायण पेठेतील एसएनडीटी कन्या शाळेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या आवारात राष्ट्रीय कला अकादमीचे अमर लांडे यांनी भव्य रांगोळी साकारली होती. त्या भोवती सुमारे पाच हजार पुस्तकांची आरास करण्यात आली. बालकुमार साहित्य परिषदेचे अध्यक्ष माधव राजगुरू, अनुबंध प्रकाशनचे संचालक अनिल कुलकर्णी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गोळा केलेली पुस्तके ग्रामीण भागातील, आदिवासी वस्तीवरील शाळांमध्ये, संस्कार वर्गात आणि वस्ती पातळीवरील विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेते. मुलांना आवडतील अशी ही पुस्तके आहेत. पुस्तककोट उपक्रमाचे यंदाचे पाचवे वर्ष आहे.
मंडळांचा हा उपक्रम समाजासाठी दिशादर्शक असून मुलांना ही पुस्तके आयुष्याच्या वाटचालीत संकटकाळात लढायला शिकवतील, काही प्रेरणादायी पुस्तके यशस्वी होण्यास मार्गदर्शन करतील. मुलांनी पुस्तकांसोबत अवश्य मैत्री करावी, असे बालकुमार साहित्य परिषदचे अध्यक्ष माधव राजगुरू म्हणाले.
श्री शनी मारुती मंडळ, नवज्योत मित्र मंडळ येरवडा, नवरंग मित्र मंडळ गाडीतळ हडपसर, अजिंक्य मित्र मंडळ मॉडेल कॉलनी, श्री शिवाजी मित्र मंडळ भवानी पेठ, अष्टविनायक मित्र मंडळ येरवडा, वीर शिवराज मित्र मंडळ गुरूवार पेठ, अष्टविनायक मित्र मंडळ नवी पेठ, एकता मित्र मंडळ अरण्येश्वर, संयुक्त मित्र मंडळ सदाशिव पेठ, साईनाथ मंडळ ट्रस्ट बुधवार पेठ या जय गणेश व्यासपीठमधील अकरा मंडळांनी संयोजन केले. पीयुष शहा यांनी प्रास्तविकात उपक्रमाची माहिती दिली. साधारपणे शहरातील पन्नास मंडळे पुस्तककोट आयोजित करीत आहेत. अमित जाधव, प्रल्हाद थोरात, सचिन पवार, गुंजन शेवते, किरण सोनिवल, उमेश शेवते, राहुल जाधव, नीलेश पायगुडे, अथर्व तिवाटणे, सुधीर ढमाले, मयूर पोटे, कुणाल पवार, हर्षद नवले, श्रीकांत बनपट्टे, सागर बनपट्टे, स्वरूप कदम, राज पेंधरे, पीयुष शहा यांनी आयोजन केले.

निसर्गाचा ऱ्हास करणारा विश्वगुरू होणे अशक्य : डॉ. राजेंद्र सिंह

डॉ. राजेंद्र सिंह यांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या ‌‘जोहड‌’ इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन

पुणे : 21व्या शतकात आर्थिक विकास आणि पायाभूत सुविधांच्या निर्मितीमागे लागून निसर्गाचा नाश केला जात आहे. अशा परिस्थितीत देश कधीही विश्वगुरू होऊ शकणार नाही. ज्या वेळी पाणी आणि निसर्गावर प्रेम केले जाईल त्या वेळी आंतरिक ताकद वाढून देशाची विश्वगुरू बनण्यासाठी वाटचाल सुरू होईल, असे प्रतिपादन जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह यांनी केले. मराठी भाषेतील ‌‘जोहड‌’मुळे महाराष्ट्र आणि राजस्थानचे नाते जोडले गेल्याने महाराष्ट्रातील लोकांशी माझी मैत्री झाली. हे पुस्तक इंग्रजी भाषेत आल्यामुळे आता माझी माझी मैत्री देश-विदेशातील लोकांशी होईल, अशा भावनिक शब्दात त्यांनी नात्याची वीण अधिक घट्ट केली.
जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह यांच्या सामाजिक कार्याविषयीच्या ‌‘जोहड‌’ या पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन आज (दि. 22) झाले. त्या वेळी ते बोलत होते. डेक्कन जिमखाना भागातील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्समधील सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ संपादक आणि विचारवंत श्रीराम पवार अध्यक्षस्थानी होते. जागतिक नदी दिनाचे औचित्य साधून पुस्तक प्रकाशन साहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सोनी, संपादक संदीप तापकीर, दुराई स्वामी, ‌‘जोहड‌’ पुस्तकाच्या मराठी आवृत्तीच्या लेखिका सुरेखा शहा, डॉ. कैलास बवले व्यासपीठावर होते. सुरेखा शाह यांनी सुमारे तीन दशकांपूर्वी डॉ. राजेंद्र सिंह यांच्या कार्यावर ‌‘जोहड‌’ पुस्तक लिहले आहे. त्याचा इंग्रजी भाषेत अनुवाद हेमांगिनी जावडेकर-पुराणिक यांनी केला आहे.
जल-वायू परिवर्तनामुळे निसर्गाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास झाला आहे, त्यामुळे पुढील पिढी आपल्याला माफ करणार नाही, हा मुद्दा अधोरेखित करून डॉ. राजेंद्र सिंह म्हणाले, मला राजनिती-अर्थनिती समजत नाही; जमतही नाही परंतु पाणी, नदी, पृथ्वी आणि निसर्ग याविषयी मला समजते, सांगता येते. ते पुढे म्हणाले, भारतात आजही मूळ ज्ञान भरपूर आहे; परंतु मानवी व्यवहारात आपण कमी पडत आहोत. मूळ ज्ञान व्यवहारात आणल्यास त्याला विद्या म्हटले जाईल. परंतु आज आपण ज्ञानाला, विद्येला विसरून व्यावहारिक शिक्षणाला अधिक महत्त्व दिले आहे. असे शिक्षण आपल्याला फक्त स्वार्थी व नोकरदार बनवित आहे. सर्वांच्या सुखासाठी पारंपरिक विद्या ग्रहण करणे गरजेची आहे.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतान श्रीराम पवार म्हणाले, डॉ. राजेंद्र सिंह हे परिवर्तनवादी असून ते निसर्गाशी जोडले गेलेले आहेत. त्यांच्या कामामागे तत्त्वज्ञान आहे, ते उत्तम संवादक आहेत. त्यांच्या कार्याची माहिती ‌‘जोहड‌’मधून संकलित झाली आहे. निसर्गाचा ऱ्हास करणारे परदेशी तंत्रज्ञान उपयोगाचे नाही; परंतु आपण त्याचेच अंधानुकरण करीत आहोत. पाणीविषयक समस्येकडे बघण्याचा डॉ. राजेंद्र सिंह यांचा दृष्टीकोन पूर्णपणे वेगळा आहे. हवामान बदलाविषयी बोलताना पाण्याविषयी बोलणे अपरिहार्य आहे, असे डॉ. सिंह यांचे ठाम मत आहे.
प्रास्ताविकात ‌‘जोहड‌’च्या इंग्रजी आवृत्तीविषयी बोलताना प्रकाशक विशाल सोनी म्हणाले, 21व्या शतकात मोठ्या प्रमाणात भेडसावणारा पाणीप्रश्न आजच्या पिढीपर्यंत पोहोचावा त्यासाठी केले गेलेले कार्य आणि कार्य करण्याची आवश्यकता हे विषय विश्वपातळीवर मांडण्यासाठी पुस्तकाची निर्मिती केली गेली आहे. याद्वारे समाजप्रबोधन करण्याचा हेतू आहे.
डॉ. राजेंद्र सिंह यांचे कार्य प्रेरणादायी असून त्यांनी लोकसहभागातून कार्यकर्त्यांच्या कामाला चळवळीचे स्वरूप दिली आहे, असे मत डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी व्यक्त केले.
मान्यवरांचे स्वागत विशाल सोनी, कैलास बवले यांनी केले. सूत्रसंचालन ऐश्वर्या बागल यांनी केले तर आभार गुरुदास नूलकर यांनी मानले.

