अंमली पदार्थ विरोधी पथक-२ ची कारवाई; चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे | प्रतिनिधी
पुणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-२ ने वडगाव शेरी परिसरात कारवाई करत तब्बल ३ लाख ६५ हजार ३३९ रुपयांचा गुटखा, पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला. या कारवाईत दोन आरोपींविरुद्ध चंदननगर पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. २६ जून रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक-२ चे सहायक पोलीस निरीक्षक अफरोज पठाण व त्यांच्या पथकाला वडगाव शेरी येथील धन्वंतरी कॉलनी परिसरातील गोदामात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून कारवाई करण्यात आली. या कारवाईत रामलाल उर्फ रमेश गायकडराम देवासी (रा. धन्वंतरी कॉलनी, वडगाव शेरी, पुणे) आणि गणेश चंद्रकांत पटवा (रा. वाघोली, पुणे) यांच्याकडून १ लाख १५ हजार ११६ रुपयांचा पान मसाला गुटखा, ३० हजार २२३ रुपयांचे तंबाखूजन्य पदार्थ, २० हजार रुपयांचे दोन मोबाईल फोन, २ लाख रुपयांची मारुती सुझुकी कंपनीची ओम्नी कार, असा एकूण ३ लाख ६५ हजार ३३९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध चंदननगर पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक २९२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता तसेच सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-३) शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक जीवन माने, सहायक पोलीस निरीक्षक अफरोज पठाण, नितीनकुमार नाईक तसेच अंमली पदार्थ विरोधी पथक-२ मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

