युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Date:

मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्य

पुणे, दि. २५ : मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी शिक्षण, कौशल्य विकास, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, उद्योजकता आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित संधी उपलब्ध करून देण्याचे धोरण राज्य शासनाने स्वीकारले असून, या उद्दिष्टासाठी स्थापन झालेल्या सारथी संस्थेच्या माध्यमातून झालेले कार्य उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणेच्यावतीने गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांच्या सन्मान सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते.

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, महापौर मंजुषा नागपुरे, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, मनपा आयुक्त नवलकिशोर राम, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, नियोजन विभागाच्या सचिव शैला ए, विभागीय आयुक्त शीतल तेली उगले, सारथीचे अध्यक्ष अजित निंबाळकर, व्यवस्थापकीय संचालक महेश पाटील उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, सारथीच्या माध्यमातून आतापर्यंत केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारो घेण्यात येणाऱ्या परिक्षेत १४०, महाराष्ट्र लोकसेवा आयोग १ हजार १२४ आणि बँकिंग क्षेत्रात ५०० हून अधिक तरुण-तरुणी यशस्वी झाले आहेत. विविध कौशल्य विकास प्रशिक्षणांतून १३ हजारांहून अधिक युवक रोजगारक्षम झाले असून दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना विविध प्रशिक्षणांचा लाभ मिळाला आहे.मराठा समाजातील आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या मागे राहिलेल्या घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार या तीन पैलूंवर आधारित धोरण राबविण्यात आले.

उच्च शिक्षण क्षेत्रात व्यावसायिक शिक्षणासाठी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शैक्षणिक शुल्कात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला. मोठ्या शहरात होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी वासतिगृह आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना सुरू करण्यात आली आणि विद्यार्थ्यांना ६० हजार रुपयापर्यंत आर्थिक सहकार्य करण्यास सुरुवात झाली. उद्योजकता विकासासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ गतिमान करण्यात आले आणि व्याज सवलत सुरू करण्यात आली. या माध्यमातून पाऊणे दोन लाखापेक्षा अधिक उद्योजक तयार झाले असून साडेसात हजार कोटी रुपयांहून अधिक कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी शासन वर्षाला १५०० कोटी देते , असे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री म्हणाले, मराठा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी पोहोचविण्यासाठी सारथी संस्थेची स्थापना करण्यात आली. स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाबरोबरच संशोधन, पीएच.डी., कौशल्य विकास, रोजगाराभिमुख प्रशिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानातील कौशल्य विकसित करण्यासाठी सारथीने प्रभावी काम केले आहे. आज केवळ प्रशासकीय सेवाच नव्हे, तर खासगी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होत असून विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता , संगणक तंत्रज्ञान, भाषा प्रयोगशाळा, टूल लॅब, ड्रोन तंत्रज्ञान यांसारख्या आधुनिक कौशल्यांकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले.

शेती क्षेत्रातही राज्य शासनाने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘महाविस्तार’ अॅप सुरू केले असून सुमारे ५० लाख शेतकरी त्याचा वापर करत आहेत. ड्रोन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीत मोठे परिवर्तन होणार असून त्यासाठी आवश्यक ड्रोन पायलट प्रशिक्षणही सारथीमार्फत सुरू करण्यात आल्याचेही श्री.फडणवीस यांनी सांगितले. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, लातूर आणि कोल्हापूर येथे सारथीची विभागीय केंद्रे, विद्यार्थी वसतिगृहे आणि प्रशिक्षण सुविधा उभारण्याचे काम सुरू असून पुढील वर्षभरात ही कामे पूर्ण होतील, अशी माहिती त्यांनी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थमंत्री असताना सारथीला आवश्यक निधी उपलब्ध करून दिला तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही निधीची कमतरता भासू दिली नाही. त्यामुळे सारथी आज सक्षम संस्थेच्या रूपात उभी राहिली असून त्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

एमपीएससी परीक्षा वेळेत, पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने घेण्यावर शासनाचा भर आहे. परीक्षांमध्ये ऑनलाईन पद्धतीबाबत विद्यार्थ्यांशी सविस्तर चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल. कोणताही निर्णय विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊनच होईल, अशी ग्वाही श्री.फडणवीस यांनी दिली.

स्पर्धा परीक्षांमध्ये गुणवत्तेने पात्र ठरूनही जागा कमी असल्यामुळे नोकरी न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘निपुण सेतू’ उपक्रम सुरू करण्यात येणार असून अशा विद्यार्थ्यांना खाजगी क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल आणि त्यांच्या प्रशिक्षणाचा खर्च राज्य शासन उचलणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची कार्यालये एकत्र आणून विद्यार्थ्यांना आणि युवकांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

सारथी ही सामाजिक परिवर्तन, शैक्षणिक प्रगती आणि युवा सक्षमीकरणाची प्रभावी चळवळ – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) ही केवळ शासकीय योजना राबवणारी संस्था नसून सामाजिक परिवर्तन, शैक्षणिक प्रगती आणि युवा सक्षमीकरणाची प्रभावी चळवळ आहे. समता, बंधुता, सामाजिक न्याय आणि तळागाळातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे विचार सारथीच्या कार्यातून प्रत्यक्षात येत असल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी काढले.

उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या सामाजिक न्याय दिनाच्या पार्श्वभूमीवर गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केवळ विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक यशाचा नसून महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्याचा उत्सव आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जिद्द, गुणवत्ता आणि कठोर परिश्रमाच्या बळावर विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशामागे त्यांच्या पालकांचा त्याग, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि सारथीची भक्कम साथ आहे.

शिक्षण, संशोधन, कौशल्य विकास, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि उद्योजकता या सर्व क्षेत्रांत सारथीने उल्लेखनीय कामगिरी असल्याचे नमूद करून त्या म्हणाल्या, संस्थेच्या उभारणी आणि बळकटीकरणामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष योगदान आहे. सारथीच्या प्रशासकीय मुख्यालयासह आठ विभागीय कार्यालये आणि प्रत्येकी ५०० विद्यार्थी व ५०० विद्यार्थिनींसाठी सुसज्ज वसतिगृह उभारणीसाठी १ हजार ३६० कोटी रुपयांच्या प्रकल्पास मंजुरी देण्यात आली होती. त्यांच्या दूरदृष्टीमुळे हजारो विद्यार्थ्यांसाठी संधीची नवी दालने खुली झाली.

स्पर्धा परीक्षा क्षेत्रात सारथीने आजपर्यंत युपीएससीमध्ये १४० तर एमपीएससीमध्ये १ हजार २४५ अधिकारी घडविले असून विविध शासकीय सेवांमध्ये हजारो युवक-युवती कार्यरत आहेत. ही केवळ आकडेवारी नसून समाजाच्या आत्मविश्वासाचा आणि परिवर्तनाचा जिवंत पुरावा आहे. छत्रपती संभाजी महाराज सारथी व्यक्तिमत्व व संगणक कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून ग्रामीण भागातील युवक डिजिटल कौशल्याशी जोडले गेले आहेत. विविध शिष्यवृत्ती आणि प्रशिक्षण योजनाही प्रभावीपणे राबविल्या जात असल्याचे श्रीमती पवार यांनी सांगितले.

राज्य शासन युवकांच्या स्वप्नांना पंख देणाऱ्या प्रत्येक उपक्रमाच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. सारथीच्या सर्व योजनांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या, आजचा सन्मान हा प्रवासाचा शेवट नसून नव्या जबाबदारीची सुरुवात आहे. प्रशासनात कार्य करताना सामान्य नागरिक हा केंद्रबिंदू ठेवून सेवा करावी. सारथीने घातलेल्या यशाच्या पायाचा अभिमान बाळगत भविष्यात संस्थेतील गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले.

सारथी संस्थेचे अध्यक्ष अजित निंबाळकर यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या स्थापनेपासूनच्या कार्याचा आढावा सविस्तर मांडला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून संस्था सुरु झाल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे योगदान अधोरेखित केले.

या कार्यक्रमाला आमदार योगेश टिळेकर, विक्रम काकडे, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, हेमंत रासने, राहुल कुल, बापूसाहेब पठारे, अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, सारथीचे संचालक मधुकर कोकाटे आदी उपस्थित होते.

यावेळी सारथीच्या माध्यमातून यश संपादन केलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

हडपसरमध्ये रक्ताच्या कर्करोगावरील अत्याधुनिक उपचारांना नवी दिशा: सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी ऑटोलॉगसस्टेमसेल प्रत्यारोपण