कोचिंग संस्थांमधील विद्यार्थ्यांना 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक शुल्काची रक्कम परत – ग्राहक व्यवहार विभागाची कार्यवाही

0


यूपीएससी नागरी सेवा, आयआयटी, वैद्यकीय प्रवेश, सीए आणि व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या विविध कोचिंग संस्थांमधील 656 हून अधिक इच्छुक/विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन (एनसीएच) वर त्यांची तक्रार नोंदवून कोचिंग सेंटर्स/खाजगी संस्थांकडून पैसे परत मिळवण्यासाठी दाखल केला दावा

नवी दिल्‍ली, 22 सप्‍टेंबर 2024

ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण आणि शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता सुनिश्चित करण्याप्रति वचनबद्धतेसह, केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनच्या (एनसीएच) माध्यमातून यूपीएससी नागरी सेवा, आयआयटी आणि इतर प्रवेश परीक्षांसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थी आणि इच्छुकांना न्याय मिळवून देण्यासाठी खटला-पूर्व  टप्प्यावर  यशस्वीरित्या हस्तक्षेप केला आहे.

विविध कोचिंग सेंटर्स विशेषत: नावनोंदणी शुल्क विद्यार्थी/इच्छुकांना परत करत नसल्याबद्दल राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनमध्ये नोंदवण्यात आलेल्या असंख्य तक्रारींनंतर, राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनने मिशन-मोडवर या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी एक मोहीम सुरू केली ज्यामुळे आतापर्यंत एकूण 2.39 कोटी रुपयांचा परतावा मागितलेल्या बाधित विद्यार्थ्यांना एकूण 1 कोटी रुपये परत  मिळू शकणार आहेत.

यूपीएससी नागरी सेवा, आयआयटी आणि इतर कोचिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या मात्र अपूर्ण आश्वासने, अध्यापनाचा निष्कृष्ट दर्जा  आणि अभ्यासक्रम अचानक रद्द करणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागलेल्या विद्यार्थ्यांकडून राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ही निर्णायक कारवाई करण्यात आली आहे.  डेटावरून असे दिसून येते की कोचिंग सेंटर्सनी विद्यार्थ्यांच्या विनंत्या नाकारल्या / फेटाळल्या / समाधानकारक तोडगा काढला नाही म्हणून 12 महिन्यांच्या म्हणजे 2023-2024 या अल्प कालावधीत 16,276 विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनशी संपर्क साधला. डेटा रिपॉझिटरीच्या विश्लेषणातून समोर येते /अधोरेखित होते की  राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनकडे  तक्रार नोंदवणाऱ्या असमाधानी विद्यार्थी/ग्राहकांच्या संख्येत वाढता कल दिसून येत आहे.

2021-2022 मध्ये विद्यार्थ्यांनी नोंदवलेल्या एकूण तक्रारींची संख्या 4,815 आहे, त्यानंतर वर्ष 2022-2023 मध्ये ती 5,351 आणि 2023-2024 मध्ये 16,276 इतकी आहे.  ग्राहक आयोगाचा दरवाजा ठोठावण्यापूर्वी प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा म्हणून राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनवरील  विद्यार्थ्यांचा वाढता  विश्वास या वाढीतून दिसून येतो. वर्ष  2024 मध्ये, याआधीच 6980 विद्यार्थ्यांनी खटला-पूर्व टप्प्यावर त्यांच्या तक्रारींचे जलद निवारण करण्यासाठी राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनकडे धाव घेतली आहे.

देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रभावित  विद्यार्थ्यांना ग्राहक विभागाच्या हस्तक्षेपानंतर परताव्यांची सर्व रक्कम खटला-पूर्व टप्प्यावर परत करण्यात आली, ज्यांनी “यूपीएससी नागरी सेवा”, “जेईई ऍडव्हान्स ” वैद्यकीय प्रवेश, सीए  परीक्षा आणि इतर अभ्यासक्रमांसाठी कोचिंग  उपलब्ध करून देणाऱ्या कोचिंग सेंटर्सच्या विरोधात त्यांच्या शुल्क  परतफेडीचा दावा करून तक्रारी नोंदवल्या आहेत.

भोर विधानसभेवर ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा

चला लढूया परिवर्तनासाठी म्हणत शिवसेनेकडून भोर वेल्हा मुळशी विधानसभेची मोर्चा बांधणी सुरु

भोर वेल्ह्यात शिवसेना (उबाठा) जिल्हा प्रमुख शंकर मांडेकर यांचा शिव संवाद दौरा

शिवसंवाद दौऱ्याच्या माध्यमातून सेनेचे जोरदार शक्ती प्रदर्शन

भोर : ज्याची निवडून यायची क्षमता तोच उमेदवार असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने भोर विधानसभेवर आपला दावा केला आहे. सेनेचे पुणे जिल्हाप्रमुख शंकर मांडेकर यांनी आज भोरमधून शिव संवाद दौरा सुरू करत जोरदार शक्ती प्रदर्शन केले.

