यूपीएससी नागरी सेवा, आयआयटी, वैद्यकीय प्रवेश, सीए आणि व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या विविध कोचिंग संस्थांमधील 656 हून अधिक इच्छुक/विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन (एनसीएच) वर त्यांची तक्रार नोंदवून कोचिंग सेंटर्स/खाजगी संस्थांकडून पैसे परत मिळवण्यासाठी दाखल केला दावा
नवी दिल्ली, 22 सप्टेंबर 2024
ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण आणि शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता सुनिश्चित करण्याप्रति वचनबद्धतेसह, केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनच्या (एनसीएच) माध्यमातून यूपीएससी नागरी सेवा, आयआयटी आणि इतर प्रवेश परीक्षांसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थी आणि इच्छुकांना न्याय मिळवून देण्यासाठी खटला-पूर्व टप्प्यावर यशस्वीरित्या हस्तक्षेप केला आहे.
विविध कोचिंग सेंटर्स विशेषत: नावनोंदणी शुल्क विद्यार्थी/इच्छुकांना परत करत नसल्याबद्दल राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनमध्ये नोंदवण्यात आलेल्या असंख्य तक्रारींनंतर, राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनने मिशन-मोडवर या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी एक मोहीम सुरू केली ज्यामुळे आतापर्यंत एकूण 2.39 कोटी रुपयांचा परतावा मागितलेल्या बाधित विद्यार्थ्यांना एकूण 1 कोटी रुपये परत मिळू शकणार आहेत.
यूपीएससी नागरी सेवा, आयआयटी आणि इतर कोचिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या मात्र अपूर्ण आश्वासने, अध्यापनाचा निष्कृष्ट दर्जा आणि अभ्यासक्रम अचानक रद्द करणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागलेल्या विद्यार्थ्यांकडून राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ही निर्णायक कारवाई करण्यात आली आहे. डेटावरून असे दिसून येते की कोचिंग सेंटर्सनी विद्यार्थ्यांच्या विनंत्या नाकारल्या / फेटाळल्या / समाधानकारक तोडगा काढला नाही म्हणून 12 महिन्यांच्या म्हणजे 2023-2024 या अल्प कालावधीत 16,276 विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनशी संपर्क साधला. डेटा रिपॉझिटरीच्या विश्लेषणातून समोर येते /अधोरेखित होते की राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनकडे तक्रार नोंदवणाऱ्या असमाधानी विद्यार्थी/ग्राहकांच्या संख्येत वाढता कल दिसून येत आहे.
2021-2022 मध्ये विद्यार्थ्यांनी नोंदवलेल्या एकूण तक्रारींची संख्या 4,815 आहे, त्यानंतर वर्ष 2022-2023 मध्ये ती 5,351 आणि 2023-2024 मध्ये 16,276 इतकी आहे. ग्राहक आयोगाचा दरवाजा ठोठावण्यापूर्वी प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा म्हणून राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनवरील विद्यार्थ्यांचा वाढता विश्वास या वाढीतून दिसून येतो. वर्ष 2024 मध्ये, याआधीच 6980 विद्यार्थ्यांनी खटला-पूर्व टप्प्यावर त्यांच्या तक्रारींचे जलद निवारण करण्यासाठी राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनकडे धाव घेतली आहे.
देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रभावित विद्यार्थ्यांना ग्राहक विभागाच्या हस्तक्षेपानंतर परताव्यांची सर्व रक्कम खटला-पूर्व टप्प्यावर परत करण्यात आली, ज्यांनी “यूपीएससी नागरी सेवा”, “जेईई ऍडव्हान्स ” वैद्यकीय प्रवेश, सीए परीक्षा आणि इतर अभ्यासक्रमांसाठी कोचिंग उपलब्ध करून देणाऱ्या कोचिंग सेंटर्सच्या विरोधात त्यांच्या शुल्क परतफेडीचा दावा करून तक्रारी नोंदवल्या आहेत.