पं. रोहिणी भाटे यांना नृत्यांजली अर्पण
पुणे : कलेच्या विश्वातल्या व्रतस्थ कलाकार पं. भाटे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या नृत्यभारती संस्थेतर्फे ‘रोहिणीद्युति’ हा उपक्रम वर्षभर सुरू आहे. याच अंतर्गत नीलिमा अध्ये संचलित प्रकृति कथक नृत्यालयतर्फे ‘अर्घ्य’ ही कथक मैफल घेण्यात आली.
कथक शैलीमधल्या ताल विभागांमध्ये तीन ताल, धमार आणि साडेदहा मात्रांच्या तालामधल्या प्रगल्भ आणि कसदार रचना यावेळी सादर झाल्या. नीलिमा अध्ये यांच्या संकल्पनेनुसार, कथकचा अभिनय विभाग हा निरनिराळ्या प्रकारच्या साहित्यिक रचनांतून फुलवला गेला. यातल्या विविधतेमुळे प्रेक्षक भारावून गेले.
सुरुवात गंगू हैबती या पेशवेकालीन शाहिराचे काव्य असलेल्या ‘रंगराज आज महाराज गणपती’ या पं.भाटे यांच्या संगीत व नीलिमाताईंच्या नृत्यरचनेने झाली. पुढे तीन तालात पंडित लच्छू महाराजांचे भावआमद, वर्षापरण यांसारख्या रचनांमध्ये नृत्याच्या बंदिशीचे बोलच कसे साहित्यिक आधार देऊ शकतात ते दिसून आले. समूह नृत्यातून लमछड कवित, एकल ठुमरी , युगल नृत्यातून कवी कुसुमाग्रजांची कविता याबरोबरच उत्तर हिंदुस्थानातील चैत्र महिन्यातला रंग आणि गंधोत्सव असताना एक विरहिणीची व्याकूळ अवस्था फार मनोज्ञ पद्धतीने रंगवली गेली. पं. भाटे यांनी शब्द-संगीत-नृत्यबद्ध केलेली कविता ‘सावळी मुरत न्यारी’ यातून अध्ये यांच्या अभिनय शैलीचे बहारदार दर्शन रसिकांना घडले. ‘हे मूळ देवा, वेळ झाली आता, परशु घे तू आता’ हा श्री गणेशाला उद्देशून केलेला आर्जव रसिकांना विशेष भावला.
सुप्रसिद्ध तबलावादक पं अरविंदकुमार आजाद यांच्या तबला साथीने कार्यक्रमाची रंगत वाढली. अजय पराड (संवादिनी), सुनील अवचट (बासरी), अर्पिता वैशंपायन (गायन), आदित्य देशमुख (तबला) आणि आसावरी पाटणकर (पढंत) यांनी समर्पक साथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलिमा अध्ये यांनी केले.
…अन् अध्ये भावूक झाल्या.
कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. तेव्हा अध्ये म्हणाल्या की, पसायदानाचा अर्थ मला गुरु रोहिणीताईंनी जसा उलगडून सांगितला तो आजही जशाच्या तसा स्मरणात आहे. जे ज्ञान मी त्यांच्याकडून प्राप्त केले त्यातील ओंजळभर जरी मी त्यांना देऊ शकले तरी मी स्वतःला भाग्यवान समजेन. असे सांगताना अध्ये भावूक झाल्या. आपल्या गुरुप्रती असणारा हा विनम्र भाव पाहून रसिकांचेही डोळे पाणावले.