भगवा सप्ताहाच्या माध्यमातून जिल्हा प्रमुख शंकर मांडेकर यांनी भोर वेल्हा तालुक्यात ‘चला लढूयात परिवर्तनासाठी’ असा नारा देत शिव संवाद दौऱ्याला सुरूवात केली आहे. छत्रपती शिवरायांनी ज्या स्वराज्याची शपथ किल्ले रायरेश्वरावर घेतली. त्या रायरेश्वर किल्ल्यावरून मांडेकर यांनी आपल्या शिवसंवाद दौऱ्याची सुरूवात केली.  त्याचबरोबर भोर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी संपर्क प्रमुख सुनील धाकड,उपजिल्हा प्रमुख संतोष मोहळ, संघटक प्रसाद शिंदे, तालुका प्रमुख हनुमंत कंक, दीपक दामगुडे, सचिन खैरे, युवा सेना जिल्हाधिकारी आदीत्य बोरगे, राम गवारे, अनिल पराठे, शरद जाधव, प्रकाश भेगडे, स्वाती ढमाले, शैलेश वालगुडे, सतीश शेलार, दशरथ गोळे, भरत साळुंके आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या दौऱ्याच्या माध्यमातून भोर आणि वेल्हा या दोन्ही तालुक्यात पक्ष संघटन मजबूत करण्याबरोबरच लोकांचे प्रश्न समजावून घेणार असल्याचे मांडेकर म्हणाले. या मतदारसंघात सेनेची ताकद जास्त आहे. त्यामुळे ज्याची निवडून येण्याची क्षमता या सूत्राप्रमाणे आम्ही या मतदारसंघावर दावा करतोय. 

सेनेचे  जोरदार शक्ती प्रदर्शन-राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये झालेल्या फुटीनंतर भोर वेल्हा मुळशी या मतदारसंघातील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलली आहेत. लोकसभा निवडणुकी दरम्यान ही शिवसेनेने (उबाठा) या मतदार संघातील भोर, वेल्हा आणि मुळशी या तिन्ही तालुक्यात आपली ताकद दाखवून दिली आहे. याच आधारावर शिवसैनिक आता या मतदार संघावर दावा करत आहेत. मांडेकरांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच सेनेची ताकद दाखवत आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत सेनेची ताकद दाखवून दिली. त्यामुळे या दौऱ्याची चांगलीच चर्चा रंगत आहे.  दहा दिवस या दौऱ्याच्या माध्यमातून भोर आणि वेल्हा तालुक्यातील गाव शिवसैनिक पिंजून काढणार आहेत.

श्री. शाहू छत्रपती महाराजांचा डीईएसतर्फे सन्मान

पुणे- जगात  सर्वात मोठ्या असणाऱ्या आपल्या लोकशाहीचे संगोपन करणे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य असून, त्या आधारे आपण जगाचे नेतृत्व करू शकू असा विश्वास डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे (डीईएस) अध्यक्ष खासदार श्री. शाहू छत्रपती महाराज यांनी व्यक्त केला.
लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून आल्याबद्दल श्री. शाहू छत्रपती महाराजांचा डीईएसच्या वतीने सन्मान करण्यात आला. 
सोसायटीच्या नियामक मंडळ आणि परिषदेचे अध्यक्ष प्रमोद रावत, उपाध्यक्ष ॲड. अशोक पलांडे, कार्यवाह डॉ. आनंद काटिकर, विश्वस्त जगदीश कदम, प्रा. स्वाती जोगळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. शाहू छत्रपती म्हणाले, “140 वर्षांचा इतिहास असणाऱ्या डीईएसचा मी 41 वर्षे अध्यक्ष आहे. या संस्थेत दूरदृष्टी असणाऱ्या अनेक चांगल्या व्यक्तींबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यातून मिळालेल्या मोठ्या अनुभवाचा उपयोग लोकसभा सभागृहाच्या माध्यमातून जनतेचे व्यापक स्वरूपातील प्रश्न सोडविण्यासाठी होऊ शकेल, असा विश्वास वाटतो.”

तिसरी राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धानैशा रेवसकर हिला दुहेरी मुकुट;शौरेन सोमणचे सनसनाटी विजेतेपद

0

संभाजीनगर दिनांक २२ सप्टेंबर
पुण्याची राष्ट्रीय खेळाडू नैशा रेवसकर हिने तिसऱ्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील अनुक्रमे १५ व १७ वर्षाखालील मुलींच्या गटात विजेतेपद पटकावित दुहेरी मुकुट मिळविला. मुलांच्या सतरा वर्षाखालील गटात पुण्याच्या शौरेन सोमण यानेही विजेतेपद मिळवित सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

 टेबल टेनिस स्पोर्ट्स वेल्फेअर असोसिएशन ऑफ संभाजीनगर यांनी येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात संभाजीनगर जिल्हा टेबल टेनिस संघटना आणि महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

मुलींच्या पंधरा वर्षाखालील गटात रेवसकर हिने अंतिम फेरीत नाशिकची द्वितीय मानांकित खेळाडू स्वरा करमरकर हिचा पराभव करीत आपले अग्रमानांकन सार्थ ठरविले. हा सामना तिने ११-९,११-४, १३-११ असा सरळ तीन गेम्स मध्ये जिंकताना काउंटर अटॅक पद्धतीचा बहारदार खेळ केला. पाठोपाठ सतरा वर्षाखालील गटाच्या अंतिम फेरीत तिने ठाण्याची पाचवी मानांकित खेळाडू रितिका माथुर हिचे आव्हान ९-११,११-७, ११-४,११-५ असे परतविले. पहिली गेम गमावल्यानंतर तिने सर्व्हिस व परतीचे फटके याच्यावर नियंत्रण ठेवीत विजय मिळविला. ती नीरज होनप यांच्या मार्गदर्शनाखाली एम्स अकादमीत प्रशिक्षण घेत आहे. हिमाचल प्रदेश मध्ये नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय मानांकन स्पर्धेत तिने रौप्य पदक जिंकले होते.

मुलांच्या सतरा वर्षाखालील गटात सोमण याने अंतिम फेरीत अग्रमानांकित खेळाडू पार्थ मगर (मुंबई महानगर जिल्हा) याला पराभवाचा धक्का दिला. मात्र हा सामना जिंकताना त्याला खूपच संघर्ष करावा लागला. चुरशीने झालेला हा सामना त्याने ११-८,११-७,११-७,१०-१२,१२-१० असा जिंकला. सोमण हा नीरज होनप यांच्या मार्गदर्शनाखाली एम्स अकादमीत प्रशिक्षण घेत आहे.

