श्रुती संगीत निकेतनतर्फे आयोजन
पुणे ता. २४: नगर येथील श्रुती संगीत निकेतनतर्फे पुण्यात शनिवारी (ता. २८) रामकथा या संगीतिकेचा प्रयोग होणार आहे. येथील टिळक स्मारक मंदिरात होणारा हा प्रयोग सर्वांना विनामूल्य खुला आहे. शनिवारी सायंकाळी पाचला हा प्रयोग होणार आहे.
संगीतिका म्हणजे नाटक आणि संगीत या दोन कलांचा एकात्म आविष्कार साधणारा नाट्यप्रकार. हा पूर्णतः पद्यरूप आणि संगीतमय असतो. संगीतात रचनाबद्ध केलेली व गायक नटांनी सादर केलेली पद्यात्म नाट्यकृती म्हणजे संगीतिका. पाश्चात्त्य ‘ऑपेरा’ला संगीतक म्हणतात. संगीतिका हे त्याचे प्रभाव पडलेले भारतीय रूप म्हणता येईल. प्रस्तुत संगीतिका डॉ. म. ना. बोपर्डीकर यांनी लिहिली असून, ती दोन भागांमध्ये आहे. या संगीतिकेचे दिग्दर्शन विख्यात गायिका अभिनेत्री जयमाला शिलेदार यांच्या शिष्या डॉ. धनश्री खरवंडीकर यांनी केले आहे.
संगीत मकरंद खरवंडीकर यांचे असून, नृत्य दिग्दर्शन कल्याणी कामतकर यांचे आहे. अनुजा कुलकर्णी आणि कुमुदिनी बोपर्डीकर यांचे विशेष सहाय्य लाभले आहे. विशेष म्हणजे या संगीतिकेतील सर्व भूमिका शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी करणार आहेत. संगीतिकेच्या प्रथम भागात श्रीरामांच्या राज्याभिषेक प्रसंगापासून सीता अपहरणापर्यंत आणि दुसरा भाग रावण वधापासून सीता भूमीमध्ये जाते तेथपर्यंत वर्णन आले आहे. अतिशय प्रासादिक गीते, काव्यमय संवाद असे या संगीतिकेचे लक्षवेधी स्वरूप आहे. श्रुती संगीत निकेतन या नगरमधील एका अग्रगण्य संस्थेने हे अवघड शिवधनुष्य पेलले होते. या संगीतिकेचे दोन प्रयोग नगरमध्ये झाले आहेत. आता खास पुणेकर रसिकांसाठी हा प्रयोग होणार आहे. संगीतिका या अनोख्या नाट्यप्रकारचा अनुभव घेण्यासाठी नाट्य व संगीतप्रेमींनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.