मुंबई-23 सप्टेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन प्रस्तावीत इमारतीचे भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमाला सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच मंचातर येणार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणीआधी सरन्यायाधी धनंजय चंद्रचूड, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच व्यासपीठावर येणार असल्याने राजकीय वातातरण तापण्याची शक्यता आहे.
24 सप्टेंबर रोजी आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. त्याच्या एक दिवस आधी मुंबईत हा कार्यक्रम होत असून सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. यावेळी शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित असणार आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळची ऐतिहासिक इमारत जागावापरासाठी कमी पडत होती. त्यामुळे हायकोर्टाला नवीन इमारत देण्यात यावी, अशी मागणी केली जात होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन जागेसाठी 2019 पासून हायकोर्टाच्या बार असोसिएशनचा लढा सुरू होता. अखेर या लढ्याल यश आले असून 23 सप्टेंबर रोजी नवीन प्रस्तावित इमारतीचे उद्घाटन होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी राज्य सरकारने गोरेगावचा पर्याय दिला होता. मात्र शेवटी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे ही इमारत उभारण्याचे निश्चित झाले आहे.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या हस्ते या इमारतीचे भूमिपूजन होणार आहे. याप्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी. आर. गवई, न्या. ए. एक. ओका, न्या. दीपांकर दत्ता, न्या. उज्ज्वल भूयान, न्या. प्रसन्न वरले, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती राहणार आहे.