नियमित आरोग्य तपासणीतून रक्ताच्या कर्करोगाचे निदान; मेकॅनिकल इंजिनिअरने केली कर्करोगावर यशस्वी मात पुणे, 26 जून 2026: हडपसर येथे राहणारे 46 वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअर ऋतिक मेहरा यांच्यासाठी जानेवारी 2026 मधील नियमित वार्षिक आरोग्य तपासणी आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. कोणतीही लक्षणे नसताना आणि नेहमीप्रमाणे काम सुरू असतानाच त्यांच्या रक्त तपासणीत हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे आढळले. पुढील तपासणीत त्यांना IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा या अस्थिमज्जेतील प्लाझ्मा पेशींमध्ये होणाऱ्या रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा हा प्लाझ्मा पेशींचा (Plasma Cells) एक प्रकारचा कर्करोग आहे, ज्यामध्ये शरीरातील असामान्य प्लाझ्मा पेशी लॅम्बडा लाईट चेन (Lambda Light Chain) नावाचे मोनोक्लोनल प्रोटीन जास्त प्रमाणात तयार करतात। सामान्यतः आपल्या शरीरातील प्लाझ्मा पेशी संसर्गाशी लढण्यासाठी अँटीबॉडीज बनवतात, परंतु या आजारात त्या निकामी आणि हानिकारक प्रोटीन्स बनवू लागतात.  "उपचारांपेक्षा कर्करोगाचे निदान स्वीकारणे माझ्यासाठी अधिक कठीण होते," असे ऋतिक मेहरा यांनी सांगितले. "मी पूर्णपणे सामान्य आयुष्य जगत होतो आणि मला कोणतीही लक्षणे नव्हती. नियमित आरोग्य तपासणीतून अचानक कर्करोग झाल्याचे समजल्याने मोठा धक्का बसला. मात्र माझ्या पत्नीने संपूर्ण काळात मला सकारात्मक राहण्यासाठी प्रोत्साहन दिले. उपचार आणि स्टेम सेल प्रत्यारोपणाची प्रक्रिया माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच सुरळीत झाली आणि आता मी हळूहळू माझ्या दैनंदिन आयुष्यात परतत आहे." निदानानंतर ऋतिक यांनी केमोथेरपीच्या तीन सायकल्स पूर्ण केल्या. त्यानंतर डॉक्टरांनी ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. या प्रक्रियेत रुग्णाच्याच स्टेम सेल्सचा वापर करून उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर रक्तपेशींची निर्मिती पुन्हा सुरू करण्यास मदत केली जाते.  त्यांना 15 मे 2026 रोजी सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर – मणिपाल हॉस्पिटल्सच्या नेटवर्कमधील रुग्णालयात  दाखल करण्यात आले. उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर, पूर्वी संकलित केलेले त्यांचे स्टेम सेल्स 16 मे 2026 रोजी पुन्हा शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले. कोणत्याही गुंतागुंतीशिवाय ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आणि उत्कृष्ट प्रकृतीसह त्यांना 2 जून 2026 रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या प्रकरणाविषयी बोलताना डॉ. चंद्रकांत लहाणे, सल्लागार हिमॅटॉलॉजिस्ट व हिमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर, म्हणाले, "मल्टिपल मायलोमा हा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही स्पष्ट लक्षणे न दाखवता वाढू शकतो. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणीमुळे या रुग्णामध्ये आजाराचे लवकर निदान होऊ शकले. पात्र रुग्णांमध्ये ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण हा मल्टिपल मायलोमावरील अत्यंत प्रभावी उपचार पर्याय असून, यामुळे दीर्घकालीन चांगले परिणाम आणि अधिक सखोल रेमिशन मिळण्यास मदत होते." ही केस रुग्णालयासाठीही महत्त्वपूर्ण ठरली असून, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर येथे बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेवा यशस्वीपणे सुरू झाल्याचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे हडपसर, मगरपट्टा, खराडी, वानवडी, हांडेवाडी, सासवड, बारामती, अकलूज, सोलापूर आणि आसपासच्या परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक रक्ताच्या कर्करोगावरील उपचार अधिक सुलभ होणार आहेत. इंडियन सोसायटी फॉर ब्लड अँड मॅरो ट्रान्सप्लांटेशन (ISBMT) च्या माहितीनुसार, भारतात 1983 ते 2022 या कालावधीत 26,843 बोन मॅरो आणि स्टेम सेल प्रत्यारोपण करण्यात आले आहेत. मात्र, दरवर्षी सुमारे 39,000 रुग्णांना या उपचारांची आवश्यकता असतानाही प्रत्यक्षात केवळ सुमारे 2,000 प्रत्यारोपणेच केली जातात. या सेवांच्या विस्ताराविषयी बोलताना डॉ. शशिकांत आपटे, संचालक – हिमॅटॉलॉजी, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नगर रोड, म्हणाले, "अधिकाधिक रुग्णांना त्यांच्या घराजवळ वेळेत आणि प्रभावी उपचार मिळावेत यासाठी प्रादेशिक स्टेम सेल प्रत्यारोपण केंद्रे बळकट करणे अत्यंत आवश्यक आहे. हडपसर येथे ही सेवा सुरू होणे हे अत्याधुनिक हिमॅटॉलॉजी उपचार अधिक व्यापकपणे उपलब्ध करून देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे." श्री. सगीर सिद्दीकी, प्रादेशिक संचालक – पश्चिम विभाग, मणिपाल हॉस्पिटल्स, म्हणाले,...

पालखी मार्ग अनधिकृत होर्डिंग्ज मुक्त; ७० अनधिकृत होर्डिंग्जवर हातोडा!

'पीएमआरडीए'ची धडक कारवाई; अनधिकृत होर्डिंग्जविरोधातील कारवाईसत्र सुरूच राहणार! पुणे :...