पुणे- जगात सर्वात मोठ्या असणाऱ्या आपल्या लोकशाहीचे संगोपन करणे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य असून, त्या आधारे आपण जगाचे नेतृत्व करू शकू असा विश्वास डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे (डीईएस) अध्यक्ष खासदार श्री. शाहू छत्रपती महाराज यांनी व्यक्त केला.
लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून आल्याबद्दल श्री. शाहू छत्रपती महाराजांचा डीईएसच्या वतीने सन्मान करण्यात आला.
सोसायटीच्या नियामक मंडळ आणि परिषदेचे अध्यक्ष प्रमोद रावत, उपाध्यक्ष ॲड. अशोक पलांडे, कार्यवाह डॉ. आनंद काटिकर, विश्वस्त जगदीश कदम, प्रा. स्वाती जोगळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. शाहू छत्रपती म्हणाले, “140 वर्षांचा इतिहास असणाऱ्या डीईएसचा मी 41 वर्षे अध्यक्ष आहे. या संस्थेत दूरदृष्टी असणाऱ्या अनेक चांगल्या व्यक्तींबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यातून मिळालेल्या मोठ्या अनुभवाचा उपयोग लोकसभा सभागृहाच्या माध्यमातून जनतेचे व्यापक स्वरूपातील प्रश्न सोडविण्यासाठी होऊ शकेल, असा विश्वास वाटतो.”