Home Blog Page 685

पीएमआरडीएच्या ३ हजार ८३८ कोटींच्या अर्थसंकल्पास मंजूरी

सांस्कृतिक शहर म्हणून पुण्याची ओळख कायम रहावी असे नियोजन करा-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि. २४- अटल सेतू, मुंबई-पुणे महामार्ग मिसिंग लिंक सारख्या प्रकल्पांमुळे पुणे आणि मुंबई ही महानगरे जवळ आली आहेत. त्याचा परिणाम म्हणून पुणे परिसरात मोठ्या प्रमाणावर विकास होत आहे. विकास प्रक्रियेच्या नियोजनाची जबाबदारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची असून प्राधिकरणाने पुणे शहराची सांस्कृतिक शहर म्हणून ओळख कायम ठेऊन शहराचा विकास व्हावा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षेतखाली आज पुणे महानगर विकास प्राधिकरणाची बैठक पार पडली. बैठकीत पीएमआरडीएच्या ३ हजार ८३८ कोटी ६१ लाखांच्या अर्थसंकल्पास मंजूरी देण्यात आली.

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस मुख्य सचिव सुजाता सौनिक, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की मुख्य पुणे शहर दाटीवाटीचे झाले आहे, ही परिस्थिती बदलण्यासाठी नवीन विकसित होणाऱ्या भागात मोकळ्या जागा राहतील, याची काळजी घ्या. पुण्याच्या विकासाचे नियोजन करतांना तज्ज्ञांची मदत घ्या, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. पुण्यात होणाऱ्या कव्हेशन सेंटर हे जागतिक दर्जाचे होण्यासाठी नियोजन करावे, गुंठेवारी अधिनियमातील नियमितीकरणाचे शुल्क कमी करुन नागरिकांना दिलासा द्यावा, हे शुल्क भरण्यासाठी ३१ मार्च पर्यंत विशेष सवलत उपलब्ध करुन जास्तीत जास्त जमिनी नियमित करुन घ्याव्यात अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले, की पुणे महानगराचा प्रारुप विकास आराखडा तयार करतांना जास्तीत जास्त नागरिकांना फायदा होईल, अशा प्रकारे तयार करावा. तसेच पीएमआरडीएच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या परवडणाऱ्या घरांच्या बांधकामाची गुणवत्ता चांगली राहिल, याची काळजी घ्यावी. घरांच्या गुणवत्तेत हयगय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. तयार असणाऱ्या एकूण ४ हजार ८८६ घरांपैकी उरलेल्या १ हजार ६२० घरांची सोडत लवकरच काढण्यात यावी. तसेच दुसऱ्या टप्प्यातील ६ हजार घरांच्या बांधकामास वेग देण्यात यावा. सोबतच या घरांचे बांधकाम करतांना उद्यान, मोकळी जागा सारख्या विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असेही त्यांनी सांगितले.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आजच्या बैठकीत ५ कोटी ७५ लाखांचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळी पुणे महानगर प्रदेशासाठी ठाणे शहराच्या धर्तीवर आपत्ती प्रतिसाद पथकाच्या स्थापनेस आणि १० ठिकाणी नवीन अग्निशमन केंद्र निर्मितीस मान्यता देण्यात आली. ११ ठिकाणी मलनिस्सारण योजना तयार करण्यास, लोणावळा येथे टायगर व लायन्स पाँईंट येथे ग्लास स्कायवॉक तयार करण्यास या बैठकीत मंजूरी देण्यात आली.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा विविध घटकांशी संवाद

जाणून घेतल्या अपेक्षा व संकल्पना

पुणे, दि. २४: राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज आपल्या पुणे दौऱ्यात राजभवन येथे विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी जिल्ह्यातील विविध विकास विषयक प्रश्नांवर चर्चा केली. तसेच उद्योग, संस्कृती, कला, खेळ आदी घटकांशी संवाद साधून त्यांच्या विकास विषयक अपेक्षा, समस्या व संकल्पना जाणून घेतल्या.

राज्यपाल यांच्याशी चर्चा करण्यासाठी खासदार मेधा कुलकर्णी, श्रीरंग बारणे, आमदार माधुरी मिसाळ, आमदार संजय जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांच्या समोर प्रामुख्याने पुणे जिल्ह्यात सुरू असलेली आणि भविष्यात आवश्यक असलेली विकास कामे, पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुकीशी संबंधित बाबी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करणे, कायदा व सुव्यवस्था आदी प्रमुख विषय मांडण्यात आले. तसेच उद्योग विकासासाठी पायाभूत सुविधांचा विकास, उद्योगांच्या समस्या, पर्यटन विकासासाठी सुविधांचा विकास यासारखे विषय मांडण्यात आले.

राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी सर्व गटांचे म्हणणे ऐकून घेत सर्व मागण्या व विकास संकल्पनांबाबत लक्ष घालण्याबाबत आश्वस्त केले.