मुलांच्या पंधरा वर्षाखालील गटात ठाण्याचा द्वितीय मानांकित खेळाडू मयुरेश सावंत याला विजेतेपद मिळाले अंतिम सामन्यात त्याने आपला सहकारी व अग्रमानांकित खेळाडू नीलय पाटेकर याचा ८-११,११-९, ११-४,७-११,११-७ असा पराभव केला‌. त्याने अष्टपैलू खेळाचा प्रत्यय घडविला‌.

अभियंता दिनी विद्यार्थी साहाय्यक समितीमध्ये ‘प्रौद्योगिक : शाश्वतता’ कार्यक्रमाचे आयोजन

पुणे: थोर अभियंते भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या जयंतीनिमित्त देशभरात अभियंता दिन उत्साहात साजरा झाला. विद्यार्थी साहाय्यक समितीमध्येही अभियंता दिनाचे औचित्य साधून ‘प्रौद्योगिक : शाश्वतता’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शाश्वततेचे प्रतीक असलेल्या ‘प्रौद्योगिक’ संकल्पनेअंतर्गत अभियांत्रिकी क्षेत्रातील नावीन्य, सहयोग आणि उत्कृष्ट योगदान साजरे करण्याचा या विशेष कार्यक्रमाचा उद्देश होता. शनिवार (दि. १४) व रविवार (दि. १५) या दोन दिवसांच्या उत्सवात हॅकेथॉन स्पर्धा, इनोव्हेशन फेअर, उद्योजकता स्पर्धा, मजेदार शैक्षणिक खेळ, पोस्टर स्पर्धा, ‘आलसी इंजिनिअर’ वर चर्चासत्र आणि अनुभवकथन अशा विविध उपक्रमांचा समावेश होता.

भारत फोर्जचे वरिष्ठ व्यवस्थापक शैलेंद्र चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रोश डिजिटल सेंटर ऑफ एक्सलन्सचे टेक लीड अविनाश कुमार तिवारी, पुणे विद्यार्थी गृहाच्या अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयातील यांत्रिक अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख मनमोहन भूमकर, फाउंडेशन फॉर मेकइटहॅपन सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्व्हेंशन अँड इन्क्युबेशनचे (एफएमसीआयआयआय) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रशेखर तलाठी, हेलिक्स इंटिग्रेटेड लर्निंगचे संस्थापक नाथाजी शेळके, अभियंता विवेक सलवारू, मायक्रोपॉइंट कॉम्प्युटर्सचे राहुल चौधरी आणि श्री दीपक नारखेडे यांच्यासह एआय, क्लाउड कम्प्युटिंग आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज क्षेत्रातील तज्ज्ञ यावेळी उपस्थित होते.

अभियंता दिनाच्या निमित्ताने घेतलेल्या स्पर्धांत मॉक प्लेसमेंटमध्ये राजकन्या पाटील (प्रथम), वैष्णवी लष्करे (द्वितीय), प्रथमेश काटे (तृतीय), हॅकेथॉन स्पर्धेत वैभव काळे (प्रथम), ज्ञानेश्वरी थोरवे (द्वितीय), तन्वी घोलप (तृतीय), इनोव्हेशन फेअर आणि उद्योजकता यामध्ये प्रसाद काकडे (प्रथम), तन्मय बामदाळे (द्वितीय), पल्लवी शिंदे (तृतीय), पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये वैष्णवी बिरादार (प्रथम), शिवानी देशमुख (द्वितीय), वैष्णवी हर्ले (तृतीय) यांनी यश संपादन केले.

समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजिला होता. विश्वस्त रत्नाकर मते, विद्यार्थी विकास केंद्राचे अध्यक्ष प्रभाकर पाटील, इंजिनिअरिंग क्लबचे प्रमुख माजी विद्यार्थी सुनील चोरे, माजी विद्यार्थी प्रा. सचिन जायभाये, गणेश चव्हाण, अभियांत्रिकी क्लब समन्वयक आकाश दुबे, क्लब प्रमुख साश्वती कुलकर्णी (सुमित्रासदन), अंशु कुमारी (डॉ. आपटे वसतिगृह), रोहित गोरे (लजपतराय विद्यार्थी भवन) यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

समाजात नवचैतन्य पेरणाऱ्या संस्थांनी एकत्रित यावे

हास्ययोगाच्या गिनीज बुक रेकॉर्डसाठी पुढाकार घेणार-चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन-नवचैतन्य हास्ययोग परिवाराच्या वर्धापन दिनानिमित्त मेळावा
पुणे : “हास्यक्लब ही आता चळवळ झाली असून, यांसारख्या चांगल्या उपक्रमाची संख्या वाढली पाहिजे. लोकांना आनंद वाटून समाजात नवचैतन्य पेरण्याचे काम करणाऱ्या अनेक अराजकीय संस्था पुण्यात काम करत आहेत. अशा सर्व संस्थांना एकत्रित आणून समन्वयाने काम केले, तर पुणे शहर आनंदी व हसरे होईल. त्यासाठी नवचैतन्य हास्ययोग परिवाराने पुढाकार घ्यावा,” असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

‘मानवसेवा हीच ईश्वरसेवा आहे, अशी भावना समाजात रुजावी, सकारात्मकता वाढावी, तसेच हास्ययोग लोकप्रिय व्हावा, यासाठी लिम्का बुक किंवा गिनीज बुक यांसारख्या विश्वविक्रमात त्याची नोंद व्हावी. या विश्वविक्रमी कार्यक्रमाच्या संयोजनात माझा पुढाकार राहील व त्यासाठी लागणारी सर्वतोपरी मदत मी करेल. एकाच वेळी २५ हजार लोक हास्ययोग करत आहेत, असा विक्रमी उपक्रम येत्या काही महिन्यात घेतला जावा,’ असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले.

नवचैतन्य हास्ययोग परिवाराच्या वर्धापन दिनानिमित्त गणेश कला क्रीडामंच येथे आयोजित मेळाव्याचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. प्रसंगी केंद्रीय हवाई वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, पीतांबरीचे मुख्य विक्री अधिकारी मंदार फडके,रॉयल पुरंदर चे राजेश कोठारी उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश धोका, ‘नवचैतन्य’चे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल काटे, सुमन काटे, मुख्य समन्वयक मकरंद टिल्लू, उपाध्यक्ष विजय भोसले, सचिव पोपटलाल शिंगवी, खजिनदार ऍड. रामचंद्र राऊत, जयंत दशपुत्रे आदी उपस्थित होते. कॉर्पोरेट कीर्तनकार समीर लिमये यांचे प्रबोधनात्मक व्याख्यान झाले.

