पुणे: पत्रकारांना धमक्या दिलेले खासदार संजय दिना पाटील यांना योग्य समज देऊन जाहीर माफी मागायला लावा अन्यथा राज्यभर पत्रकार पाटलांच्या कार्यक्रमांवर तर बहिष्कार टाकतीलच पण त्याच बरोबर एकनाथ शिंदे प्रमुख असलेल्या शिवसेनेच्या कार्यक्रमांवर देखील बहिष्कार टाकतील असा सणसणीत इशारा पुणे श्रमिक पत्रकार संघाने दिला आहे.
या संदर्भात पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील आणि सेक्रेटरी मंगेश फल्ले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की,ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ आणि अरेरावी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका वादग्रस्त राजकीय वक्तव्यावरून खासदार संजय दिना पाटील यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे काही पत्रकार हे त्यांच्याकडे गेले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांना धमकावत त्यांच्याशी गलिच्छ भाषेत अरेरावी करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना त्यांचे दैनंदिन काम करताना एखाद्या जबाबदार लोकप्रतिनिधीकडून अशाप्रकारे गैरवर्तणूक करणे निंदनीय बाब असून त्याचा पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आम्ही जाहीर निषेध व्यक्त करत आहे.याबाबत आपण पक्षप्रमुख म्हणून खासदार संजय दिना पाटील यांना योग्य ती समज द्यावी अशी विनंती आहे. संजय दिना पाटील यांनी घडलेल्या प्रकाराबाबत जाहीर माफी मागावी अशी आमची मागणी आहे. अन्यथा याविरोधात संजय दिना पाटील यांच्यासह पक्षाच्या कार्यक्रमांवर यापुढील काळात पत्रकार ठिकठिकाणी बहिष्कार टाकतील ही बाब लक्षात घ्यावी. पत्रकारांना आपले नेहमीच सहकार्य असते. पत्रकारांशी व्यवस्थित वागावे, बोलावे हे शिवसेनेनेत नव्याने दाखल झालेल्या खासदार संजय दीना पाटील यांना तुम्ही आपल्या पद्धतीने समजून सांगावे ही विनंती.