या संवाद चर्चेसाठी साहित्य, नाट्य, दिग्दर्शन, सामाजिक कार्य आदींशी संबंधित मान्यवर ज्यामध्ये रामदास फुटाणे, मोहन कुलकर्णी, अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू श्रीरंग इनामदार, शांताराम जाधव, ध्यानचंद पुरस्कार प्राप्त स्मीता शिरोळे, तृप्ती मुरगुंडे, ऑलिम्पिकपटू अंजली भागवत, मनोज पिंगळे, बाळकृष्ण आकोटकर आदी तसेच उद्योग व वाणिज्य संघटनांचे प्रमुख, जिल्ह्यातील प्रमुख उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

अभियंतादिनी प्रा. डॉ. गणेश काकांडीकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित


पुणे-दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) नवी मुंबई आणि अग्नेल चॅरिटीज फादर सी. रॉड्रिग्स इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने अभियंता दिनी दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय एक्सलन्स अवॉर्ड्स २०२४ ने, एमआयटी विश्वशांती विद्यापीठातील यंत्र अभियांत्रिकीचे प्राध्यापक आणि स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नोलाॅजीचे सहयोगी अधिष्ठाता प्रा. गणेश काकांडीकर यांना सन्मानित करण्यात आले. कॉम्पुटर एडेड डिझाईन / कॉम्पुटर एडेड मॅन्युफॅक्चरिंग या क्षेत्रात केलेल्या संशोधनासाठी त्यांना शिक्षण क्षेत्र प्रवर्गातून रिसर्च एक्सलन्स अवॉर्ड २०२४ प्रदान करण्यात आला. सिडको-मुंबई, अटल टनेल, मुंबई -पुणे एक्सप्रेस वे, नवी मुंबई विमानतळ, बांद्रा- वरळी सी लिंक, गिफ्ट सिटी – अहमदाबाद यांच्या निर्माणात महत्वपूर्ण भूमिका निभावणारे सुप्रसिद्ध अभियंता श्री. रमाकांत झा, दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) नवी मुंबई अध्यक्ष प्रा. डॉ. निलज देशमुख, सचिव प्रभाकर फुलारी, फादर सी. रॉड्रीग्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. एस. एम. खोत, पुरस्काराच्या संयोजिका प्रा.डॉ. मेघा कोल्हेकर यांनी विजेत्यांचा सन्मान केला. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना प्रा. काकांडीकर यांनी एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. राहुल कराड आणि कुलगुरू प्रा. डॉ. रवी चिटणीस यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली.

धावपळीला विराम देऊन महिलांनी स्तन कर्करोग तपासणी करून घ्यावी-ससूनचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार

अमनोरा येस फाउंडेशन आणि सहयोगी संस्थेच्या वतीने स्तन कर्करोग तपासणी शिबिर
पुणे : स्तन कर्करोगाचे निदान लवकर झाल्यास पुढील गुंतागुंत टाळता येऊ शकते.  महिला त्यांच्या आरोग्याची काळजी घेत नाहीत. कारणे देऊन त्या तपासणी पुढे ढकलतात. रोजच्या धावपळीला विराम देऊन महिलांनी स्तन कर्करोग तपासणी करून घ्यायला हवी. तपासणी करून घेण्यात कोणतेही नुकसान नाही. असे मत ससूनचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी व्यक्त केले.

बीजे मेडिकल कॉलेज आणि ससून सर्वोपचार रुग्णालय, अमनोरा येस फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रज, यु इ लाईफसायन्सेस यांच्या संयुक्त विद्यमाने महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी स्तन कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालय हॉस्पिटल येथे तपासणी शिबिर झाले. सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब पाठारे, ससूनचे अधिक्षक यल्लप्पा जाधव, सिटी कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे,  ससूनच्या शस्त्रक्रिया विभागाच्या प्रमुख लता भोईर, आय ब्रेस्ट च्या गंधाली देसाई, पोलीस उपनिरीक्षक शंकर कुंभारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किशोर टेंभुर्णे, राखीव पोलीस निरीक्षक दशरथ हाटकर, अमनोरा येस फाउंडेशनचे विवेक कुलकर्णी यावेळी उपस्थित होते. महिला पोलिसांना विनामूल्य कर्करोग तपासणीसाठी हेल्थ कार्ड देखील यावेळी देण्यात आले.  शिबिरात १०६ महिला पोलिसांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १२ महिला पोलिसांना मॅमोग्राफी तर १० जणींना सोनोग्राफी तपासणी सांगण्यात आली आहे.
भाऊसाहेब पाठारे म्हणाले, महिला पोलिसांसाठी वेळ काढून कर्करोग तपासणीसाठी जाणे अवघड असते. त्यामुळे पोलीस मुख्यालयाच्या हॉस्पिटलमध्ये येऊन ही तपासणी करण्यात आली, यासाठी सगळ्या संस्थांचे आम्ही आभारी आहोत.