‘जगणे सुदृढ होण्यासाठी हास्ययोग हे टॉनिक आहे. नवचैतन्य हास्ययोग परिवाराने ज्येष्ठांच्या आयुष्यात परिवर्तन घडवले आहे. यातूनच सुदृढ समाज निश्चित तयार होईल,’ असा विश्वास मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला. ‘नवचैतन्य’ समाजाला सकारात्मक ऊर्जा देण्याचे काम करत असून, महाराष्ट्रात सुरू असलेले हे कार्य दिल्लीपर्यंत नेण्यासाठी सहकार्य करेन, असे प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी सांगितले.

विठ्ठल काटे यांनी हास्ययोग चळवळीचा होत असलेला विस्तार, त्यातून लोकांना होणारा लाभ आणि हास्ययोगाचे महत्व विशद केले. दुसऱ्याला आनंदी करण्याचे काम आम्ही करत आहोत, असेही ते म्हणाले. तसेच मकरंद टिल्लू व सुमन काटे यांच्यासोबत विविध हास्यप्रकार घेत सभागृहात नवचैतन्य फुलवले.

नवचैतन्य हास्ययोग परिवारात आज २३० शाखा, २५ हजार सदस्य आहेत. येत्या काळात एक लाख सदस्य करण्याचे आमचे ध्येय असून, त्यासाठी २५० सोसायट्यांमधून हास्यक्लब सुरु करण्याचा प्रयत्न आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून देशविदेशात आता हास्ययोगाच्या शाखा भरू लागल्यात याचे समाधान आहे. प्राध्यापक, सरकारी कर्मचारी, कंपन्या यांच्यासाठी हास्ययोग कार्यशाळा घेत आहोत”, असे मकरंद टिल्लू यांनी नमूद केले.

यावेळी विविध शाखेतील सुमारे ४०० सदस्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. सूत्रसंचालन सुभाष राजवळ यांनी केले. आभार विजय भोसले यांनी मानले.

मुख्य न्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या हस्ते  नॅशनल लॉ स्कूलच्या जेएसडब्ल्यू अकॅडेमिक ब्लॉकची पायाभरणी

0

कायदे क्षेत्रामध्ये नवीन तंत्रज्ञान  कल्पनांवर लक्ष केंद्रित करणारे नवीन ‘सेंटर फॉर  फ्यूचर ऑफ लॉ‘ तयार करण्यासाठी जेएसडब्ल्यू बांधील आहे

बंगलोर, २२ सप्टेंबर, २०२४:  देशात कायद्याच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात एक लक्षणीय टप्पा असलेल्या जेएसडब्ल्यू अकॅडेमिक ब्लॉकचा पायाभरणी समारंभ भारताचे मुख्य न्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड यांच्या हस्ते आज पार पडला. बंगलोरमधील नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटीमध्ये अकॅडेमिक ब्लॉकचा सर्वसमावेशक पुनर्विकास आणि विस्तार जेएसडब्ल्यू अकॅडेमिक ब्लॉकच्या रूपाने करण्यात येत आहे.

प्रस्तावित योजनेनुसार, सध्याच्या इमारतीचे रूपांतर एका बहुमजली संरचनेमध्ये केले जाईल, त्यामध्ये अत्याधुनिक लेक्चर थिएटर्स, सेमिनल कक्ष, फॅकल्टी ऑफिसेस आणि कोलॅबोरेटीव्ह रिसर्च स्पेसेस असतील. या अत्याधुनिक सुविधांमुळे विद्यार्थी व संशोधकांना प्रगत शिक्षण वातावरणाचे लाभ घेता येतील, वेगाने बदलत असलेल्या कायदा क्षेत्रात स्वतःचा उत्कर्ष साध्य करता येईल.  

जेएसडब्ल्यू ग्रुपकडून मिळालेल्या अनुदानामुळे हा प्रकल्प संभव होत आहे. नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटीमधील शैक्षणिक पायाभूत सोयीसुविधांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी करण्यात येत असलेल्या व्यापक सहयोगांचा हा एक भाग आहे. या अनुदानामधून अकॅडेमिक ब्लॉकचे काम केले जाईल, तसेच जेएसडब्ल्यू सेंटर फॉर  फ्युचर ऑफ लॉ ची स्थापना केली जाईल. कायदा क्षेत्रातील तंत्रज्ञान प्रगतीमुळे निर्माण झालेल्या संधींचा लाभ घेण्यासाठी तसेच या क्षेत्रातील नवीन आव्हाने दूर करण्यासाठी हे अत्याधुनिक संशोधन केंद्र डिझाईन करण्यात येत आहे. या केंद्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिजिटल प्रायव्हसी, ऑटोमेशन आणि नवीन तंत्रज्ञानाचे  नैतिक परिणाम यासारख्या विषयांवर संशोधनामध्ये हे केंद्र आघाडीवर राहील. शिक्षणक्षेत्रातील व्यक्ती, सरकारी विभाग, नियामक अधिकारी आणि खाजगी क्षेत्रामध्ये समन्वय घडून येऊन कायदेशीर नियमनाचे नवीन मॉडेल्स विकसित करण्यासाठी व अत्याधुनिक कायदा तंत्रज्ञानाची मुळे रुजवली जावीत यासाठी हे केंद्र प्रयत्नशील राहील.

यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते – भारताचे ऍटर्नी जनरल, श्री आर. वेंकटरामानी; बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष, श्री मनन कुमार मिश्रा; जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या अध्यक्षा, श्रीमती संगिता जिंदल; आणि जेएसडब्ल्यू सिमेंट व जेएसडब्ल्यू पेंट्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री पार्थ जिंदल.

जेएसडब्ल्यू ग्रुपचे चेयरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर श्री सज्जन जिंदल म्हणाले, जेएसडब्ल्यूमध्ये आमचा शिक्षणाच्या परिवर्तन शक्तीवर ठाम विश्वास आहेअकॅडेमिक ब्लॉकचा विकास आणि जेएसडब्ल्यू सेंटर फॉर  फ्यूचर ऑफ लॉची स्थापना या फक्त सुविधा नाहीत तर कायदा आणि तंत्रज्ञानाच्या वेगाने बदलत चाललेल्या क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी कायदा व्यावसायिकांच्या नव्या पिढीला तयार करणे हा यामागचा उद्देश आहेराष्ट्रनिर्मितीवर शाश्वत प्रभाव निर्माण करतील अशा उपक्रमांना पाठिंबा देण्याच्या आमच्या व्हिजनला अनुरूप अशी ही भागीदारी आहे.”

जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती संगीता जिंदल यांनी याच्या दीर्घकालीन लाभांवर प्रकाश टाकला, त्या म्हणाल्या, “नॅशनल लॉ स्कूल इंडिया युनिव्हर्सिटीमध्ये पायाभूत सोयीसुविधांच्या उभारणीमध्ये आम्ही करत असलेल्या गुंतवणुकीचा उद्देश एक असे वातावरण निर्माण करण्याचा आहेज्यामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञान मिळवण्याबरोबरीनेच समाजातील आव्हाने दूर करण्यासाठी देखील सक्षम केले जाईलआम्ही असे मानतो कीभारतामध्ये कायद्याच्या भविष्याला असे प्रोफेशनल आकार देतील जे न्याय  समानतेच्या तत्त्वांची पाठराखण करत असताना नवनवीन तंत्रज्ञानाचा अंगीकार करण्यासाठी देखील तयार असतीलजेएसडब्ल्यू अकॅडेमिक ब्लॉक आणि सेंटर फॉर  फ्यूचर ऑफ लॉ हे व्हिजन पूर्ण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.”

जेएसडब्ल्यू सिमेंट आणि जेएसडब्ल्यू पेंट्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री पार्थ जिंदल यांनी सांगितले, “कायदा क्षेत्रात तंत्रज्ञान खूप मोठे परिवर्तन अतिशय वेगाने घडवून आणत आहेकॉन्ट्रॅक्ट ऍनालिसिससाठी एआयसक्षम टूल्सपासून लिटिगेशनमध्ये ऑटोमेशनपर्यंत अनेक गोष्टींचा यामध्ये समावेश आहेजेएसडब्ल्यू सेंटर फॉर  फ्यूचर ऑफ लॉमुळे नॅशनल लॉ स्कूल इंडिया युनिव्हर्सिटी या सर्व नवनवीन विकासामध्ये आघाडीवर राहू शकेलभविष्यातील कायदा व्यावसायिकांना या तंत्रज्ञानाचा अंगीकार करण्यासाठी तसेच त्याचे नियमन करण्यासाठी तयार केले जाईलनॅशनल लॉ स्कूल इंडिया युनिव्हर्सिटीसोबत आमची भागीदारी भविष्यातील नेत्यांना सक्षम करणाऱ्याजागतिक दर्जाच्या शैक्षणिक संधी निर्माण करण्याप्रती जेएसडब्ल्यूची बांधिलकी दर्शवते.”

ही भागीदारी करून जेएसडब्ल्यू ग्रुप आणि नॅशनल लॉ स्कूल इंडिया युनिव्हर्सिटी भारतामध्ये कायदा शिक्षणाच्या भविष्याला आकार देण्यासाठी, हे शिक्षण अधिक समावेशक, तंत्रज्ञानावर आधारित आणि या व्यवसायात घडून येत असलेल्या बदलांना अनुरूप असावे यासाठी एकत्र मिळून काम करण्यासाठी बांधील राहतील.

गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्याला ‘दिशा’ देण्याचे काम कौतुकास्पद

  • प्रा. डॉ. रवींद्र कुलकर्णी यांचे प्रतिपादन; दिशा परिवाराच्या वतीने २५० गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान
  • सामाजिक कार्यकर्ते दीपक हिरवे, मनीषा गाडे यांचा दिशा परिवार सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराने गौरव

पुणे, ता. २२: “समाजातील गरजू व वंचित घटकांच्या पाठीशी उभे राहून त्यांना दिशा देण्याचे काम दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्ट करत आहे. जाती-धर्माच्या भिंती भेदून प्रत्येकाला चांगले शिक्षण मिळावे, या उदात्त हेतूने सुरु असलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या या कार्यात दातृत्वाचे अनेक हात लागले आहेत, ही प्रेरणादायी बाब आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ गणितज्ज्ञ प्रा. डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी केले.

दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने १८ वा शैक्षणिक शिष्यवृत्ती व दिशा परिवार सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार वितरणाप्रसंगी प्रा. डॉ. रवींद्र कुलकर्णी बोलत होते. पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनात (घोले रस्ता) झालेल्या सोहळ्यात २५० गरजू विद्यार्थ्यांना देणगीदारांच्याच हस्ते शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. यंदाचा दिशा परिवार सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते दीपक हिरवे व मनीषा गाडे यांना प्रदान करण्यात आला. मराठवाडा मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. भाऊसाहेब जाधव, सामाजिक कार्यकर्त्या ऍड. मिताली सावळेकर, डाॅ. मिलिंद मुजुमदार, सल्लागार बी. एल. स्वामी, दिशा परिवाराचे अध्यक्ष माणिकराव गोते, कार्याध्यक्ष राजाभाऊ चव्हाण, पौर्णिमा जानोरकर, कल्‍पना भोसले, अल्‍पना चव्‍हाण, पांचाली हर्षे, मकरंद कुलकर्णी, अरुण कुलकर्णी, चिन्‍मय कुलकर्णी यांच्यासह अन्य पदाधिकारी, विद्यार्थी, देणगीदार उपस्थित होते.

प्रा. डॉ. रवींद्र कुलकर्णी म्हणाले, “सातत्याने विकसित होत असलेले तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी युवकांनी शिक्षित होणे गरजेचे आहे. शिक्षणाची आवड असलेल्या युवकांना परिस्थितीमुळे वंचित राहावे लागू नये म्हणून दिशा परिवाराने देणगीदार व गरजू विद्यार्थ्यांच्या मिलनाचा हा उपक्रम स्तुत्य आहे. जीवनात आर्थिक स्‍थैर्य प्राप्‍त झाल्‍यानंतर प्रत्येकाने सामाजिक कामात योगदान द्यायला हवे. माझ्या संपत्तीमधील २० टक्के वाटा जवळच्या नातेवाईकांसाठी, तर उर्वरित ८० टक्के वाटा सामाजिक कार्यासाठी देणार आहे. माझ्या फाउंडेशनच्या माध्यमातून दिशा परिवाराला मदत करणार आहे.”

भाऊसाहेब जाधव म्‍हणाले, “हजारो विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम दिशा परिवाराने केले आहे. आज त्यातील अनेक मुले मिळालेल्या मदतीची परतफेड करण्याची संधी घेत आहेत. दिशा परिवारात दाते व मदत घेणारे गरजू विद्यार्थी हे सर्व जाती-धर्माचे आहेत. त्‍यामुळे इथे केवळ शिष्यवृत्तीच दिली जात नाही, तर समाजाला एकसंध ठेवण्याची भावना रुजवली जाते.”

