चला लढूया परिवर्तनासाठी म्हणत शिवसेनेकडून भोर वेल्हा मुळशी विधानसभेची मोर्चा बांधणी सुरु
भोर वेल्ह्यात शिवसेना (उबाठा) जिल्हा प्रमुख शंकर मांडेकर यांचा शिव संवाद दौरा
शिवसंवाद दौऱ्याच्या माध्यमातून सेनेचे जोरदार शक्ती प्रदर्शन
भोर : ज्याची निवडून यायची क्षमता तोच उमेदवार असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने भोर विधानसभेवर आपला दावा केला आहे. सेनेचे पुणे जिल्हाप्रमुख शंकर मांडेकर यांनी आज भोरमधून शिव संवाद दौरा सुरू करत जोरदार शक्ती प्रदर्शन केले.
भगवा सप्ताहाच्या माध्यमातून जिल्हा प्रमुख शंकर मांडेकर यांनी भोर वेल्हा तालुक्यात ‘चला लढूयात परिवर्तनासाठी’ असा नारा देत शिव संवाद दौऱ्याला सुरूवात केली आहे. छत्रपती शिवरायांनी ज्या स्वराज्याची शपथ किल्ले रायरेश्वरावर घेतली. त्या रायरेश्वर किल्ल्यावरून मांडेकर यांनी आपल्या शिवसंवाद दौऱ्याची सुरूवात केली. त्याचबरोबर भोर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी संपर्क प्रमुख सुनील धाकड,उपजिल्हा प्रमुख संतोष मोहळ, संघटक प्रसाद शिंदे, तालुका प्रमुख हनुमंत कंक, दीपक दामगुडे, सचिन खैरे, युवा सेना जिल्हाधिकारी आदीत्य बोरगे, राम गवारे, अनिल पराठे, शरद जाधव, प्रकाश भेगडे, स्वाती ढमाले, शैलेश वालगुडे, सतीश शेलार, दशरथ गोळे, भरत साळुंके आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या दौऱ्याच्या माध्यमातून भोर आणि वेल्हा या दोन्ही तालुक्यात पक्ष संघटन मजबूत करण्याबरोबरच लोकांचे प्रश्न समजावून घेणार असल्याचे मांडेकर म्हणाले. या मतदारसंघात सेनेची ताकद जास्त आहे. त्यामुळे ज्याची निवडून येण्याची क्षमता या सूत्राप्रमाणे आम्ही या मतदारसंघावर दावा करतोय.
सेनेचे जोरदार शक्ती प्रदर्शन-राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये झालेल्या फुटीनंतर भोर वेल्हा मुळशी या मतदारसंघातील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलली आहेत. लोकसभा निवडणुकी दरम्यान ही शिवसेनेने (उबाठा) या मतदार संघातील भोर, वेल्हा आणि मुळशी या तिन्ही तालुक्यात आपली ताकद दाखवून दिली आहे. याच आधारावर शिवसैनिक आता या मतदार संघावर दावा करत आहेत. मांडेकरांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच सेनेची ताकद दाखवत आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत सेनेची ताकद दाखवून दिली. त्यामुळे या दौऱ्याची चांगलीच चर्चा रंगत आहे. दहा दिवस या दौऱ्याच्या माध्यमातून भोर आणि वेल्हा तालुक्यातील गाव शिवसैनिक पिंजून काढणार आहेत.