लता भोईर म्हणाल्या, स्तन कर्करोग हे एक युद्ध आहे आणि सर्व महिलांनी मिळून हे युद्ध लढायचे आहे. त्रास होत नसला तरी महिलांनी तपासणी करून घेणे गरजेचे आहे. गाठ दुखत असेल किंवा नसेल दोन्ही परिस्थितीत तपासणी आवश्यक आहे. महिन्यातून एकदा आयुष्याच्या शेवटपर्यंत तपासणी गरजेची आहे,असेही त्यांनी सांगितले. विवेक कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

ज्या कामाचा शुभारंभ यापूर्वीच झालेला आहे त्या कामाचे पुन्हा भूमिपूजनासाठी पंतप्रधानांनी येणे हा मोठा विनोद-प्रशांत जगताप

पुणे -प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी हे भिडे वाड्याच्या भूमिपूजनासाठी येत आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आश्चर्य व्यक्त करत ज्या कामाचा शुभारंभ यापूर्वीच झालेला आहे त्या कामाचे पुन्हा भूमिपूजन करण्यासाठी पंतप्रधानांनी येणे हा मोठा विनोद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.भिडे वाड्याचे काम हे सरकारच्या प्रयत्नांनी नव्हे तर कोर्टाच्या आदेशाने सुरू झाले आहे. ज्यात आपलं कर्तुत्व नाही त्या गोष्टींचे श्रेय घेण्याची नरेंद्र मोदींची धडपड केविलवाणी आहे अशा शब्दांत प्रशांत जगताप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याचा विरोध व्यक्त केला.

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हे सत्यशोधक विचारांचे होते, कर्मकांड त्यांना मंजूर नव्हते. हे सत्य संपूर्ण जगाला माहिती असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजनाच्या निमित्ताने भिडे वाड्यात कर्मकांड करण्याचा घाट घातला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणीला अनुसरून पंतप्रधान मोदी हे महात्मा फुलेंच्या विचारांचा अपमान करत आहेत हे अत्यंत निंदनीय आहे.नरेंद्र मोदींच्या हस्ते पुण्यात यापूर्वीच मेट्रोच्या विविध मार्गीकांचे लोकार्पण झाले आहे. प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात यायचं व मेट्रोच्या छोट्याशा टप्प्याचा उद्घाटन करायचं ही नरेंद्र मोदींची शैली पुणे शहरात विनोदाचा विषय झाली आहे. किंवा निवडणुका जिंकण्यासाठी सुरू असलेल्या या माकडचेष्टा आम्ही पुणेकरांसमोर उघड करू असा इशाराही प्रशांत जगताप यांनी दिला आहे.

आयसीसीआरतर्फे 27 सप्टेंबरला गायन-नृत्य मैफल

आयसीसीआरतर्फे 27 सप्टेंबरला डॉ. अर्चना सहकारी यांचे गायन तर मौमिता वत्स घोष यांचा ओडिसी नृत्याविष्कार
पुणे : केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाअंतर्गत असलेल्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे (आयसीसीआर) पुणे विभागीय कार्यालय आणि भारतीय विद्या भवन – इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. 27 सप्टेंबर) हिंदुस्तानी शास्त्रीय गायिका डॉ. अर्चना सहकारी यांच्या गायनाचा तसेच ओडिसी नृत्यांगना मौमिता वत्स घोष यांच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
‌‘होरायझन‌’ उपक्रमाअंतर्गत आयोजित करण्यात आलेला हा सांस्कृतिक कार्यक्रम शुक्रवार, दि. 27 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता सेनापती बापट रोड जवळील भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृहात होणार आहे, अशी माहिती भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या पुणे विभागीय कार्यालयाचे निदेशक सुदर्शन शेट्टी यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
डॉ. अर्चना सहकारी यांनी गुरुकुल पद्धतीने सुप्रसिद्ध ज्येष्ठ शास्त्रीय गायिका अलका देव-मारुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतले आहे. शास्त्रीय गायनासह धृपद, ख्याल, टप्पा, चतुरंग, तराणा, ठुमरी, भजन, गझल, भावगीत, नाट्यसंगीत आणि लोकसंगीत या प्रकारात त्यांचे प्रभुत्व आहे. डॉ. अर्चना सहकारी या अनेक पुरस्कारांनी सन्मानित असून देश-विदेशातील प्रसिद्ध संगीत महोत्सवात त्यांनी आपली गायन कला प्रस्तुत केली आहे.
मौमिता वत्स घोष यांनी लहान वयातच गुरू माधवी मुद्गल यांच्याकडे नृत्याचे धडे घेतले. तसेच विख्यात गुरू, पद्मविभूषण केलुचरण मोहपात्रा यांचेही मार्गदर्शन त्यांना लाभले आहे. मौमिता यांनी देश-विदेशात नृत्याचे कार्यक्रम सादर केले असून अनेक नृत्य महोत्सवात त्यांनी सहभाग नोंदविला आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

युवा सेना आयोजित राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा गुरुवारी शुभारंभ -श्रीराम रानडे यांना जीवनगौरव

