- प्रा. डॉ. रवींद्र कुलकर्णी यांचे प्रतिपादन; दिशा परिवाराच्या वतीने २५० गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान
- सामाजिक कार्यकर्ते दीपक हिरवे, मनीषा गाडे यांचा दिशा परिवार सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराने गौरव
पुणे, ता. २२: “समाजातील गरजू व वंचित घटकांच्या पाठीशी उभे राहून त्यांना दिशा देण्याचे काम दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्ट करत आहे. जाती-धर्माच्या भिंती भेदून प्रत्येकाला चांगले शिक्षण मिळावे, या उदात्त हेतूने सुरु असलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या या कार्यात दातृत्वाचे अनेक हात लागले आहेत, ही प्रेरणादायी बाब आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ गणितज्ज्ञ प्रा. डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी केले.
दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने १८ वा शैक्षणिक शिष्यवृत्ती व दिशा परिवार सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार वितरणाप्रसंगी प्रा. डॉ. रवींद्र कुलकर्णी बोलत होते. पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनात (घोले रस्ता) झालेल्या सोहळ्यात २५० गरजू विद्यार्थ्यांना देणगीदारांच्याच हस्ते शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. यंदाचा दिशा परिवार सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते दीपक हिरवे व मनीषा गाडे यांना प्रदान करण्यात आला. मराठवाडा मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. भाऊसाहेब जाधव, सामाजिक कार्यकर्त्या ऍड. मिताली सावळेकर, डाॅ. मिलिंद मुजुमदार, सल्लागार बी. एल. स्वामी, दिशा परिवाराचे अध्यक्ष माणिकराव गोते, कार्याध्यक्ष राजाभाऊ चव्हाण, पौर्णिमा जानोरकर, कल्पना भोसले, अल्पना चव्हाण, पांचाली हर्षे, मकरंद कुलकर्णी, अरुण कुलकर्णी, चिन्मय कुलकर्णी यांच्यासह अन्य पदाधिकारी, विद्यार्थी, देणगीदार उपस्थित होते.
प्रा. डॉ. रवींद्र कुलकर्णी म्हणाले, “सातत्याने विकसित होत असलेले तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी युवकांनी शिक्षित होणे गरजेचे आहे. शिक्षणाची आवड असलेल्या युवकांना परिस्थितीमुळे वंचित राहावे लागू नये म्हणून दिशा परिवाराने देणगीदार व गरजू विद्यार्थ्यांच्या मिलनाचा हा उपक्रम स्तुत्य आहे. जीवनात आर्थिक स्थैर्य प्राप्त झाल्यानंतर प्रत्येकाने सामाजिक कामात योगदान द्यायला हवे. माझ्या संपत्तीमधील २० टक्के वाटा जवळच्या नातेवाईकांसाठी, तर उर्वरित ८० टक्के वाटा सामाजिक कार्यासाठी देणार आहे. माझ्या फाउंडेशनच्या माध्यमातून दिशा परिवाराला मदत करणार आहे.”
भाऊसाहेब जाधव म्हणाले, “हजारो विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम दिशा परिवाराने केले आहे. आज त्यातील अनेक मुले मिळालेल्या मदतीची परतफेड करण्याची संधी घेत आहेत. दिशा परिवारात दाते व मदत घेणारे गरजू विद्यार्थी हे सर्व जाती-धर्माचे आहेत. त्यामुळे इथे केवळ शिष्यवृत्तीच दिली जात नाही, तर समाजाला एकसंध ठेवण्याची भावना रुजवली जाते.”
यावेळी गाडे आणि हिरवे यांनी पुरस्कारामुळे आणखी चांगले काम करण्याचा प्रेरणा मिळाली आणि यापुढे सामाजिक कार्य सुरुच ठेवणार असल्याचे सांगितले. दिशा परिवारामुळे जीवनाला दिशा मिळाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. ऍड. मिताली सावळेकर, बी. एल. स्वामी, डाॅ. मिलिंद मुजुमदार यांनी आपली मनोगते व्यक्त करत विद्यार्थ्यांना सदिच्छा दिल्या. राजाभाऊ चव्हाण यांनी दिशा परिवाराच्या कार्याविषयी प्रास्ताविकात माहिती दिली.