यावेळी गाडे आणि हिरवे यांनी पुरस्‍कारामुळे आणखी चांगले काम करण्याचा प्रेरणा मिळाली आणि यापुढे सामाजिक कार्य सुरुच ठेवणार असल्‍याचे सांगितले. दिशा परिवारामुळे जीवनाला दिशा मिळाल्‍याची भावना विद्यार्थ्यांनी व्‍यक्‍त केली. ऍड. मिताली सावळेकर, बी. एल. स्‍वामी, डाॅ. मिलिंद मुजुमदार यांनी आपली मनोगते व्यक्त करत विद्यार्थ्यांना सदिच्छा दिल्या. राजाभाऊ चव्हाण यांनी दिशा परिवाराच्या कार्याविषयी प्रास्ताविकात माहिती दिली.

पृथ्वीराजांचा बी.पी. वाढतोय..तिघांचे काम करतात एकटेच..शासन करतेय घोषणांवर घोषणा पण अंमल करण्यास अधिकारीच देत नाहीत

पुणे : महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी यांचा बिपी आता वाढतोय असे सांगितले जातेय त्यामागे कारणही तसेच आहे निवडणुकांच्या तोंडावर शासन घोषणांवर घोषणा करतेय पण या घोषणांची अंमलबजावणी करण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक मात्र करत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्तांच्या ३ जागा असताना एकाच जागेवर शासनाने पृथ्वीराज बी पी यांची नेमणूक केली अन्य दोन अतिरिक्त आयुक्तांच्या जागा रिक्तच आहेत,ढाकणे यांच्यासारख्या सक्षम अधिकाऱ्याची ३ वर्षे होण्या अगोदरच बदली केली आणि त्यांच्या जागीही कोणाला आणलेले नाही.आता एकूण ३ अतिरिक्त आयुक्तांच्या कामाचा गाडा एकट्या पृथ्वीराजांना उचलावा लागत असल्याने त्यांचा बी पी वाढतोय आणि त्याची देखभाल आरोग्य खात्यातील 2 अधिकारी योग्य लाभ घेत करत असल्याचे दिसून आले आहे.तर ड्रेनेज,रस्ते वाहतूक, पाणीपुरवठा खात्यातील अधिकारीही सेनापतीच डळमळीत असल्याने हतबल झाल्याने शहराच्या समस्येत वाढ होत असल्याचा खाजगीत दावा करताना दिसत आहेत.महापालिकेच्या निवडणुका घेतल्या नाहीत आणि अधिकाऱ्यांचे बळ हि कमी करून ठेवल्याने बहुसंख्य निर्णय मंत्रालयातील सुच्नान्वारच अवलंबून असल्याचे सांगितले जातेय.एकूणच संविधान वाचवा एकीकडे म्हटले जात असले तरी दुसरीकडे संविधानाने दिलेले स्थानिक स्वराज्य संस्थांचे मुलभूत हक्कच मुंबईतील राजकारण्यांनी हिरावून घेतल्याचा आरोप होतो आहे.

लोकसभा निवडणुकीपुर्वी एप्रिलमध्ये महापालिकेतील दोन अतिरिक्त आयुक्तांची बदली करण्यात आली आहे.परंतू सहा महिने होत आले तरी त्यांच्या जागेवर अद्याप कोणाचीही नियुक्ती झालेली नाही. महापालिकेच्या जवळपास सर्वच विभागांचा कार्यभार एकाच अतिरिक्त आयुक्तांना पार पाडावा लागत आहे. एकिकडे सत्ताधारी पुण्यासाठी कोट्यवधी रुपये निधीच्या प्रकल्पांची घोषणा करत असताना त्या प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यासाठी अधिकारीच नेमत नसल्याने राज्य शासनाच्या ‘हेतू’ बद्दलच शंका उपस्थित करण्यात येउ लागली आहे.यावर्षी एप्रिल ते जून दरम्यान लोकसभेच्या सात टप्प्यांमध्ये निवडणुका झाल्या. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निवडणुकीच्या घोषणेपुर्वी एकाच जिल्ह्यात तीन वर्षांपासून अधिक काळ काम करणार्‍या प्रशासकीय आणि पोलिस अधिकार्‍यांची अन्य जिल्ह्यात बदली करण्यात आली. शासनाने पुणे महापालिका आयुक्त, तीन अतिरिक्त आयुक्त या आयएएस अधिकार्‍यांसह उपायुक्त दर्जाच्या पाच अधिकार्‍यांची बदली केली. बदली झालेल्या या अधिकार्‍यांच्या जागेवर अन्य अधिकार्‍यांची नियुक्ती होईल, अशी अपेक्षा होती. त्यानुसार महापालिका आयुक्त पदावर डॉ. राजेंद्र भोसले यांची तर अतिरिक्त आयुक्तांच्या रिक्त झालेल्या तीन जागांपैकी केवळ एका जागेवर पृथ्वीराज बी.पी.या आयएएस अधिकार्‍याची नेमणूक झाली.परंतू उर्वरीत दोन अतिरिक्त आयुक्त आणि पाच उपायुक्तांच्या जागा रिक्तच ठेवण्यात आल्या. जूनमध्ये निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आचारसंहिता संपली. यानंतर उपायुक्तांच्या रिक्त जागांवर शासनातील अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली. साधारण त्याचवेळी अतिरिक्त आयुक्त पदाच्या जागाही भरण्यात येतील अशी अपेक्षा होती. परंतू आता सप्टेंबर महिना संपत आला असतानाही या दोन्ही जागा रिक्तच ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे मागील जवळपास सहा महिन्यांपासून अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांच्याकडेच सर्वच विभागांचा कारभार आला आहे.नुकतेच झालेल्या पावसाळ्यात नदीला दोन तीन वेळा आलेला पूर, खड्डेमय रस्ते, मिसिंग लिंकसाठी भूसंपादनाच्या प्रक्रिया,मिळकत कराची वसुली, शहर स्वच्छता अभियान, कर्मचार्‍यांच्या नियमीत बदल्या, शिक्षण विभाग,
आरोग्य विभाग, अतिक्रमण, पाणी पुरवठा अशा सर्वच महत्वाच्या विभागांतील दैनंदीन कामांपासून प्रकल्पांच्या सुरू
असलेल्या कामांवरील देखरेख आणि निर्णय प्रक्रिया यावर एकटयाच अधिकार्‍याला लक्ष द्यावे लागत असल्याने प्रशासनाचा गाडा रुळावरून घसरला आहे. अशातच राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मंत्र्यांचे दौरे,बैठकांना उपस्थिती यासाठीही एकाच अधिकार्‍यावर लोड असल्याचे पाहायला मिळत असूनकामाच्या अति ओझ्यामुळे नागरिकांना वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटणेही मुश्किल झाले आहे.अशी परिस्थिती असताना शासन अद्याप अतिरिक्त आयुक्तपदाच्या रिक्त जागा का भरत नाही? यावरून प्रशासकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू आहे.