31 संघांचा सहभाग : हैद्राबाद येथील संघही सादर करणार मराठी एकांकिका

पुणे : युवा सेना आयोजित हिंदुहृयदसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे करंडक खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेला गुरुवारी (दि. 26) सुरुवात होत आहे. स्पर्धेचे यंदाचे दुसरे वर्ष असून विजेत्या संघास 51 हजार रुपये, करंडक आणि मेडल देण्यात येणार आहे. स्पर्धेत 31 संघांनी सहभाग नोंदविला असून हैद्राबाद येथील संघही मराठी एकांकिका सादर करणार आहे.
युवा सेनेतर्फे दि. 26, दि. 27 आणि दि. 28 या कालावधीत बालगंधर्व रंगमंदिरात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती युवा सेनेचे महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य आणि स्पर्धेचे संयोजक कौस्तुभ कुलकर्णी यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. कुणाल शहा, अजय सूर्यवंशी हे स्पर्धेचे सहसंयोजक आहेत. स्पर्धेतील द्वितीय क्रमांकास 31 हजार रुपये, सन्मानचिन्ह तर तृतीय क्रमांकास 21 हजार रुपये आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. उत्कृष्ट लेखन, दिग्दर्शन, अभिनय, संगीत, रंगभूषा, वेशभूषा, नेपथ्य, प्रकाशयोजनेसाठी पारितोषिके दिली जाणार आहेत.
निलम शिर्के-सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित स्पर्धेचा उद्घाटन समारंभ दि. 26 रोजी सकाळी 9 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर, सुनील गोडबोले यांच्या हस्ते होणार असून युवा सेनेचे महाराष्ट्र सचिव किरण साळी, युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव विश्वजित बारणे, शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. स्पर्धेला प्रवेशमूल्य नाही.
उद्घाटन समारंभानंतर दि. 26 आणि दि. 27 रोजी सकाळी 10 ते रात्री 9 या वेळात तर दि. 28 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळात एकांकिकांचे सादरीकरण होणार आहे.

श्रीराम रानडे यांना जीवनगौरव पुरस्कार

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवार, दि. 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आला आहे. नाट्य क्षेत्रात समर्पित कार्य करणारे राधिका देशपांडे, ऋतुजा देशमुख, राहुल रानडे व प्रदिप वैद्य या कलाकारांचा या वेळी विशेष पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे तर ज्येष्ठ कलाकार श्रीराम रानडे यांना जीवनगौरव पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

बदल स्वीकारा प्रगती करा – मनोजकुमार डॅनियल

एसबीपीआयएम च्या ‘आरंभ’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे स्वागत

पिंपरी, पुणे (दि. २४ सप्टेंबर २०२४) विद्यार्थ्यांनी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी बदल स्वीकारले पाहिजेत तरच प्रगती करता येईल. व्यवस्थापन शास्त्रातील दोन वर्षांच्या अभ्यासक्रमात नवनवीन संधी, तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. अभ्यासाचे योग्य नियोजन केल्यास यश शंभर टक्के मिळतेच. तुम्ही हटके विचार करा आणि विकासाला चालना द्या, असे प्रतिपादन पुणे महा मेट्रोचे उप महाव्यवस्थापक मनोजकुमार डॅनियल यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पीसीईटी संचलित एस. बी. पाटील मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या २०२४-२६ शैक्षणिक वर्षाच्या विद्यार्थ्यांचे ‘आरंभ २४-२६’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॅनियल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास एडीएम ग्रुपचे अध्यक्ष परमजितसिंग चढ्ढा, इन्फोएज इंडियाचे सेल्स उपाध्यक्ष मौलिक शहा, बॉश चासिज सिस्टीम इंडियाचे एच. आर. प्रमुख उदयसिंग खरात, एस. बी. पाटील मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. किर्ती धारवाडकर आदी उपस्थित होते.
मोठी स्वप्ने पहा. स्वप्न साकार करण्यासाठी त्यांचा पाठलाग करा. ध्येयावर लक्ष केंद्रित करून नियमित अभ्यास, आत्मविश्वास, अतिरिक्त ज्ञान आत्मसात करा हे पाच मंत्र आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहेत, असे परमजितसिंग चढ्ढा यांनी सांगितले.
‘उत्कटतेपासून व्यवसायाकडे तुमची आकांक्षा वास्तवात बदलणे’ या विषयावर मौलिक शहा यांनी मार्गदर्शन केले.
उदयसिंग खरात यांनी कठोर परिश्रम घेतले तर यश हमखास मिळते. त्यासाठी स्वयंशिस्त आवश्यक आहे. कौशल्य विकसित केली तर रोजगार, स्वयंरोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत, असे सांगितले.
दुपारच्या सत्रात वहिदा पठाण, अर्पिता घोष यांनी मार्गदर्शन केले व शंकांचे निरसन केले.
स्वागत, प्रास्ताविक डॉ. किर्ती धारवाडकर यांनी केले. सूत्रसंचलन डॉ. प्रणिता बुरबुरे तर आभार डॉ. ऐश्वर्या गोपालकृष्णन यांनी मानले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

पीसीसीओई आयोजित आंतर महाविद्यालयीन पोहणे स्पर्धा संपन्न

यशस्वी विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड जाहीर

पिंपरी, पुणे (दि.२४ सप्टेंबर २०२४) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय आणि पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालयीन मुले, मुलींच्या पोहण्याच्या स्पर्धा बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांची विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. यामध्ये पृथ्वीराज चव्हाण (पीसीसीओई निगडी), अवधूत मोरे (कॉलेज ऑफ फार्मसी माळेगाव), शुभम धायगुडे (बीजी कॉलेज सांगवी), पार्थ चोपकर (बीजी कॉलेज, सांगवी), अथर्व भाकरे (एमपी कॉलेज पिंपरी), विशाल नरवडे (बीजी कॉलेज सांगवी), दीक्षा यादव (बीजी कॉलेज सांगवी), गरिमा कुशवाहा (इंदिरा कॉलेज परंदवडी), श्वेता कुऱ्हाडे (बीजी कॉलेज सांगवी), सायली झुंजाड (सिटी बोरा कॉलेज शिरूर), भक्ती वाडकर (बीजी कॉलेज सांगवी) यांचा समावेश आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे अध्यक्ष डॉ. महेंद्र अवघडे, सचिव डॉ. उमेशराज पनेरू, उपसचिव डॉ. ऋषिकेश कुंभार यांच्या उपस्थित करण्यात आले. स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यातील २५ महाविद्यालयातील मुले, मुलींनी सहभाग घेतला होता.
विजयी झालेल्या खेळाडूंना माजी संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉ. दीपक माने यांच्या हस्ते गौरवण्यात आले. निगडी, पीसीसीओई महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. संतोष पाचारणे यांनी स्पर्धा संयोजनात सहभाग घेतला.
यशस्वी स्पर्धकांचे पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांनी मार्केटबाबत अद्ययावत रहावे-सुधाकर गुडीपती

