संभाजीनगर दिनांक २२ सप्टेंबर
पुण्याची राष्ट्रीय खेळाडू नैशा रेवसकर हिने तिसऱ्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील अनुक्रमे १५ व १७ वर्षाखालील मुलींच्या गटात विजेतेपद पटकावित दुहेरी मुकुट मिळविला. मुलांच्या सतरा वर्षाखालील गटात पुण्याच्या शौरेन सोमण यानेही विजेतेपद मिळवित सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
टेबल टेनिस स्पोर्ट्स वेल्फेअर असोसिएशन ऑफ संभाजीनगर यांनी येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात संभाजीनगर जिल्हा टेबल टेनिस संघटना आणि महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
मुलींच्या पंधरा वर्षाखालील गटात रेवसकर हिने अंतिम फेरीत नाशिकची द्वितीय मानांकित खेळाडू स्वरा करमरकर हिचा पराभव करीत आपले अग्रमानांकन सार्थ ठरविले. हा सामना तिने ११-९,११-४, १३-११ असा सरळ तीन गेम्स मध्ये जिंकताना काउंटर अटॅक पद्धतीचा बहारदार खेळ केला. पाठोपाठ सतरा वर्षाखालील गटाच्या अंतिम फेरीत तिने ठाण्याची पाचवी मानांकित खेळाडू रितिका माथुर हिचे आव्हान ९-११,११-७, ११-४,११-५ असे परतविले. पहिली गेम गमावल्यानंतर तिने सर्व्हिस व परतीचे फटके याच्यावर नियंत्रण ठेवीत विजय मिळविला. ती नीरज होनप यांच्या मार्गदर्शनाखाली एम्स अकादमीत प्रशिक्षण घेत आहे. हिमाचल प्रदेश मध्ये नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय मानांकन स्पर्धेत तिने रौप्य पदक जिंकले होते.
मुलांच्या सतरा वर्षाखालील गटात सोमण याने अंतिम फेरीत अग्रमानांकित खेळाडू पार्थ मगर (मुंबई महानगर जिल्हा) याला पराभवाचा धक्का दिला. मात्र हा सामना जिंकताना त्याला खूपच संघर्ष करावा लागला. चुरशीने झालेला हा सामना त्याने ११-८,११-७,११-७,१०-१२,१२-१० असा जिंकला. सोमण हा नीरज होनप यांच्या मार्गदर्शनाखाली एम्स अकादमीत प्रशिक्षण घेत आहे.
मुलांच्या पंधरा वर्षाखालील गटात ठाण्याचा द्वितीय मानांकित खेळाडू मयुरेश सावंत याला विजेतेपद मिळाले अंतिम सामन्यात त्याने आपला सहकारी व अग्रमानांकित खेळाडू नीलय पाटेकर याचा ८-११,११-९, ११-४,७-११,११-७ असा पराभव केला. त्याने अष्टपैलू खेळाचा प्रत्यय घडविला.