पुणे-बेंगळुरू बायपाससाठी ३०० कोटी रुपये

पुणे : पुणे-बेंगळुरू बायपासवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी सूचविलेल्या उपाययोजनांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हिरवा कंदील दर्शविला असून तातडीने ३०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास तत्वत: मान्यता दिल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
पुणे-बेंगळुरू बायपासवरील वाहतूक कोंडी हा सध्याचा गंभीर विषय बनला आहे. या पार्श्वभूमीवर श्री. पाटील यांनी वाहतूक पोलिसांशी चर्चा करून त्यावर उपाययोजना करण्याबाबत सूचना केली आहे. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार तसेच अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सरव्यवस्थापक अंशुमाळी श्रीवास्तव, प्रकल्प संचालक संजय कदम, महापालिकेचे शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, महापालिकेचे वाहतूक नियोजनकार निखिल मिजार, आर्किटेक्ट ( मेटा आर्च) मिलिंद रोडे यांच्यासह इतर सहकाऱ्यांसमवेत आवश्यक उपाययोजनांचा अहवाल तयार केला.
अतिरिक्त पोलिस आयुक्त पाटील यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यासमोर शनिवारी या उपाययोजनांबाबत सादरीकरण केले. गडकरी यांनी या सादरीकरणाचे कौतुक करत तातडीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पुणे वाहतूक पोलिसांना एकत्र बैठक घेण्यास सांगितले. त्यानुसार शनिवारी सायंकाळपर्यंत करावयाच्या उपाययोजनांबाबत दोन्ही यंत्रणांनी कृती आराखडा तयार केला असून त्याला श्री. गडकरी यांनी ३०० कोटी रुपयांच्या खर्चास तत्वत: मान्यता दिल्याचे श्री. चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी वेळोवेळी बैठका घेऊन; वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, पुणे पोलीस, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करुन; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समोर सादरीकरण केले.
प्रस्तावित विकास कामे

  • पुणे महापालिकेच्या माध्यमातून भूमकर अंडरपास शेजारी प्री-कास्ट बॉक्स पद्धतीचा जोड अंडरपास करणे.
  • ननावरे अंडर पासजवळ किया शोरुम येथे आणि रिनॉल्ट शोरुम येथे प्रत्येकी एक असे दोन अंडरपास तयार करणे.
  • नवले ब्रीज येथे नऱ्हेच्या दिशने जाणाऱ्या वाहनांसाठी एका लेनवर कॉन्टिलिव्हर ब्रीज बांधून इतर सर्व लेनला चॅनेलाईज करून चौक सिग्नल फ्री करणे.
  • पाषाण-सूस रोडवरुन हायवेला जोडणारा जोड रस्ता व प्रलंबित सर्व्हिस रोड पूर्ण करणे.
  • राधा हॉटेल येथील पीएमपीएमएलची जागा व हॉटेल ऑर्किड समोरिल जागेवर १०० मीटर मार्जिन रस्ता तयार करुन रोटरी वाहतूक सुरू करणे. तसेच, याठिकाणी अंडरबायपास तयार करण्यासाठी व्यवहार्यता तपासणी करणे.
  • पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोड पैकी २७.९९ किमी लांबीचे व १२ मीटर रुंदीचे सर्व्हिस रोड तयार करणे.
  • पुणे महापालिकेकडून ४९.१२ लांबीचा व १२ किमी रुंदीचा बाह्य सेवा रस्ता तयार करणे.
  • पुणे महापालिकेच्या माध्यमातून बाणेर रस्त्याला बालेवाडी-औंध रस्ता सक्षम पर्याय असल्याने बालेवाडी स्टेडियम समोर बालेवाडी कडून मुंबईला जोडण्यासाठी उड्डाणपूल उभारणे आदी उपाय सुचविण्यात आले.

पुणे-बेंगळुरू बायपासची वस्तुस्थिती

  • गेल्या पाच वर्षात सुमारे २० लाख वाहनांची वाढ.
  • पुण्यात २०१८ मध्ये पुण्याची वाहनसंख्या ५२ लाख होती, ती २०२४ मध्ये ७२ लाखांपर्यंत पोहोचली आहे.
  • दररोज १३०० नवीन वाहनांची भर पडते, त्यामुळे वाहतूक कोंडीत वाढ होत आहे.
  • पुण्याला नसणारे रिंग रोड नसल्याने पुणे-बेंगळुरू रस्त्याचा वापर रिंग रोड म्हणून करण्यात येतो.
  • पुणे-बेंगळुरू रस्ता सध्या जरी बायपास म्हणून असला तरी तो सोलापूर, सासवड, सातारा, मुंबईकडून ये-जा करणाऱ्या वाहनांसाठी हा रस्ता रिंग रोड म्हणून वापरला जातो.
  • या बासपायची निर्मीती १९९४ मध्ये दोन लेनचा हायवे म्हणून करण्यात आली होती.
  • हा बायपास २००० मध्ये दोन लेनचा रस्ता वाढवून चार लेनचा करण्यात आला.
  • तसेच २०१० मध्ये सहा लेनचा रस्ता प्रस्तावीत झाला असून या सहा लेनची कामे अजून ही काही ठिकाणी प्रगती पथावर आहे.
  • गेल्या तीस वर्षात नऱ्हे, धायरी, नांदेड सिटी, उत्तमनगर, भूगाव, पिरंगुट, सूस, बाणेर, म्हाळुंगे, हिंजवडी, आणि किवळे या भागांमध्ये साधारणतः १० लाखांपेक्षा जास्त नागरीक वास्तव्यास आहेत.
  • त्याचप्रमाणे या दक्षिण भागामध्ये आयटी पार्क विशेषतः हिंजवडीसह अनेक औद्योगिक व शैक्षणिक संस्था झालेल्या आहेत.
  • दररोज साधारण २ ते ३ लाख नागरिक हायवेचा वापर करतात. तर, पिक हवर्सला १५ ते २५ हजार लोक या रस्त्याचा वापर करतात.
  • या रस्त्यावर गेल्या तीन वर्षात १०० पेक्षा अधिक अपघात झालेले असुन त्यामध्ये ६८ लोकांनी जीव गमावलेला आहे व ५४ लोक गंभीर जखमी झालेले आहेत.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे-बेंगळुरू रस्त्यावरील उपाययोजनांना तत्वतः मान्यता दिली आहे. त्यासाठी एनएचआय, पुणे महापालिका तसेच पुणे पोलिसांनी एकत्रिकपणे या उपाययोजना करण्यास सांगितले आहे. या उपाययोजनांनंतर या बासपासवरील वाहतूक कोंडी फुटण्यास भरीव मदत होणार आहे.
चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री.