पुणे-

विद्यार्थ्यांनी मार्केटबाबत सतत अद्ययावत राहिले पाहिजे, तसेच सैद्धांतिक अभ्यासाबरोबर प्रात्यक्षिकांवर भर द्यावा, असे मत बजाज ऑटो लिमिटेड कंपनीच्या सीएसआर विभागाचे उपाध्यक्ष सुधाकर गुडीपती यांनी व्यक्त केले.

डीईएस पुणे विद्यापीठात श्री. मुकुंददास लोहिया यांच्या नावाने पीजीडी स्टडी आणि फिल्म अँड ड्रॉमॅटिक्स या दोन विभागांचे आणि बिझनेस अँड मॅनेजमेंट या विषयावरील व्याख्यानमालेचे उद्घाटन गुडीपती यांच्या हस्ते करण्यात आले.

डीईएसचे अध्यक्ष प्रमोद रावत, उपाध्यक्ष ऍड. अशोक पलांडे, कार्यवाह डॉ. आनंद काटिकर, कुलगुरू डॉ. प्रसाद खांडेकर, उद्योगपती पुरुषोत्तमदास लोहिया, सी. ए. विनीत देव यांची प्रमुख उपस्थिती होती.

देव म्हणाले, ” विकसित भारतासाठी विद्यार्थ्यांनी नवनवीन कौशल्ये आत्मसात करून प्रयोगशील राहिले पाहिजे. शाश्वत विकास व पर्यावरणाचे रक्षण महत्त्वाचे आहे.”

डॉ. खांडेकर म्हणाले, “डीईएस पुणे विद्यापीठाच्या नवीन लोहिया कॉम्प्लेक्ससाठी लोहिया कुटुंबियांनी दिलेल्या योगदानाबद्दल संस्था कृतज्ञ आहे.”

अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण:पुण्यात शिवसैनिकांकडून पेढे वाटून आनंद साजरा, विरोधकांच्या भूमिकेचा निषेध

पुणे-बदलापूर लैंगिक शोषणाच्या घटनेतील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरचा आनंद येथील शिवसैनिकांनी मंगळवारी पेढे वाटून साजरा केला. यावेळी त्यांनी अक्षय शिंदेची बाजू घेणाऱ्या विरोधकांचा निषेध करण्यासाठी आंदोलनही केले.यावेळीशिवसेना पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे, शहर प्रवक्ते अभिजित बोराटे, सहसंपर्क प्रमुख महिला आघाडी सुदर्शना त्रिगुनाईत,शहर संघटक श्रीकांत पुजारी,प्रमोद प्रभुणे,लक्ष्मण आरडे,श्रीकांत पुजारी,धनंजय जाधव,पंकज कोद्रे,उपशहर प्रमुख,सुनील जाधव,विकी माने,स्मिता साबळे,आकाश रेणूसे ,नितीन लगस, निलेश जगताप,निलेश धुमाळ,समीर नाईक, सुवर्णा शिंदे,मोहित काकडे,राजू परदेशी व समस्त शिवसैनिक उपस्थित होते
यावेळी नाना भानगिरे म्हणाले, काही दिवसांपूर्वी बदलापूर मध्ये एका शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आले. याप्रकरणात शाळेचा शिपाई आरोपी अक्षय शिंदे यास पोलिसांनी पकडले होते. पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर केले. पण आता त्याचे राजकारण महाविकास आघाडी मधील नेते करत आहे. शिंदे सरकार महिला सुरक्षा बाबतीत प्राधान्य देत आहे. अक्षय शिंदेने पोलिसांची बंदूक हिसकवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर प्रत्युत्तरादाखल कारवाई केली. या कारवाईमुळे भविष्यात पुन्हा असे कृत्य करण्यास कोणी धजावणार नाही.
महाविकास आघाडीतील घटकपक्ष गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे काम करत आहेत. विरोधकांनी बिनबुडाचे राजकारण न करता महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर झालेली शिक्षा योग्य असल्याची भूमिका घ्यावी. शिंदे सरकारने केलेली कृती योग्य असून त्याबाबत राज्यातील महिलांनी सरकारचे अभिनंदन केले आहे. त्याच सोबत बदलापूर मधील चिमुरडीला या माध्यमातून न्याय मिळाला आहे. महाविकास आघाडी मधील वेगवेगळ्या पक्षांचे नेते हे सोयीस्कर राजकारण करत असून ते महिला अत्याचारांना पाठीशी घालणारे आहे. यापुढे कोणीही मुलींवर अत्याचार करण्याचा विचार केला तरी त्यांना जरब बसेल, असे ते म्हणाले.

चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदेची बाजू घेणाऱ्या विरोधकांचा निषेध करावा तेवढा कमी- प्रमोद नाना भानगिरे

गुन्हेगारांवर जरब बसविणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांचे पुणे शिवसेनेच्या वतीने अभिनंदन

पुणे शिवसेनेच्या वतीने गुन्हेगारांवर जरब बसविणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांचे अभिनंदन व चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या अक्षय शिंदेची बाजू घेणाऱ्या विरोधकांचा जाहीर निषेध करण्यात आला, शिवसेना शहरप्रमुख प्रमुख प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की, चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीने पोलिसाची रिव्हॉल्वर हातात घेऊन पोलिसांवरच गोळीबार केला, तीन पोलिस त्यात जखमी झाले असून पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला आणि त्यात आरोपीचा मृत्यू झाला आहे परंतु, विरोधक कुठलीही माहिती न घेता या घटनेवर प्रतिक्रिया देत सुटले आहेत. एन्काऊंटर की हत्या असा प्रश्न उपस्थित करून पोलिसांच्या शौर्यावर संशय व्यक्त करणे हे दुर्दैव आहे.जखमी पोलीस अधिकाऱ्याच्या बाबतीत विरोधकांना काही घेणं देणं नाही पण अक्षय शिंदे मारला गेला याचं त्यांना दुःख होत आहे हे प्रचंड दुर्दैवी असून विरोधकांच्या या दुटप्पी भूमिकेमुळे पोलिसांच्या मनोधैर्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांचं मनोबल कायम रहावं ही भावना समस्त शिवसैनिकांनी व्यक्त केली, त्यांच्या पराक्रमाचं कौतुक व्हावं तसंच महाराष्ट्रातील जनता कायम त्यांच्या पाठीशी असूनआधी साडेचार वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या दुर्दैवी घटनेचे विरोधकांनी राजकारण केले. आता तो नराधम पोलिसांच्या चकमकीत मारला गेला तर त्यावरूनही राजकारण करत आहेत असेही प्रमोद नाना भानगिरे म्हणाले, आता पोलिसांवर आरोप करणे ही दुटप्पीपणाची हद्द झाली आहे. या आरोपीला भरचौकात फाशी द्या अशी मागणी करणाऱ्यांना आता त्याच्याविषयी एवढी आपुलकी कशी वाढली हा आघाडीच्या नेत्यांना सामान्य जनतेचा प्रश्न आहे.

पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेच्या प्रदर्शनीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद

पुणे, दि. २४ सप्टेंबर २०२४ : घरगुती किंवा गृहनिर्माण सोसायट्यांना छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे प्रतिकिलोवॅट सुमारे १२० युनिट मोफत वीज उपलब्ध करून देणाऱ्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या रास्तापेठ येथील प्रदर्शनीला मंगळवारी (दि. २४) दिवसभर नागरिकांचा तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

महावितरण, केंद्र शासनाचे ग्रामीण विद्युतीकरण महामंडळ (आरईसी) व महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोशिएशनच्या (मास्मा) सहकार्याने रास्तापेठ येथे प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. महावितरणचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते प्रदर्शनीचे उद्घाटन झाले. यावेळी ‘आरईसी’च्या मुख्य कार्यक्रम अधिकारी श्रीमती सरस्वती (मुंबई), अधीक्षक अभियंते अरविंद बुलबुले, युवराज जरग, सिंहाजीराव गायकवाड, अनिल घोगरे, ‘मास्मा’चे अध्यक्ष शशिकांत वाकडे, समीर गांधी, जयेश अकोले आदींची उपस्थिती होती.

पीएम सूर्यघर योजनेत अर्ज सादर करण्यापासून ते छतावरील सौर प्रकल्प कार्यान्वित करेपर्यंतच्या प्रत्येक घटकासाठी स्वतंत्र स्टॉल लावण्यात आला होता. यात योजनेचे फायदे, सहभागासाठी वेबसाईटवर अर्ज सादर करणे, एजंसीची निवड करणे, छतावर सौर संच बसविणे, मीटरींग आदींचे प्रात्यक्षिकांसह नागरिकांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. तसेच योजनेची माहितीपत्रके वितरीत करण्यात आले. ‘पीएम सूर्यघर योजनेची माहिती देण्यासाठी महावितरणकडून आयोजित राज्यातील ही पहिली प्रदर्शनी आहे. या प्रदर्शनीमुळे वीजग्राहकांशी योजनेबाबत होणार थेट संवाद कौतुकास्पद आहे’ असे मत मुख्य कार्यक्रम अधिकारी श्रीमती सरस्वती यांनी व्यक्त केले. या प्रदर्शनीचे समन्वयक म्हणून उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पाटणी यांनी काम पाहिले.

घरगुती ग्राहकांना घराच्या छतावर १ ते ३ किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे दरमहा सुमारे १२० ते ३६० युनिटपर्यंत वीज मोफत मिळविण्याची संधी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत आहे. सौर प्रकल्प उभारण्यासाठी विविध बँकांकडून सवलतीच्या व्याजदराने कर्जाची सोय उपलब्ध आहे. त्यानुसार महावितरणकडून १० किलोवॅटपर्यंतच्या अर्जांना स्वयंचलित मंजूरी देण्यासोबतच सौर नेटमीटर देखील महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात येत आहे आदींसह योजनेची विविध माहिती नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली.

साहित्यिक, एकल, जुगल रचनांनी जिंकली रसिकांची मने

पं. रोहिणी भाटे यांना नृत्यांजली अर्पण

पुणे : कलेच्या विश्वातल्या व्रतस्थ कलाकार पं. भाटे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या नृत्यभारती संस्थेतर्फे ‘रोहिणीद्युति’ हा उपक्रम वर्षभर सुरू आहे. याच अंतर्गत नीलिमा अध्ये संचलित प्रकृति कथक नृत्यालयतर्फे  ‘अर्घ्य’ ही कथक मैफल घेण्यात आली. 

कथक शैलीमधल्या ताल विभागांमध्ये तीन ताल, धमार आणि साडेदहा मात्रांच्या तालामधल्या प्रगल्भ आणि कसदार रचना यावेळी सादर झाल्या. नीलिमा अध्ये यांच्या संकल्पनेनुसार, कथकचा अभिनय विभाग हा निरनिराळ्या प्रकारच्या साहित्यिक रचनांतून फुलवला गेला. यातल्या विविधतेमुळे प्रेक्षक भारावून गेले. 

सुरुवात गंगू हैबती या पेशवेकालीन शाहिराचे काव्य असलेल्या ‘रंगराज आज महाराज गणपती’ या पं.भाटे यांच्या संगीत व नीलिमाताईंच्या नृत्यरचनेने झाली. पुढे तीन तालात पंडित लच्छू महाराजांचे भावआमद,  वर्षापरण यांसारख्या रचनांमध्ये नृत्याच्या बंदिशीचे बोलच कसे साहित्यिक आधार देऊ शकतात ते दिसून आले. समूह नृत्यातून लमछड कवित, एकल ठुमरी , युगल नृत्यातून कवी कुसुमाग्रजांची कविता याबरोबरच उत्तर हिंदुस्थानातील चैत्र महिन्यातला रंग आणि गंधोत्सव असताना एक विरहिणीची व्याकूळ अवस्था फार मनोज्ञ पद्धतीने रंगवली गेली. पं. भाटे यांनी शब्द-संगीत-नृत्यबद्ध केलेली कविता ‘सावळी मुरत न्यारी’ यातून अध्ये यांच्या अभिनय शैलीचे बहारदार दर्शन रसिकांना घडले. ‘हे मूळ देवा, वेळ झाली आता, परशु घे तू आता’ हा श्री गणेशाला उद्देशून केलेला आर्जव रसिकांना विशेष भावला. 

सुप्रसिद्ध तबलावादक पं अरविंदकुमार आजाद यांच्या  तबला साथीने कार्यक्रमाची रंगत वाढली. अजय पराड (संवादिनी), सुनील अवचट (बासरी), अर्पिता वैशंपायन (गायन), आदित्य देशमुख (तबला) आणि आसावरी पाटणकर (पढंत) यांनी समर्पक साथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलिमा अध्ये यांनी केले. 

…अन् अध्ये भावूक झाल्या.

कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. तेव्हा अध्ये म्हणाल्या की, पसायदानाचा अर्थ मला गुरु रोहिणीताईंनी जसा उलगडून सांगितला तो आजही जशाच्या तसा स्मरणात आहे. जे ज्ञान मी त्यांच्याकडून प्राप्त केले त्यातील ओंजळभर जरी मी त्यांना देऊ शकले तरी मी स्वतःला भाग्यवान समजेन. असे सांगताना अध्ये भावूक झाल्या. आपल्या गुरुप्रती असणारा हा विनम्र भाव पाहून रसिकांचेही डोळे पाणावले.

पुण्यात शनिवारी होणार-श्रीराम कथा संगीतिका

श्रुती संगीत निकेतनतर्फे आयोजन
पुणे ता. २४:  नगर येथील श्रुती संगीत निकेतनतर्फे पुण्यात शनिवारी (ता. २८) रामकथा या संगीतिकेचा प्रयोग होणार आहे. येथील टिळक स्मारक मंदिरात होणारा हा प्रयोग सर्वांना विनामूल्य खुला आहे. शनिवारी सायंकाळी पाचला हा प्रयोग होणार आहे.
संगीतिका म्हणजे नाटक आणि संगीत या दोन कलांचा एकात्म आविष्कार साधणारा नाट्यप्रकार. हा पूर्णतः पद्यरूप आणि संगीतमय असतो. संगीतात रचनाबद्ध केलेली व गायक नटांनी सादर केलेली पद्यात्म नाट्यकृती म्हणजे संगीतिका. पाश्चात्त्य ‘ऑपेरा’ला संगीतक म्हणतात. संगीतिका हे त्याचे प्रभाव पडलेले भारतीय रूप म्हणता येईल. प्रस्तुत संगीतिका डॉ. म. ना. बोपर्डीकर यांनी लिहिली असून, ती दोन भागांमध्ये आहे. या संगीतिकेचे दिग्दर्शन विख्यात गायिका अभिनेत्री जयमाला शिलेदार यांच्या शिष्या डॉ. धनश्री खरवंडीकर यांनी केले आहे.
संगीत मकरंद खरवंडीकर यांचे असून, नृत्य दिग्दर्शन कल्याणी कामतकर यांचे आहे. अनुजा कुलकर्णी आणि कुमुदिनी बोपर्डीकर यांचे विशेष सहाय्य लाभले आहे. विशेष म्हणजे या संगीतिकेतील सर्व भूमिका शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी करणार आहेत. संगीतिकेच्या प्रथम भागात श्रीरामांच्या राज्याभिषेक प्रसंगापासून सीता अपहरणापर्यंत आणि दुसरा भाग रावण वधापासून सीता भूमीमध्ये जाते तेथपर्यंत वर्णन आले आहे. अतिशय प्रासादिक गीते, काव्यमय संवाद असे या संगीतिकेचे लक्षवेधी स्वरूप आहे. श्रुती संगीत निकेतन या नगरमधील एका अग्रगण्य संस्थेने हे अवघड शिवधनुष्य पेलले होते. या संगीतिकेचे दोन प्रयोग नगरमध्ये झाले आहेत. आता खास पुणेकर रसिकांसाठी हा प्रयोग होणार आहे. संगीतिका या अनोख्या नाट्यप्रकारचा अनुभव घेण्यासाठी नाट्य व संगीतप्रेमींनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

एन्काउंटर हा सरकारी दहशतवाद -सुषमा अंधारे

पुणे-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांच्या मांडीवर गोळी झाडली, पण पोलिसांनी थेट त्याच्या तोंडावर गोळी मारली, हे न समजणारे आहे, असे त्या म्हणाल्यात.या एन्काउंटर प्रकरणातील पोलिस अधिकारी संजय शिंदे यांची आजअखेर वादग्रस्त कारकीर्द राहिली आहे. विजय पलांडे याला पळवून लावण्यात संजय शिंदे यांचा हाथ होता. त्यामुळे संजय शिंदे यांना काही कालावधी करिता निलंबित देखील करण्यात आले होते. त्यामुळे अक्षय शिंदे याला संपवल्यामुळे हे प्रकरण संपत नसून कोणाला वाचवले गेले आहे ? त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि या फेक एन्काउंटर प्रकरणी आम्ही कोर्टात जाणार आहोत, ही घटना राज्य प्रायोजित दहशतवाद आहे का? असा सवाल उपस्थित करीत महायुती सरकारवर त्यांनी टीका केली.


सुषमा अंधारे मंगळवारी येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाल्या, पोलिस व्यवस्थेचा धाक व विश्वासर्हता समाजात राहिली पाहिजे. बदलापूर प्रकरणात सरकारची महिला सुरक्षेची लक्तरे निघालेली आहेत. एन्काउंटर करणारे वादग्रस्त पोलिस निरीक्षक संजय शिंदे व त्यांच्यासाेबतच्या लाेकांचे निलंबन केले पाहिजे. अक्षय शिंदे पोलिसांच्या मांडीवर गाेळी झाडताे व पोलिस त्याच्या ताेंडावर गाेळी मारतात हे न समजणारे आहे.
संजय शिंदे यांनी ठाणे हद्दीत अनेक दिवस डयुटी केली असून तेथील प्रशासनावर आमचा विश्वास नाही. न्यायालयात आम्ही दाद मागणार आहे.अक्षय शिंदे समाजसुधारक नव्हता त्यास फाशीच व्हायला पाहिजे हाेती. परंतु त्याला ठार मारुन प्रकरण संपत नाही. अशाप्रकारे एखाद्याला मारणे सरकार पुरस्कृत खून आहे, असे त्या म्हणाल्या.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, तेलंगणा प्रकरणातील एन्काउंटरफेक असल्याचे चाैकशी समितीत स्पष्ट झाले. त्यामुळे त्यात सहभागी असलेल्या दहा पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांचा सन्मान राखला पाहिजे व त्यांचे संरक्षण देखील झाले पाहिजे. परंतु पोलिस स्नमानार्थ गळे काढणारे खासदार नरेश महस्के, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे खाेटे वक्तव्य करत आहे. नैसर्गिक न्याय नरेश महस्के यांना वाटत आहे परंतु तसे इतर प्रकरणात दिसून येत नाही. सरकारने नैसर्गिक न्यायची व्याख्या स्पष्ट करुन सांगावी. देशावर आक्रमण करणारा कसाब याला शिक्षा देण्याकरिता कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यात आली.
चाैकशी न करता एखाद्याला अशाप्रकारे संपवले जात असेल तर पोलिस, कारागृह याची गरज नाही. अक्षय शिंदे प्रकरणात सरकारवर सर्व बाजूने टिकेची झाेड उठल्यावर गृहमंत्री यांनी चाैकशी समिती नेमण्याचे सांगितले. मात्र, यापूर्वी ड्रग प्रकरणात त्यांनी समिती नेमून देखील काेणती चाैकशी अहवाल कधी समाेर आला नाही. गाेळी घालताना बेछुट घातली जाते, त्यावेळी कायदेशीर प्रक्रिया राबवली जात नाही. बदलापूर प्रकरणात संस्थाचालक आपटे यास शाळेचे सीसीटीव्ही फुटेज गायब करुन देखील अद्याप अटक करण्यात आलेले नाही. मुलींना न्याय मिळाला पाहिजे. शाळा वाचविण्याबाबत काेणते भाष्य हाेत नाही.